Guppy Fish Day राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया, चंडीपुरा, जे.ई. व हत्तीरोग आदी कीटकजन्य आजाराबाबत जनतेमध्ये जागृती निर्माण करून त्यांच्या प्रतिरोध उपाययोजनांच्या अंमलबजावणीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग प्राप्त करून घेण्याच्या दृष्टीने जिह्यातील कायम स्वरूपी व तात्पुरत्या डासोत्पती स्थांनामध्ये गप्पी मासे सोडणे हा जैविक सोपा व स्वस्त प्रतिबंधात्मक उपाययोजना असून 31 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील गावागावांत सामुहिक गप्पी मासे सोडणे दिवस राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितिन वानखेडे यांनी सांगीतले. जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे यांच्या नाविन्यपुर्वक संकल्पनेतुन हा उपक्रम राबविला जाणार आहे.
गोंदिया जिल्हा किटकजन्य आजाराबाबत राज्यात संवेदनशिल जिल्हा आहे. भात शेती, जंगलव्याप्त व तलावांचा जिल्हा म्हणुन जिल्हा राज्यात प्रसिद्ध आहे. पाऊस जास्त प्रमाणात पडत असतो. जिल्ह्याची सिमा मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांना लागुन आहे. शेजारी चंद्रपुर, गडचिरोली जिल्हे लागुन आहेत. या भागात हिवतापाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळतो. बारामाही सर्व भागातुन मजुर व लोकांचे स्थलांतर जिल्ह्यात होत असल्याने Guppy Fish Day हिवतापाचा प्रादुर्भाव होतो. जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हिवताप आजार प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी जिल्ह्यातील आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका व आशा सेविका यांच्यामार्फत डास अळी सर्वेक्षण, जलद ताप सर्वेक्षण, अॅबेटिंग, संडासच्या व्हेंट पाईपला जाळी बसवणे, गप्पी मासे सोडणे तसेच प्रतिबंधात्मक उपाय योजना विषयी आरोग्य शिक्षण देणे, गट सभा घेणे इत्यादी कार्यक्रम नियमितपणे राबविण्यात येतात. लोकसहभागातुन गावागावांत सामुहिक गप्पी मासे सोडणे दिवस ग्रामपंचायतींमार्फत राबविल्यास हिवतापाचा प्रादुर्भाव कमी होण्यास निश्चितच मदत होणार आहे.