तभा वृत्तसेवा
भंडारा,
Bhandara district : आंनदाचा शिधा वाटपात भंडारा जिल्हा राज्यात तिसरा तर नागपूर विभागात प्रथम क्रमांकावर आहे. जिल्ह्यातील पात्र शिधापत्रिकाधारक 2 लाख 32 हजार 987 लाभार्थ्यांपैकी 2 लाख 30 हजार 352 पात्र लाभार्थ्याना आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला आहे. हे वितरणाचे प्रमाण 98.87 टक्के आहे.
राज्यात सातारा, कोल्हापूर या जिल्हयानंतर भंडारा जिल्हयाने आनंदाच्या शिधा वाटपात आघाडी घेतली आहे. तर नागपूर विभागात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. भंडारा जिल्हयात एकूण 889 स्वत धान्य दुकांनाद्वारे आनंदाचा शिधा वाटप सुरू आहे. त्यामध्ये Bhandara district भंडारा तालुक्यात 98.40, लाखांदूर 99.08, लाखनी 99.91, मोहाडी 98.98, पवनी 98.69, साकोली 99.54, तुमसर 98.33 इतके शिधा वाटपाचे प्रमाण आहे. शासकीय स्वस्त धान्य दुकानांमधून फक्त 100 रुपयांत चार वस्तूंचा समावेश असलेल्या आनंदाच्या शिधांचे वाटप करण्यात येत आहे. या चार वस्तूंमध्ये 1 किलो रवा, 1 किलो हरभरा डाळ, 1 किलो साखर आणि 1 लिटर पामतेल आदींचा समावेश असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी यांनी सांगितले. या शिधा वाटपाच्या वितरणाबाबत कोणतीही तक्रार असल्यास जवळच्या तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन वंजारी यांनी केले आहे.