यंगिस्तान
- जयेश शत्रुघ्न मेस्त्री
Sharad Pawar : वाशीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात संभाजी ब्रिगेडचं अधिवेशन आयोजित केलं होतं. या अधिवेशनामधला ज्ञानेश महाराव यांचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय्. दीड मिनिटांचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये ज्ञानेश महाराव हे हिंदुस्थानचे प्राण, आराध्य दैवत प्रभू श्रीरामचंद्र आणि अनेक हिंदूंसाठी पूज्य असणारे अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे या व्हिडीओत ज्ञानेश महाराव बोलत असताना मंचावर बारामती जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार बसलेले दिसत आहेत. मुळात यांनी केलेली टीका इतकी बालिश आहे की ज्यांनी कुणी त्यांचे नाव ज्ञानेश ठेवले, त्या नावाचाच त्यांनी नकळत अपमान केला आहे. श्रीरामांवर त्यांनी जे आरोप केले त्याचं खंडण अभ्यासकांनी याआधीच केलेलं आहे. त्यामुळे मी इथे त्यासाठी लेखणी खर्च करत नाही. कदाचित ते खंडण वाचण्याची, अभ्यासण्याची बुद्धी ज्ञानेश यांना झाली नसावी. ज्ञानेश महाराव यांना प्रभू श्रीराम किंवा स्वामी समर्थांवर आरोप किंवा टीका करायची नाही. तर त्यांना या दोन विभुतींची टिंगल करायची आहे. हे करत असताना त्यांनी ऊर्मिलेच्या चारित्र्यावर संशय घेतला, रामाचं खानदान काढलं, लायकी काढली.
हद्द म्हणजे ते असंही म्हणाले की, माझ्या बहिणीला गरोदर असताना बाहेर काढलं तर मी तो तिचा नवरा असेल त्याला शिल्लक ठेवीन काय? आपण त्याला देव मानतो, आपली आपल्याला लाज वाटली पाहिजे या वाक्याचा अर्थ काय होतो? स्वामी समर्थांवर टीका करताना त्यांच्या कपड्यांवरून त्यांची टिंगल उडवली आणि आपला नवरा, आपला मुलगा असा फिरला घरात तर चालेल काय संध्याकाळच्या वेळेला? बरं स्वामींची टिंगल उडवून या माणसाने पवारांची स्तुती केली. ‘५० वर्षे Sharad Pawar शरद पवारांनी राजकारण केलंय काय ते असंच केलं? काय योजनाबिजना राबवल्या नाहीत, कर्जासाठी बँका नाही निर्माण केल्या.’ इथपर्यंत ते थांबले नाहीत, तर ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांचासुद्धा महाराव यांनी अपमान केला. कोण टीव्हीवरनं सांगते कोण नटी आहे, अशोक सराफची बायको, की वरतून उडी टाकली स्वामी वाचवतील, मग हिलाच ऑलिम्पिकमध्ये पाठवलं पाहिजे होतं न उड्या मारायला. शरद पवार यांना खुश करण्यासाठी, त्यांच्या मर्जीत राहण्यासाठी ज्ञानेश महाराव यांनी प्रचंड खालची पातळी गाठलेली आहे. भारताच्या बाहेर ज्या पंथाची स्थापना झाली आणि आज ज्या पंथाचे लोक भारतात राहतात, त्यांच्या देवांवर व पंथ-संस्थापकांवर टीका करण्याची हिंमत ज्ञानेश दाखवू का?
अध्यात्मातल्या अनेक गोष्टी खूप वैयक्तिक असतात, त्यात येणारा अनुभव अत्यंत वैयक्तिक असतो. असे अनुभव आपल्या संतांनादेखील आले आहेत. म्हणूनच विठ्ठल भक्तीची एक सुंदर परंपरा आपल्याकडे निर्माण झाली. ज्ञानेश्वर माउली ते संत तुकोबांपर्यंत या महान संतांनी येथे अध्यात्माची परंपरा रुजवली. आता हे डावे लोक तुकोबांनासुद्धा पुरोगामी करायला निघाले आहेत. सुधारणावादी अवश्य होते, पण ते विठ्ठलाचे निस्सीम भक्तही होते. अध्यात्म आणि सुधारणा या एकाच नाण्याच्या दोन बाजू असू शकतात, सुधारणा घडवून आणण्यासाठी धर्माचा त्याग करायची गरज नसते, हे संत तुकोबांनी आपल्याला शिकवलं. हीच परंपरा पुढे सावरकरांनी सुरू ठेवली. पण याची जाण ज्ञानेश महाराव यांना नाही. कारण हिंदू संस्कृती नष्ट गटाचे ते केवळ एक अतिसामान्य सदस्य आहेत. डावी विचारप्रणाली स्थापित करायची असेल तर हिंदू संस्कृती नष्ट करावी लागेल आणि त्यासाठी हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर बोट ठेवावं लागेल. हे काम अनेक हिंदुद्वेष्टे करीत आहेत. ज्ञानेश महारावदेखील तीच री ओढत आहेत. मी जर एखाद्या देवाला/संताला मानत असेन, त्याची पूजा करत असेन व माझ्या लोकांचे शून्य नुकसान होत असेल व मला आत्मशांती प्राप्त होत असेल, तर त्या देवाची/संताची पूजा करायची की नाही, हे सांगणारे ज्ञानेश महाराव कोण आहेत? संविधानाने मला माझ्या धर्माचं पालन करण्याचं, माझ्या आराध्य देवतेचं पूजन करण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. हे स्वातंत्र्य हिरावून घेणारे हे महाराव आहेत तरी कोण? महाराव ही अतिशय अतिसामान्य व्यक्ती असल्यामुळे या लेखात त्यांचा एवढा समाचार पुरे आहे.
