वॉशिंग्टन,
Shooting at Donald Trump अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी हिंसाचाराची मोठी घटना घडली आहे. पेनसिल्व्हेनियातील बटलर येथे डोनाल्ड ट्रम्प यांच्या सभेमध्ये गोळीबार झाला आहे. या घटनेनंतर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना अमेरिकन सीक्रेट सर्व्हिस एजंट्सनी तत्काळ स्टेजवरून बाहेर काढले. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये डोनाल्ड ट्रम्प सभेत बोलत असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ट्रम्प यांच्या कानातून रक्तस्त्राव होताना दिसत आहे. माजी राष्ट्रपती सुरक्षित असल्याचे एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले. अधिकाऱ्याने सांगितले की आम्ही सुरक्षेच्या उपाययोजना राबवल्या आहेत, तपास सुरू आहे. Shooting at Donald Trump बटलर काउंटी डिस्ट्रिक्ट ॲटर्नी रिचर्ड गोल्डिंगर यांनी सांगितले की, संशयित बंदुकधारी व्यक्तीला गोळी मारण्यात आली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही या घटनेबाबत वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, "आपल्या देशात असे घडू शकते यावर विश्वास बसत नाही. गोळीबार करणाऱ्या व्यक्तीबद्दल सध्या कोणतीही माहिती नाही, त्याचा आता मृत्यू झाला आहे. माझ्या उजव्या कानाच्या वरच्या भागाला गोळी लागली.
अध्यक्ष जो बाइडेन काय म्हणाले
अमेरिकेचे अध्यक्ष जो बाइडेन म्हणाले, "फेडरल सरकारच्या सर्व एजन्सींनी मला परिस्थितीबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे... मी डोनाल्डशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे, तो त्याच्या डॉक्टरांकडे आहे आणि बरा आहे... अमेरिकेत अश्या प्रकारच्या हिंसाचाराला जागा नाही....आम्ही याकडे दुर्लक्ष करू शकत नाही..."
'देशात हिंसेला स्थान नाही'
गोळीबाराच्या घटनेबाबत अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस म्हणाल्या, "मला पेनसिल्व्हेनिया येथे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या कार्यक्रमात झालेल्या गोळीबाराची माहिती मिळाली आहे. गोळीबारमध्ये त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही या गोष्टीचे समाधान वाटत आहे. आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहोत.
काय म्हणाले बराक ओबामा?
ट्रम्प यांच्या रॅलीवर झालेल्या गोळीबाराबाबत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी ट्विट केले आहे की, "आपल्या लोकशाहीत राजकीय हिंसेला जागा नाही. नेमके काय झाले हे अद्याप आम्हाला माहीत नसले तरी, पण माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना गंभीर दुखापत झाली नाही, याबद्दल आपण सर्वांना दिलासा वाटला पाहिजे. मिशेल आणि मी त्याला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देतो.
हिंसाचाराचा निषेध करा
अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी ट्विट केले की, "संपूर्ण संरक्षण विभाग या हिंसाचाराचा निषेध करतो, ज्याला आमच्या लोकशाहीत स्थान नाही. अमेरिकेतील आमच्या मतभेदांचे निराकरण करण्याचा हा मार्ग नाही - आणि हे कधीही होऊ नये" माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प सुरक्षित आहेत आणि मी त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी आणि या भयानक घटनेमुळे प्रभावित झालेल्या सर्वांसाठी प्रार्थना करत आहे.
एलोन मस्क काय म्हणाले
ट्रम्प यांच्या रॅलीत झालेल्या गोळीबाराबाबत अब्जाधीश उद्योगपती इलॉन मस्क म्हणाले, 'मी ट्रम्प यांना पूर्ण पाठिंबा देतो आणि त्यांच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी कामना करतो.'