राष्ट्ररक्षा
'Lip Frogging to Pole Vaulting' : ‘लिप फ्रॉगिंग टू पोल व्हॉल्टिंग’ या पुस्तकात आर्थिक वाढीच्या पलीकडे जाऊन लिप फ्रॉगिंग (लहान अडथळ्यांवरून उड्या मारत धावणे) चे समाज आणि पर्यावरण यावर होणार्या परिणामांविषयी संशोधन करण्यात आले आहे. ‘लिप फ्रॉगिंग टू पोल व्हॉल्टिंग’ हे पुस्तक अत्यंत प्रेरणादायी आणि अंतर्दृष्टी निर्माण करणारे आहे. या पुस्तकात दिलेली ‘लिप फ्रॉगिंग’ची संकल्पना वापरल्यास आर्थिक वाढ वेगाने होऊ शकते. पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर आणि रवी पंडित यांनी हे पुस्तक लिहिले आहे.
हेही वाचा : पाऊस पडतोय; जलधोरण हवे
या पुस्तकात लिप फ्रॉगिंगच्या माध्यमातून विकास करण्याविषयीच्या पारंपरिक पायर्या जलद गतीने ओलांडून विकसनशील राष्ट्रे त्यांच्यासमोर असलेल्या आव्हानांवर कशा प्रकारे मात करू शकतील, याविषयी लेखन केले आहे. ‘लिप फ्रॉगिंग’ या संकल्पनेनुसार मधले काही टप्पे वगळून भारत कशा प्रकारे लक्षणीय प्रगती करू शकतो, याविषयी संशोधन केले आहे. लेखकांनी या संकल्पनेचा विस्तार ‘पोल व्हॉल्टिंग’ (‘पोल व्हॉल्ट’ या खेळातील प्रकारामध्ये खेळाडू लांब काठीच्या साहाय्याने एकदम उंच उडी मारू शकतो), म्हणजे नवीन धोरणे अवलंबून आणि तंत्रज्ञानाचा वापर करून भारत अजून उच्च स्थान कसे प्राप्त करू शकतो, याविषयी सांगितले आहे. हा लेख ‘लिप फ्रॉगिंग टू पोल व्हॉल्टिंग’ या पुस्तकातिल नावीन्यपुर्ण संकल्पनांवर आधारित आहे. या पुस्तकाविषयीची काही सूत्रे पुढीलप्रमाणे आहेत.
‘लिप फ्रॉगिंग’ संकल्पनेची पृष्ठभूमी
'Lip Frogging to Pole Vaulting' : पुस्तकाच्या लेखकांनी ‘लिप फ्रॉगिंग’विषयीच्या ऐतिहासिक संदर्भाची रूपरेषा स्पष्ट केली तसेच इतर विकसित देशांशी स्पर्धा करण्यासाठी भारत आणि चीन यांनी पारंपरिक विकासाच्या टप्प्यांना कशी बगल दिली, तेही सांगितले. त्यांनी यशस्वीपणे ‘पोल व्हॉल्टिंग’ करण्यास योगदान देणारे तांत्रिक विकास, धोरणातील सुधारणा आणि उद्योजकतेचा आत्मा हे घटक शोधले आहेत.
स्पष्ट आणि प्रत्यक्षात आणण्यायोग्य कल्पना
‘गुंतागुंतीच्या संकल्पनांविषयी स्पष्ट सादरीकरण’ हे या पुस्तकाचे बळ आहे. लेखकांनी त्यांची सूत्रे परिणामकारकपणे मांडण्यासाठी जगात प्रत्यक्ष घडणार्या उदाहरणांचा विशेष अभ्यास केला आहे. भारतातील माहिती तंत्रज्ञान (आय.टी.) क्षेत्रातील क्रांतीपासून ते उत्पादनामध्ये चीनने केलेली प्रगती ही सूत्रे सांगताना लिप फ्रॉगिंगमुळे काही राष्ट्रे जगातील स्पर्धेत कशी पुढे गेली, याविषयी सांगितले आहे. हे पुस्तक केवळ शैक्षणिक नसून कृती करण्यास प्रोत्साहन देणारे व्यावहारिक मार्गदर्शक आहे. सध्याची निकड लक्षात घेऊन लिहिलेला हा ग्रंथ लिप फ्रॉगिंगच्याही पुढे जाऊन सक्रिय पोल व्हॉल्टिंगचे समर्थन करतो. अनेक उदाहरणे असलेले हे पुस्तक धोरण ठरवणारे, सरकारी कर्मचारी, उद्योजक अन् विविध स्तरांतील वाचक यांना भावणारे आहे.
