हुतात्मा देवीप्रसादला स्त्राश्रू निरोप

05 Oct 2023 21:06:22
गोंदिया,
Martyr DeviPrasad : ‘अमर रहे अमर रहे, वीर जवान अमर रहे... वंदे मातरम्.. भारत माता की जय’च्या घोषात महालगाव (ता. जि. गोंदिया) येथील हुतात्मा देवीप्रसाद (मुन्ना) राधेश्याम लिल्हारे (43) यास स्राश्रू नयनांनी आज, 5 ऑक्टोबर रोजी अखेरचा निरोप देण्यात आला. मंगळवार, 3 ऑक्टोबर रोजी हिमाचल प्रदेशातील सिमला येथे कर्तव्य बजावताना देवीप्रसाद यांचे हृदयघाताने निधन झाले होते.
 
Martyr DeviPrasad
 
देवीप्रसाद (Martyr DeviPrasad) हे हिमाचल प्रदेश येथील सिमला येथे भारतीय सैन्य दलात हवालदार पदावर कार्यरत होते. मंगळवारी कवायती दरम्यान त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला. यातच त्यांची प्राणज्योत मालवली. शासकीय सोपस्कार पार पाडल्यानंतर 4 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता देवीप्रसाद यांचा मृतदेह कामठी येथील सैन्य दलाच्या कार्यालयात पोहोचला. दरम्यान, आज, 5 ऑक्टोबर रोजी कामठी येथून देवीप्रसाद यांचा मृतदेह त्यांचे स्वगाव महालगाव येथे आणण्यात आला. यावेळी हजारो नागरिकांनी त्यांना साश्रू नयनाने आदरांजली वाहिली. गावातून सजवलेल्या रथातून अंत्ययात्रा काढण्यात आली. या वेळी माजी सैनिकांनी साखळी करत अंत्ययात्रेचे नियोजन केले. यात शेकडो नागरिक सहभागी झाले होते. यानंतर देवीप्रसादला स्थानिक स्मशानभूमीत शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी स्थानिक पोलिस दलाने तोफांमधून फैर्‍या झाडून त्यांना श्रद्धांजली दिली.
 
 
प्रशासनातर्फे तहसीलदार अयूब पठाण यांनी (Martyr DeviPrasad) हुतात्मा देवीप्रसाद यांच्या मृतदेहावर पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली. शोक सभेला आमदार विजय रहांगडाले, आमदार विनोद अग्रवाल, माजी आमदार राजेंद्र जैन, माजी आमदार दिलीप बनसोड, जिप अध्यक्ष पंकज रहांगडाले, माजी आ. भेरसिंग नागपुरे, जिप सभापती संजय टेंभरे, पंस सभापती मुनेश रहांगडाले, पुर्ननियुक्ती माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी, शिमला येथील 118 बटालियन, कामठी व नागपूरचे सैन्यदलाचे अधिकारी, पोलिस अधिकारी, देवीप्रसाद यांचे कुटूंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार व हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0