- आ. मेघना बोर्डीकरांचा खा. सुप्रिया सुळेंना सवाल
मुंबई,
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या पृष्ठभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार शिंदे-फडणवीस सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत असताना भाजपाच्या आमदार Meghna Bordikar मेघना बोर्डीकर यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार पलटवार केला. बोर्डीकरांनी शरद पवारांच्या 40 वर्षांच्या सत्तेचा इतिहासच बाहेर काढला आहे. आम्हाला 40 दिवसांत काय केले? असा प्रश्न विचारता, मग तुमच्या वडिलांनी 40 वर्षांत मराठा समाजासाठी काय केले, याचे उत्तर द्याल का, असा बोचरा सवाल मेघना बोर्डीकर यांनी सुप्रिया सुळे यांना केला.
मराठा आरक्षण आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन आमदारांची घरे जाळली गेली. या मुद्यावर संतप्त होऊन सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितला. या मुद्यावरही बोर्डीकर यांनी सुप्रिया सुळे यांना चांगलेच धारेवर धरले. मेघना बोर्डीकर म्हणाल्या, आमच्या सरकारने मराठा आरक्षणासाठी 40 दिवसांमध्ये काय केले, असा सवाल सुप्रिया सुळे विचारतात; पण 1980 पासून मराठा समाज आरक्षण मागत आहे. तेव्हापासून आपले वडील शरद पवार यांना मराठा समाजाने डोक्यावर घेतले. आपल्या वडिलांना आणि घराण्याला सत्ता दिली. मग गेल्या 40 वर्षांमध्ये आपण मराठा समाजासाठी काय केले, हे मी मराठा समाजाची मुलगी म्हणून आपल्याला विचारत आहे. 40 वर्षांत तुम्ही मराठा समाजासाठी काम केले असते, तर आज माझ्या तरुण मराठा बांधवाला रस्त्यावर उतरण्याची वेळ आली नसती.
मनोज जरांगे पाटलांचे उपकार माना. त्यांनी मराठा समाजाला जागे केले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाच्या काळात मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण दिले होते. ते हायकोर्टापर्यंत टिकवून दाखवले होते, पण त्यानंतर तुमचे वडील शरद पवार यांच्या कृपेने महाराष्ट्रावर लादलेले सरकार आले. हायकोर्टात टिकलेले आरक्षण ठाकरे-पवार सरकारच्या नाकर्तेपणामुळे सुप्रीम कोर्टात टिकले नाही. तेव्हा सुप्रियाताई, तुम्ही मूग गिळून का गप्प बसला होता, या प्रश्नाचेही उत्तर मराठा समाज मागत आहे.
तरुणांना भडकवू नका
सुप्रियाताई, आज तुम्ही मराठा आरक्षणासाठी कळवळा आणला, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसमोर शपथ घेतली आहे. त्यामुळे ते मराठा समाजाला आरक्षण देतीलच. आम्ही सत्ताधारी पक्षाचे आमदार असलो तरी, सरकारला मराठा आरक्षणावर जाब विचारतच राहू. तेव्हा तुम्ही मराठा समाजाच्या तरुणांना भडकवायचे काम करू नये, ते आम्ही सहन करणार नाही, असेही Meghna Bordikar मेघना बोर्डीकर यांनी स्पष्ट केले.