रेणुकेच्या दर्शनासाठी माहुरगडावर लिफ्ट आणि स्कायवॉक
15 Oct 2023 20:33:16
नवोदय नागपूरचा!
- पराग जोशी
नागपूर,
Nitin Gadkari : महाराष्ट्रातील शक्तिपीठांपैकी एक असलेल्या (Renuka mata) रेणुका मातेच्या दर्शनार्थ देशभरातून मोठ्या संख्येने भाविक येतात, त्यात ज्येष्ठांचे प्रमाण अधिक असते आणि गडावर जाण्यासाठी २०० ते २५० पायऱ्या चढाव्या लागतात, ज्येष्ठांना आणि बालकांना होणारी नेमकी अडचण रेणुकेचे भक्त आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी हेरली आणि आता त्यांच्या संकल्पनेतून माहुर गडावर लिफ्ट आणि (Skywalk) स्कायवॉकची सोय करण्यात येत आहे. नितीन गडकरी यांच्या वेधक दृष्टीमुळे नजिकच्या रेणुकेच्या भक्तांना फार परिश्रम न घेता, विनासायास दर्शनाचा लाभ होणार आहे.
माहुरचे शक्तीपीठ प्रत्यक्षात ते नांदेड जिल्ह्यात वसलेले आहे. माहुरचा परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. माहुरगडाच्या संपूर्ण मार्गावर हिरवाई आहेच, आता स्कायवॉकचा महत्वाकांक्षी प्रकल्प साकारत असल्याने नाममात्र दरात सुलभरीत्या दर्शनाचा लाभ घेणे भाविकांना शक्य होणार आहे. केंद्र शासनाच्या विशेष निधीतून हा प्रकल्प आकारास येणार आहे. मुख्य म्हणजे या प्रकल्पात लोअर स्टेशन, स्कायवॉक आणि अप्पर स्टेशन असे तीन भाग असणार आहेत. यात प्रत्येक स्टेशनवर दहा दुकाने, किचन स्टोअरसह महिला, पुरुष व दिव्यांगांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, प्रतीक्षालय व लिफ्ट टॉवर राहणार आहे. विशेष म्हणजे प्रत्येक टॉवरवर चार लिफ्ट असून त्यांची प्रत्येक़ी क्षमता २० भाविकांची असणार आहे.(Skywalk) स्कायवॉकची एकूण लांबी ७०.५ मीटर व रुंदी १५ मीटर असणार आहे. यासोबतच २२ दुकाने, पायी चालण्यासाठी ३.५० मीटर रुंदीचे रस्ते असणार आहेत. भविष्यात याठिकाणी एस्केलेटर बसविता येईल, अशी अग्रीम तरतूद राहणार आहे.
अप्पर टॉवरमध्ये भाविकांसाठी प्रतीक्षालय, महिलांसाठी हिरकणी कक्ष, पिण्याचे शुद्ध पाणी, दिव्यांग आणि ज्येष्ठांसाठी रांगेची स्वतंत्र व्यवस्था, स्टेनलेस स्टीलचे कठडे असलेल्या नागमोडी दर्शन रांगा, मार्गातील तिन्ही अप्पर स्टेशनवर देवस्थानच्या कार्यालयासाठी जागा, यासोबतच अत्यावश्यक सुविधांचा देखील या प्रकल्पात अंतर्भाव असून त्यात सशुल्क स्नानाची व्यवस्था, भाविकांचे सामान ठेवण्यासाठी कक्ष, चहा-नाश्त्याची दुकाने, अग्निशमन व्यवस्था, भूमिगत पाण्याची टाकी, सोलर सिस्टीम, डिझेल जनरेटर राहणार आहे.
कायमस्वरुपी व्यवस्था
नितीन गडकरींच्या (Nitin Gadkari) संकल्पनेतून साकारत असलेल्या या प्रकल्पाचा लाभ ज्येष्ठ, दिव्यांग आणि बालकांना होणारच आहे, शिवाय विश्वस्त मंडळाला दर्शनार्थींची गर्दी नियंत्रित करण्यासाठी प्रत्येकवेळी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना एकत्रित पूर्ण होत असल्याने त्याचा वेगळा लाभ होणार आहे. भविष्यात आणखी विस्ताराची तरतूुद असल्याने खर्चातही बचत होईल.