सामाजिक आणि पर्यावरण परिणामांचे अन्वेषण
लेखकांनी टिकाऊ, स्थिर विकास आणि सर्वसमावेशक वाढ यांवर भर दिला आहे. त्यामुळे भारताला लाभ होऊन जगाच्या प्रगतीला साहाय्य होईल. यात धोरण ठरवणारे, उद्योजक आणि नवीन कल्पना कार्यवाहीत आणू इच्छिणार्यांना कृतीसंदर्भातील अंतर्दृष्टी दिली आहे. यामध्ये त्यांनी शिक्षणाची भूमिका, संशोधन आणि विकास, बौद्धिक मालमत्तेविषयीचे अधिकार, उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्र यांचा समन्वय या सूत्रांविषयी चर्चा केली आहे. याखेरीज लिप फ्रॉगिंग करण्यास समोर असलेली आव्हाने आणि येणारे अडथळे यांविषयी सांगून त्यावर मात करण्यासाठी कोणते धोरण ठेवावे, हेही सांगितले आहे.
पुस्तकाविषयी निष्कर्ष
'Lip Frogging to Pole Vaulting' : विचार करायला प्रवृत्त करणारे आणि माहितीपूर्ण असे हे पुस्तक असून यात विकसनशील देशांना जलद प्रगती साधण्यासाठी ‘पोल व्हॉल्टिंग’ या संकल्पनेविषयी माहिती दिली आहे. डॉ. रघुनाथ माशेलकर आणि रवी पंडित यांनी आर्थिक वाढ अन् नावीन्यतेला प्रोत्साहन देण्याची इच्छा असणार्यांनी ‘पोल व्हॉल्टिंग’ कार्यवाहीत आणावे, यावर भर दिला आहे. व्यावहारिक मार्गदर्शन केले आहे. धोरणे ठरवणारे, उद्योजक आणि ज्याला जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये ‘पोल व्हॉल्टिंग’चे चलनशास्त्र जाणून घेण्यास रस आहे, अशा कोणत्याही व्यक्तीने हे पुस्तक वाचलेच पाहिजे. भारताने विकासाच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी आणि नावीन्यपूर्ण दृष्टिकोन ठेवावा, याविषयी आग्रह या पुस्तकात केला आहे. परिवर्तनकारी भविष्यकाळासाठी धोरणे ठरवणारे, उद्योजक आणि नागरिक या तिघांनीही काय करावे? याविषयी हे पुस्तक दिशादर्शन करणारे आहे.
विशाल दृष्टिकोन
हे पुस्तक जरी मूलतः भारतावर लक्ष केंद्रित करून लिहिले आहे तरी यातील संकल्पना आणि तत्त्वे ही जलद प्रगती करण्यासाठी देशातील कोणत्याही क्षेत्रासाठी उपयुक्त आहेत. लेखकांचा नावीन्य आणि उद्योजकता याविषयीचा गाढा अभ्यास असल्याने त्यांचे याविषयीचे दृष्टिकोन अतिशय समृद्ध असून हे पुस्तक जगासाठी उपयोगी आहे. लेखक डॉ. रघुनाथ माशेलकर हे प्रख्यात भारतीय शास्त्रज्ञ असून ‘केमिकल इंजिनीअरिंग आणि वैज्ञानिक धोरण’ या क्षेत्रांत दिलेल्या भरीव योगदानाविषयी ते प्रसिद्ध आहेत. भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री हे पुरस्कार दिले आहेत. रवी पंडित हे एक प्रमुख उद्योजक आणि व्यापारी क्षेत्रातील नेते असून ‘के.पी.आय.टी. टेक्नोलॉजिस’ या जागतिक स्तरावरील माहिती तंत्रज्ञानाविषयी सल्ला देणार्या आणि उत्पादन अभियांत्रिकीविषयी मार्गदर्शन करणार्या संस्थेचे अध्यक्ष आहेत.
