अचलपूर न.प.चा दिवाबत्ती विभाग झोपेत

- अनेक भागातील पथदिवे बंद

    दिनांक :17-Jan-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा 
अचलपूर, 
अचलपूर नगर परिषदेचा दिवाबत्ती (Street Lights) विभाग कुंभकर्णी झोपेत असल्याचे चित्र परतवाडा अचलपूर शहरात दिसत आहे. शहरातील मुख्य कार्यालय असलेल्या उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय, दिवाणी व सत्र न्यायालय, राजा शिवाजी विद्यालय परिसर , क्रीडा संकुल, एलआयसी चौक, ऑक्सिजन पार्क या भागातील पथदिवे बंद असल्यामुळे सायंकाळी उशिरापर्यंत व्यायामाकरिता मैदानावर आलेल्या मुला-मुलींना तसेच सकाळी हवा पालट करण्याकरिता ऑक्सिजन पार्ककडे जाणार्‍या लोकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. याच भागात आधी अनेकदा चाकू लावून अनेकांना लुटण्याचा प्रयत्न देखील झाला आहे. तरीही गेल्या अनेक दिवसापासून या भागातील पथदिवे पूर्णतः बंद असून सध्या प्रशासक असलेल्या उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय देखील अंधारात डुबले आहे.
 
Street Lights
 
अचलपूर नगर परिषदेच्या दिवाबत्ती विभागाचा कारभार पार ढेपाळला आहे. शहरातील अनेक भागातील पथदिवे (Street Lights) बंद असून वारंवार तक्रार केल्यावरही संबंधित विभागाचे कर्मचारी तसेच अधिकारी तक्रारींना केराची टोपली दाखवत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे . सर्वसामान्य नागरिकांच्या केलेल्या तक्रारी दाखल देखील घेत नसून शहरातील मुख्य कार्यालयीन परिसर असलेल्या उपविभागीय कार्यालय, ऑक्सिजन पार्क, एलआयसी चौक, राजा शिवाजी विद्यालय परिसर न्यायालय परिसर या भागातील दिवे काही दिवसापासून बंद आहेत.
 
या भागात असलेल्या राजा शिवाजी विद्यालयाच्या मैदानावर अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या मैदानी परीक्षांची कवायत करीत असतात. त्यात मुले व मुली सर्वच असतात. रात्रीच्या वेळेस उशिरापर्यंत परिसरातील क्रीडा संकुल मैदानावर सराव करत असतात, परंतु जातेवेळी काळोख होत असल्यामुळेअडचणीचा सामना करावा लागत आहे. पालिकेच्या या दिवाबत्ती (Street Lights) विभागाला जाग येण्यासाठी काही लोकांनी तक्रारी देखील केल्या आहे, परंतु या भागातील अजूनही दुरुस्ती झाली नाही . शहरातील मुख्य वस्तीतच दिवाबत्तीची अशी स्थिती असेल तर इतर भागातले विचारायला नको. वारंवार तक्रार देऊन देखील कर्मचार्‍यांचा तुटवडा असल्यामुळे काम होत नसल्याचे कर्मचार्‍यांचे म्हणणे असले तरी कुठली अप्रिय घटना घडण्यापर्यंत नगरपरिषद प्रशासन जागे होणार नाही का, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.