पुसद,
शनी मंदिराजवळ असलेल्या मोटरसायकल दुरुस्तीचे दुकानात ठेवलेले हवा भरण्याचे यंत्र Compressor explosion (कॉम्प्रेसर) फुटल्यामुळे या दुकानात काम करणार्या कामगाराच्या हाताचा तुकडा पडला. त्याला तातडीने उपचारार्थ दवाखान्यात दाखल करण्यात आले. पुसद आगाराच्या भिंतीला लागूनच मोटरसायकल दुरुस्तीचे दुकान आहे. नित्याप्रमाणे दुकानातील कामगाराने शुक‘वारी सकाळी आपले दुचाकी दुरुस्तीचे दुकान उघडले. दुकानांमध्ये असलेले हवा भरण्याचे यंत्र सुरू केले. ते सुरू होताच त्यामध्ये जोरदार स्फोट झाला.
(संग्रहित छायाचित्र)
उच्चदाबामुळे हवा भरण्याची टाकी फुटल्यामुळे दुकानात असलेल्या कामगाराच्या हाताचा तुकडा पडला. या स्फोटाचा आवाज एवढा मोठा होता की परिसरातील नागरिकांना आवाज कशाचा झाला हे कळायला मार्ग नव्हता. लोकांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली असता दुचाकी दुरुस्तीच्या दुकानातील हवा भरण्याच्या Compressor explosion कॉम्प्रेसरचा स्फोट झाल्याचे लक्षात आले. यावेळी दुकानातील कामगार हात तुटून पडल्यामुळे विव्हळत पडला होता. परिसरातील नागरिकांनी त्याला तातडीने जवळच्याच डॉ. जाधव यांच्या दवाखान्यामध्ये उपचारार्थ नेले. त्याची प्रकृती गंभीर असल्यामुळे डॉ. जाधव यांनी त्याला नांदेड येथे घेऊन जाण्याचा सल्ला दिला. गंभीर अवस्थेत असलेल्या या दुखापतग्रस्त युवकास तातडीने पुढील उपचारार्थ हलविण्यात आले. कॉम्प्रेसर स्फोटामुळे शहरामध्ये विविध चर्चेला उधाण आले होते. नागरिकांमध्ये काही क्षणासाठी भीतीचे वातावरण निर्माण होऊन दहशत निर्माण झाल्याचे दृश्य पहावयास मिळत होते.