धोरणांमध्ये सुधारणा
'Lip Frogging to Pole Vaulting' : पोल व्हॉल्टिंग शक्य करण्यासाठी धोरणांमध्ये कराव्या लागणार्या सुधारणांवर लेखकांनी भर दिला आहे. सरकारने अनुकूल धोरणे लागू करून त्यामध्ये येणारे नोकरशाहीविषयक अडथळे दूर करून सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील भागीदारीला प्रोत्साहन देऊन अनुकूल वातावरण निर्माण करावे; सोबतच बौद्धिक मालमत्तेविषयी अधिकारांचे संरक्षण करणे आणि ज्ञान मिळविणे महत्त्वाचे आहे. पोल व्हॉल्टिंगसाठी कौशल्य विकास आणि शिक्षणाचे महत्त्व ही दोन सूत्रे आहेत. विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेविषयी मानसिकता जोपासणे आणि नावीन्य आणण्यासाठी त्यांना आवश्यक कौशल्ये शिकवणे याविषयी शैक्षणिक संस्थांची भूमिका काय असावी, याचे परीक्षण लेखकांनी केले आहे. जीवनभर शिकत राहणे आणि पालटणार्या जगाविषयी सतत अद्ययावत राहणे, ही संकल्पना महत्त्वाची आहे.
तत्त्वांचा अभ्यास आणि प्रत्यक्ष व्यवहारातील उदाहरणे
लेखकांनी त्यांचा युक्तिवाद पटवून देण्यासाठी पुस्तकामध्ये काही तत्त्वांचा अभ्यास तसेच प्रत्यक्ष व्यवहारातील उदाहरणे दिली आहेत. यामध्ये आरोग्याची काळजी आणि शेती यामधील महत्त्वाच्या संशोधनापासून ते यशस्वी उद्योजकांनी केलेले उपक्रम यांचा समावेश आहे. जगातील प्रत्यक्ष विविध उदाहरणे देऊन पोल व्हॉल्टिंगमुळे विविध क्षेत्रांमध्ये झालेले पालट त्यांनी सांगितले आहेत.
तंत्रज्ञानाची महत्त्वाची भूमिका
या पुस्तकात ‘पोल व्हॉल्टिंग’मध्ये तंत्रज्ञानाच्या भूमिकेविषयी अधिक सविस्तर माहिती दिली आहे. पायाभूत सुविधांमधील उणिवांवर मात करून जलद प्रगती करण्यासाठी माहिती आणि संभाषण तंत्रज्ञानातील प्रगतीचा कशा प्रकारे लाभ करायचा हे कथन केले आहे. आर्थिक समावेश, ई-कॉमर्स, शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रांमध्ये भ्रमणसंच, इंटरनेट अन् डिजिटल प्लॅटफॉर्म महत्त्वाचे आहे.
नावीन्याविषयीची इकोसिस्टिम
लेखकांनी 'Lip Frogging to Pole Vaulting' ‘पोल व्हॉल्टिंग’ला साहाय्य होण्यासाठी भक्कम अशी नावीन्यपूर्ण इकोसिस्टिम (यंत्रणा) सिद्ध करण्याचे महत्त्व सांगितले आहे. नावीन्यता, उद्योजकता आणि ज्ञानाची देवाणघेवाण यामध्ये वाढ होण्यासाठी शिक्षण क्षेत्र, उद्योग आणि सरकार यांचा सहयोग आवश्यक आहे. नवीन संकल्पनांमध्ये वाढ करणे, त्याला चालना देणे, निधी उपलब्ध करणे आवश्यक आहे. यश मिळविलेली उदाहरणे सांगण्यासह लेखकांनी अपयशातून शिकण्याचे महत्त्व सांगितले आहे. त्यांनी पोल व्हॉल्टिंग अयशस्वी झाल्याची उदाहरणे आणि त्यामागच्या कारणांचे विश्लेषण केले आहे. या अपयशाचे परीक्षण करून पोल व्हॉल्टिंग करताना असलेला धोका कसा न्यून करता येईल, याविषयी दृष्टिकोन दिला आहे.
मार्गदर्शक सूत्रे
पुस्तकाच्या शेवटी डॉ. माशेलकर आणि पंडित यांनी पोल व्हॉल्टिंगसाठी मार्गदर्शक नकाशा दिला आहे. ‘लिप फ्रॉगिंग’विषयी वातावरण निर्माण करण्यासाठी त्यांनी त्यातील महत्त्वाच्या पायर्या आणि धोरणे, व्यवहारातील उदाहरणांसह स्पष्ट केली आहेत. या नकाशामध्ये धोरणांमधील सुधारणा, संशोधन आणि विकास यामधील गुंतवणूक, नावीन्यतेच्या संस्कृतीला प्रोत्साहन देणे अन् भक्कम भागीदारी सिद्ध करणे याविषयी सांगितले आहे.
(लेखक संरक्षणविषयक तज्ज्ञ आहेत.)
ब्रिगेडियर हेमंत महाजन
- 9096701253