भारतीय संस्कृती सर्वांना प्रेमाने जोडणारी सुचिता साने यांचे प्रतिपादन

राष्ट्रसेविका समितीचा विजयादशमी उत्सव

    दिनांक :30-Oct-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
अमरावती, 
Rashtra Sevika Samiti : अत्यंत उच्च जीवनमूल्य असलेली भारतीय संस्कृती, प्रेमाने सर्वांना जोडणारी आहे. आज जरी भारत खंडित दिसत असला तरी तो पुन्हा अखंड भारत म्हणून आम्हाला पाहायला मिळेल, अशी आम्ही आशा करतो व त्यासाठीच प्रयत्न करतो आणि हेच राष्ट्र निर्माणाचे कार्य होय. मात्र त्यासाठी आमचा गौरवशाली, शौर्यशाली इतिहास पुन्हा आठवणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रसेविका समितीच्या वाशीम नगर सहबौद्धिक प्रमुख सुचिता साने यांनी केले.
 
Rashtra Sevika Samiti
 
राष्ट्रसेविका समिती अमरावती नगर शाखेचा (Rashtra Sevika Samiti) विजयादशमी उत्सव 29 ऑक्टोबरला सांयकाळी श्री समर्थ हायस्कूलच्या प्रांगणात साजरा झाला, यावेळी प्रमुख वक्ता म्हणून त्या बोलत होत्या. याप्रसंगी अमरावती येथील वरिष्ठ पोलिस निरीक्षक सीमा दाताळकर या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. महिला सक्षमीकरणाचे समितीचे कार्य अत्यंत महत्त्वाचे असून त्याला माझा सलाम, अशा शब्दात त्यांनी समितीच्या राष्ट्रकार्याचे कौतुक केले. त्याचबरोबर राणी लक्ष्मीबाई सारख्या कर्तबगार महिला तयार होवोत अशी सदिच्छा व्यक्त केली.
 
 
कार्यक्रमाची सुरुवात देवी अष्टभूजा, वंदनीय मावशी केळकर व वंदनीय ताई आपटे यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. तसेच मान्यवरांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले. त्यानंतर ध्वजारोहण, ध्वज प्रणाम व प्रार्थना घेण्यात आली. समितीच्या सेविकांनी विविध प्रात्यक्षिके सादर केली. सर्वप्रथम घोष गण, नियुद्ध , योगचाप याचे प्रात्यक्षिक सादर केले गेले. त्याचबरोबर महिलांच्या योगासन गटाचे प्रात्यक्षिकही सादर झाले. ‘धर्म के लिए समाज के लिए’ हे सांघिक गीत अत्यंत स्फूर्तीदायी ठरले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रश्मी मोहिदेकर यांनी केले. विजयादशमी उत्सवाचे महत्त्व सांगताना विजयादशमी हाच राष्ट्रसेविका समितीचा स्थापना दिवस असल्यामुळे हा उत्सव विशेष महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
मणिबाई गुजराती हायस्कूलच्या मुख्याध्यापिका अंजली देव यांचा सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल यावेळी सन्मान करण्यात आला. मंचावर राष्ट्रसेविका समितीच्या विदर्भ प्रांत सह कार्यवाहिका मधुरा पांडे व विदर्भ प्रांत संपर्क प्रमुख माया भारतीय उपस्थित होत्या. (Rashtra Sevika Samiti) राष्ट्रसेविका समितीच्या नगर कार्यवाहिका गौरी लवाटे यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाला समितीच्या ज्येष्ठ सेविकांसह जवळपास 280 बाल, तरुणी व प्रौढ सेविका उपस्थित होत्या. समाजातील सर्व स्तरातील जागरूक महिलांचा उत्तम प्रतिसाद लाभला. वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता झाली. बालसेविका व तरुणी सेविकांनी विशेष परिश्रम करीत उत्सवात चैतन्य निर्माण केले.