अर्जुनी मोरगाव,
Ganga Jamuna Mata Mandir विदर्भात सुप्रसिद्ध असलेल्या अर्जुनी मोर. तालुक्यातील बोंडगावदेवी येथील जागृत माता गंगा जमुना देवस्थानात यंदा नवरात्रोत्सवानिमित्त 505 अखंड मनोकामना ज्योती कलशाची स्थापना करण्यात आली असून उत्सवानिमित्त आयोजित यात्रेत मोठ्या संख्येने भाविक सहभागी होत आहे. गंगा जमुना देवस्थानात चैत्र पौर्णिमा व अश्विन नवरात्र असे वर्षातून दोनदा मातेची यात्रा भरते. सन 1840 मध्ये सुरू झालेल्या या उत्सवाला सहा पिढ्यांचा इतिहास आहे.

या मंदिरात सध्या सहाव्या पिढीचे देवस्थानचे गादीचे वारसदार हेमराज मानकर देवीची गादी सांभाळत असून देवस्थानचा कारभार सांभाळात आहेत. गंगा जमुना माता मंदिरात एकूण नऊ देवीचे वास्तव्य आहे. मुख्य मंदिरासमोर काल भैरवी, सिलका माता, मोठा बडेसूर, लहान बडेसूर बाबा, कालीमाता, सती माता अशा नऊ माताचे आशा स्थान असल्याने एकाच मंदिरातून नऊ माताचे एकाच वेळी दर्शन होऊन भाविकांना आपली मनोकामना पूर्ण करण्याचे भाग्य मिळते. Ganga Jamuna Mata Mandir त्यामुळे येथे भाविकांची मोठी गर्दी असते. साकोली अर्जुनी मार्गावर असलेल्या बोंडगावदेवी येथे येणार्यांची पाऊले प्रथम बस स्थानकासमोरील मरिमाय मंदिराकडे वळतात मातेला नतमस्तक झाल्यानंतर 100 फुटावर देवस्थानचे मुख्य पुजारी यांचे समाधी स्थळ आहे. समोर पिंपळवृक्षाची शीतल छाया भाविकांना प्राणवायूची सुखद झुरळ देते. काही अंतरावर बजरंग बलीचे दर्शन होते. नंतर नक्षीदार हत्ती दरवाजातून प्रवेश करून गंगा जमुना मातेचे भव्यदिव्य व आकर्षक मंदिर दृष्टीपथास येते. देवस्थानच्या मुख्य मंदिरात गंगा जमुना मातेचे दर्शन घेण्याचा योग येतो. गंगा जमुना मातेच्या पावनकार्य सिद्धीने बोंडगावला देवी हे नाव जोडून बोंडगावदेवी असे नामाविधान रूढ झाल्याचे गावातील जानकर यांनी सांगितले. मंदिरात अखंड मनोकामना ज्योती कलशाची स्थापना करून घटस्थापना केली जाते. यंदा ठिकठिकाणी भाविकांनी यावर्षी मंदिरात 505 मनोकामना ज्योती कलशाची स्थापना केली आहे.