तभा वृत्तसेवा
गुरुकुंज मोझरी,
Tukdoji Maharaj : संपूर्ण जगाला मानवतेचा संदेश देणारे क्रांतिकारी द्रष्टे आणि स्वातंत्र्यसेनानी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची आज 55 वी पुण्यतिथी आहे. 27 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर पर्यंत श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रमात आयोजित करण्यात आला आहे. अत्यंत भावनिक आणि शिस्तबद्ध मौनाचा हृदयस्पर्शी कार्यक्रम 2 नोव्हेंबर रोजी होणार असून त्यानिमित्त राज्यातील संत-भिक्षू, परदेशी पाहुणे, भाविक आणि राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत. 3 नोव्हेंबर रोजी पुण्यतिथी महोत्सवाची सांगता पालखी प्रदक्षिणा, गोपाळकाला आणि व्यायाम प्रात्यक्षिक सादरीकरणाने होणार आहे.
अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवामंडळ, श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रमाने या महोत्सवाचे नियोजन केले असून या सात दिवसीय महोत्सवात दररोज सामुदायिक ध्यान, सामुदायिक प्रार्थना, ग्रामस्वच्छता, प्रवचन, कीर्तन संमेलन (गुरुकुंज वारी), लोकजागर, खंजेरी भजन, योगासन शिबिर, वक्तृत्व स्पर्धा, ग्राम गीताचार्य पदवीदान समारंभ, कार्यकर्ता मेळावा, महिला मेळावा, अभंग गायन असे सर्व कार्यक्रम या महोत्सवात समाविष्ट केले आहे. Tukdoji Maharaj दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो गुरुदेव भक्त पालखीसह श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रमात येणार आहेत. पुण्यतिथी उत्सवाचा प्रारंभ 27 ऑक्टोबर रोजी पहाटे 4.30 वाजता संतांच्या उपस्थितीत राष्ट्रसंतांच्या महासमाधीजवळ तीर्थस्थापना व चरणपादुका पूजनाने होईल. याचवेळी अखंड वीणा वादनाला सुरुवात होणार आहे. महाराजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. महोत्सवात प्रत्येक दिवशी सकाळी 5.30 ते 6 या वेळेत सामुदायिक ध्यानावर विचार व्यक्त होणार आहे. रोज सकाळी 7 ते 8 या वेळेत योगासन आणि प्राणायामाचे प्रशिक्षण होईल.
रोज रात्री 8 ते 10 कीर्तन होणार आहे. 28 ऑक्टोबर रोजी आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 29 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 ते 5 या वेळेत महिला मेळावा होईल. Tukdoji Maharaj 30 ऑक्टोबर रोजी श्री गुरुदेव वारकरी कीर्तन संमेलनाचे उदघाटन होणार आहे. 1 नोव्हेंबरला दुपारी 12 ते 5 या वेळेत ग्रामगीतार्य पदवीदान कार्यक्रम हाईल. शाहीद देवानंद माळी आणि पृथ्वीराज मल्ल यांचा लोकजागर हा कार्यक्रम रात्री 8 ते 10 या वेळेत होईल. 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते 10 या वेळेत नागपूर - अमरावती विद्यापीठाचे नाव बदल या विषयावर परिसंवाद होईल. सकाळी 10 ते 12 अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांची बैठक व सत्कार होईल. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार मार्गदर्शन करणार आहे. 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 6.30 ते 10 या वेळेत अनेक गावातून श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रमात आलेल्या पालख्यांची भव्य मिरवणूक गुरुदेवनगर व मोझरी येथून काढण्यात येणार आहे. सकाळी 10 ते 12 या वेळेत गोपालकाल्याचा कार्यक्रम होणार असून मधुकर खोडे महाराज यांचे कीर्तन होणार आहे. दुपारी 3 ते 5.30 या वेळेत व्यायाम सभा होणार आहे.