मूळ मुद्दा असा आहे की लालबागच्या दर्शनाला येणारे आणि राज ठाकरे यांनी, नास्तिक आहेत, असं म्हटल्यावर त्यावर सारवासारव करून आपण आस्तिक आहोत, असं दाखवणारे ज्येष्ठ नेते Sharad Pawar शरद पवार हे देखील त्या मंचावर उपस्थित होते. हा सगळा गलिच्छ आणि प्रकार सुरू असताना शरद पवार यांनी ज्ञानेश महाराव यांना रोखलं नाही. त्यांना बोलू दिलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक लोक श्रीरामांना मानत असतील, इतकंच काय तर स्वामी समर्थांची भक्तीही करत असतील. त्यांना असा प्रश्न पडत नाही का की, आपला सर्वोच्च नेता अशा मंचावर उपस्थित राहतो, जिथे आपल्या देवाची आणि संतांची टिंगल जाते. तर आपल्या नेत्याचं याबद्दल नेमकं काय मत आहे? त्यांनी एकदा हे स्पष्ट नको का करायला? अहो, स्वामी समर्थांची भक्ती करणारे भक्त अतिशय सज्जन आणि सामान्य कुटुंबातले आहेत. त्यांच्या भक्तीने कुणालाही इजा पोहोचत नाही. उलट भक्तांना आनंदच मिळतो. त्यांची उपासनादेखील सात्त्विक आहे. हा त्यांचा आनंद हिरावून घेण्याचा अधिकार कुणालाच अशा भक्तीला अंधश्रद्धा म्हणता येत नाही. उलट अंधश्रद्धा कशाला म्हणावं? तर माझाच देव खरा आहे, दुसर्यांचा देव खोटा आहे आणि माझ्या देवाला न मानणार्या लोकांना जगण्याचा अधिकार नाही, त्यांना मारून किंवा मारता मारता मरून मला स्वर्गात गेल्यावर अनेक बायका उपभोगायला मिळतील. याला अंधश्रद्धा म्हणू नये का?
Sharad Pawar : शरद पवार यांना जाणता राजा म्हटलेलं आवडतं. मग जाणत्या राजाची कर्तव्ये त्यांनी नको का पार पाडायला? शरद पवार ज्ञानेश महाराव यांना ज्येष्ठत्वाच्या अधिकाराने थांबवू शकत होते. मी आस्तिक आहे आणि राम हा माझा देव आहे, तू माझ्या देवावर गलिच्छ टीका करू शकत नाही. असं म्हणत वडिलकीच्या नात्याने त्यांचे कान धरू शकत होते. पवार गप्प राहिले. पवारांच्या मनात जे होतं, तेच महाराव म्हणाले का? हिंदू देवदेवतांची, संतांची टिंगल उडवली जात असताना त्यांना दिव्य आनंद प्राप्त होतो का? त्यांना हिंदू या शब्दाचा तिटकारा वाटतो का? अशी शंका आणि असे अनेक प्रश्न आपल्या मनात निर्माण होऊ शकतात. मला एक प्रश्न पडतो, शरद पवारांनी ५० राजकारण केले. या ५० वर्षांत त्यांनी नेमकं काय मिळवलं? सुप्रिया सुळे आणि इतर राष्ट्रवादीचे नेते पवारांचा गौरव करतात त्यानुसार शरद पवार नावाचं इतकं दिग्गज नेतृत्व गेली ५० वर्षे महाराष्ट्रात राजकारण करत होतं, त्यातली अनेक वर्षे पवार सत्तेत सहभागी होते, मुख्यमंत्रिपदावर विराजमान होते, या ५० वर्षांत महाराष्ट्रात पवारांच्या नेतृत्वाखाली असा आमूलाग्र बदल घडला? पवारांनी जातीजातीतील भांडणं मिटवली का? मराठ्यांच्या व एकंदर महाराष्ट्राच्या हिताचे कोणते चांगले निर्णय त्यांनी घेतले? की त्यांनी ज्ञानेश महाराव यांच्यासारख्या द्वेष पसरवणार्या लोकांना प्रोत्साहन देऊन मराठी माणसाच्या मनात गोंधळ निर्माण केला? ज्ञानेश महाराव यांनी स्वामी समर्थांवर टीका केली. तर स्वामींचं एक वाक्य भक्तांमध्ये प्रचलित आहे. भिऊ मी तुझ्या पाठीशी आहे! शरद पवार देखील ज्ञानेश महाराव यांच्यासारख्या खलप्रवृत्तीच्या, द्वेष पसरवणार्या लोकांना सांगत असतील का की, भिऊ नका, मी तुमच्या पाठीशी आहे! अशी शंका सर्वसामान्य हिंदूंच्या, मराठी माणसाच्या आणि श्रद्धाळूंच्या मनात निर्माण झालेली आहे आणि पवारांनीच पुढे येऊन या शंकांचे निराकरण करायचे आहे. तूर्तास, सर्वांना राम राम!