मुंबई,
Rajnish Seth : राज्य सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) अध्यक्षपदी पोलिस महासंचालक रजनीश सेठ (Rajnish Seth) यांची नियुक्ती केली आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये पोलिस महासंचालपदी रजनीश सेठ यांची नियुक्ती करण्यात आली होती. आता त्यांच्याकडे ही नवीन जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याआधी एमपीएससीच्या अध्यक्षपदावर असलेले किशोर दत्तात्रय राजे-निंबाळकर यांची सेवानिवृत्ती झाल्यानंतर अवघ्या 10 दिवसांत एमपीएससीला रजनीश सेठ यांच्या रूपात नवे अध्यक्ष मिळाले आहेत.
एमपीएससीचे मावळते अध्यक्ष किशोर राजे-निंबाळकर 22 सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या जागी नवीन अध्यक्ष नेमण्याची प्रकि‘या आधीच सुरू झाली होती. त्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. मु‘य सचिव मनोज सौनिक यांच्या अध्यक्षतेखालील समितीने आलेल्या अर्जांची छाननी करून तीन नावांची यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठविली. या तीन नावांमध्ये रजनीश सेठ, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने आणि वन सेवेतील ज्येष्ठ निवृत्त अधिकारी प्रदीपकुमार यांचा समावेश होता. यात (Rajnish Seth) रजनीश सेठ यांचे नाव आघाडीवर होते.
दरम्यान, याआधी एमपीएससीला पूर्णवेळ अध्यक्ष नव्हता. त्यामुळे आयोगावर पूर्णवेळ अध्यक्ष देण्याची मागणी सातत्याने केली जात होती. त्यानंतर राज्य सरकारने एमपीएससीचे सेवानिवृत्त अध्यक्ष किशोर राजे-निंबाळकर यांची नोव्हेंबर 2021 मध्ये नियुक्ती केली होती. त्यांचा कार्यकाळ हा पदभार स्वीकारल्याच्या दिनांकापासून 6 वर्षांसाठी किंवा वयाची 62 वर्षे पूर्ण होईपर्यंत किंवा यापैकी जे अगोदर घडेल त्या कालावधीसाठी निश्चित करण्याचे अधिसूचनेत नमूद करण्यात आले होते.