एकनाथ रानडेंची शासकीय जयंती साजरी करा

25 Oct 2023 20:56:50
तभा वृत्तसेवा
टिमटाळा, 
Eknath Ranade : कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंदांच्या शिलास्मारकाचे शिल्पकार एकनाथ रानडे Eknath Ranade यांची जयंती शासनस्तरावर साजरी करण्यात यावी, या विषयाला अनुसरून वर्षभरापासून या टेबलावरून त्या टेबलावर धूळ खात असलेल्या निवेदनाची दखल घेत नसल्याचे पाहून टिमटाळा येथील पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते श्रीपाल सहारे यांनी थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना नुकतेच ईमेलवरून निवेदनाद्वारे अवगत करून दिले. त्या निवेदनाची दखल घेत मुख्यमंत्री शिंदे यांनी पुढील कार्यवाहीसाठी सामान्य प्रशासन विभागाला निर्देश दिले आहे.
 
Eknath Ranade
 
सविस्तर वृत्त असे की, जगप्रसिद्ध कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद शिलास्मारकाचे शिल्पकार एकनाथ रानडे यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1914 रोजी महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्याच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यांतर्गत येणार्‍या टिमटाळा या छोट्याशा गावी झाला. सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्‍या एकनाथजींनी उच्चशिक्षा घेऊन देशसेवेचा वसा जोपासत राष्ट्रनिर्माणाचे कार्यही केले. सातासमुद्रापार शिकागो परिषदेवर भारतीयांचा अभिमान उंचावणारे स्वामी विवेकानंदांच्या विचाराने प्रभावित होऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील आपल्या गुरूवर्यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करीत देशातील जनतेकडून एक-एक रूपया जमा करून समुद्रामध्ये कन्याकुमारी येथील शिल्पावर स्वामी विवेकानंदांचे भव्य दिव्य जगप्रसिद्ध असे वास्तुशिल्प उभारणारे Eknath Ranade एकनाथजी रानडे अमरावती जिल्ह्याचेच नव्हे तर संपूर्ण भारताचे प्रेरणास्थान आहे.
 
 
केवळ स्वामी विवेकानंदांचे स्मारक उभारून ते थांबले नाहीत तर त्यांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचावे यासाठी त्यांनी विवेकानंद केंद्राची स्थापना करीत शिक्षण व आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या. एवढेच नव्हे तर संघशाखेत असतांना आताचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांना देशसेवेचे बाळकडूही पाजले. Eknath Ranade एवढे महान कार्य असतांनाही एकनाथ रानडे यांची जयंती शासनस्तरावर साजरी करण्याबाबत शासकीय स्तरावर उदासिनता दिसून येते. त्यामुळे श्रीपाल सहारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ईमेलद्वारे निवेदन सादर केले. या निवेदनाची दखल घेत मुख्यमंत्री शिंदे यांनी सामान्य प्रशासन विभागाला पुढील कार्यवाहीसाठी पाठविले असल्याचा ईमेल प्राप्त झाला आहे.
Powered By Sangraha 9.0