खैरबंधा प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील पीक करपले

20 Oct 2023 19:43:58
तिरोडा,
Khairbandha project योग्य नियोजनाचा अभाव व सिंचन विभागाच्या अधिकारी, कर्मचार्‍यांच्या दुर्लक्षीतपणामुळे खैरबंधा मध्यम प्रकाल्पाच्या लाभ क्षेत्रातील शेकडो एकरातील धान पीक करपले आहे. याचा फटका शेतकर्‍यांना बसला असून संबंधिम विभागाने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना भरपाई द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी किसान आघाडीचे गोंदिया जिल्हाध्यक्ष डॉ. योगेंद्र भगत यांनी केली आहे.यंदा गोंदिया जिल्ह्यात सरासरी 92 टक्के पाऊस झाला. खैरबंधा मध्यम प्रकाल्पात क्षमतेच्या 87 टक्के जलसाठा झाला. हा साठा लाभक्षेत्रातील पिकांच्या सिंचनासाठी पुरेपूर आहे. सध्या कमी कालावधीचे धान कापणीला आले आहे. मध्यम व जास्त कालावधीच्या धानाला एका सिंचनाची गरज आहे.
 

Dr.Bhagat 
 
खैरबंधा प्रकल्पात साठा असतानाही प्रकल्प विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांच्या नियोजन शुन्यतेमुळे तालुक्यातील लाभक्षेत्रातील बोरा, परसवाडा, बघोली, अर्जुनी आदी गावातील शेतकर्‍यांची पिके पाण्याअभावी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. पुर्वी करटी कालव्याअंतर्गत या लाभक्षेत्रात पाच दिवसात सिंचन व्हायचे. मात्र अधिकार्‍यांच्या चुकीच्या नियोजनामुळे आता दहा दिवसातही शेती सिंचीत होत नसल्याचे डॉ. भगत यांनी सांगितले. पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता, कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता यांना वारंवार ही बाब लक्षात आणून देखील ते दुर्लक्ष करीत असल्याचे भगत यांचे म्हणने आहे.Khairbandha project परसवाडा, अर्जुनी, बघोली, बोरा या गावातील शेतीला आजही पाण्याचा एक थेंबही मिळालेला नाही. ही पहिलीच वेळ नाही तर सिंचनाच्या बाबतीत या भागातील शेतकर्‍यांशी नेहमीच भेदभाव केला जात असल्याचा आरोप देखील भगत यांनी केला आहे. जलाशयातुन पाण्याचा विसर्ग करण्यापुर्वी कालवे, वितरीकांची स्वच्छता होणे अपेक्षित असताना पाणी सोडून पाच दिवसांनी जेसीबीने कालव्यांची सफाई सुरू आहे.
अन्यथा आंदोलन: डॉ. भगत
सिंचन क्षेत्र हा शेतकर्‍यांसाठी महत्वाचा विषय आहे. या विभागात अधिकारी, कर्मचार्‍यांची अनेक पदे रिक्त आहेत. यामुळे सिंचनाची कामे प्रभावित झाली आहेत. अपुरे मनुष्यबळ व कार्यरत अधिकार्‍यांच्या नियोजनशून्यतेमुळे खैरबंधा मध्यम प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेकडो एकरातील उभे धान पीक सिंचना अभावी करपले आहे. पिकांच्या झालेल्या नुकसानीची जबाबदारी संबंधित अधिकार्‍यांनी घेऊन शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा राष्ट्रवादी किसान आघाडी तीव्र आंदोलन करेल, असा कळकळीत इशारा डॉ. भगत यांनी प्रशासनाला दिला आहे.
Powered By Sangraha 9.0