होशंगाबाद रेल्वेस्थानकाचे नाव झाले नर्मदापुरम्

    29-Jan-2023
Total Views |
भोपाळ, 
पश्चिम मध्य रेल्वेने मध्यप्रदेशातील होशंगाबाद रेल्वेस्थानकाचे नाव बदलून ते आता नर्मदापुरम् (Narmadapuram) असे केले असल्याची माहिती अधिकार्‍याने आज रविवारी दिली. पश्चिम मध्य रेल्वेने शनिवारी एक निवेदन जारी करीत रेल्वेस्थानकाचे नाव नर्मदापुरम् असे करण्यात आले असून, त्याला एनडीपीएम असे लघुनाव देण्यात आल्याची घोषणा केली होती. भोपाळपासून 75 किमीन अंतरावर असलेल्या होशंगाबादचे नाव बदलून ते नर्मदापुरम् करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात मान्यता दिली होती.
 
Narmadapuram
 
या आठवड्याच्या सुरुवातीला राज्य सरकारने एक राजपत्रित अधिसूचना जारी केली. केंद्राने शहराचे आणि रेल्वेस्थानकाचे नाव बदलण्यास ‘ना हरकत’ मंजूर केले असल्याचे या अधिसूचनेत म्हटले आहे. मागील वर्षी होशंगाबादचे नाव बदलण्यास मंजुरी देताना केंद्राने नर्मदापुरम् (Narmadapuram) जिल्ह्यातील बबई शहराचे प्रख्यात हिंदी कवी आणि पत्रकार माखनलाल चतुर्वेदी यांच्या नावावरून माखननगर असे नामकरण करण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी दिली होती. मध्यप्रदेश सरकारे 2021 मध्ये हबीबगंज रेल्वे स्थानकाचे नाव बदलून गोंड राणीच्या नावावरून राणी कमलापती असे केले होते. राज्य सरकारच्या संकेतस्थळानुसार, होशंगाबादचे नाव घोरी वंशाचा दुसरा राजा आणि माळवा प्रांत जिंकणार्‍या होशंग शाह घोरी याच्या नावावर ठेवण्यात आले. नर्मदापूर हे या शहराचे पूर्वीचे नाव होते.