तुर्कीने हमासच्या प्रमुखाला देश सोडण्यास सांगितले

-जागतिक दबावामुळे झटकले हात

    दिनांक :23-Oct-2023
Total Views |
इस्तंबूल, 
Turkey-Hamas : इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर युद्ध पेटल्यावर दहशतवाद्यांना गाझात लढायला ठेवून स्वतः सुरक्षित आश्रय घेण्यासाठी तुर्कीत गेलेल्या हमासच्या प्रमुखाला तुर्कीने देश सोडण्याचा आदेश दिला आहे. पॅलेस्टाईनला पाठिंबा देणार्‍या तुर्कीने जगाशी वैर नको म्हणून हात झटकत देश सोडण्यास सांगितले. हमासचा राजकीय आघाडीचा प्रमुख इस्माइल हानिया आणि त्याच्या साथीदारांनी देश सोडावा, असे तुर्कीने सांगितले आहे.
 
Turkey-Hamas
 
इस्माइल हानिया हा त्याच्या कुटुंबासह गेल्या काही काळापासून कतारच्या दोहामध्ये राहत असल्याचे सांगितले जात होते. परंतु, आता तो तुर्कीला असल्याचे समजते. 7 ऑक्टोबरला हमासने इस्रायलवर हल्ले केले, तेव्हा हानिया तुर्कीमध्ये होता. इस्माइल हानिया हमासचा प्रमुख आहे. (Turkey-Hamas) गाझापट्टीतील निर्वासित शिबिरात जन्मलेल्या हानियाने शिकत असतानाच हमासमध्ये प्रवेश केला होता. 2006 मध्ये तो पॅलेस्टाईनचा पंतप्रधान झाला. अनेक वर्षांपूर्वी तो गाझापट्टीतून पळून कतारला आला होता. इस्रायलशिवाय अमेरिकेसह इतर देशांनी हमासला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. 2007 पासून गाझापट्टीवर हमासचे वर्चस्व आहे. हमास अनेक वर्षांपासून इस्रायलवर हल्ले करीत आहे. परंतू, यावेळचा हल्ला अतिशय भीषण होता.