श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला पंतप्रधान येणार

शंकराचार्य स्वामी वासुदेवानंद सरस्वती यांची माहिती

    दिनांक :08-Oct-2023
Total Views |
अयोध्या, 
Shri Ram Temple : पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे प्रमुख यजमान असतील, अशी माहिती श्रीरामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य जगद्गुरू शंकराचार्य स्वामी वासुदेवानंद सरस्वती यांनी माध्यमांशी बोलताना रविवारी दिली. भगवान रामलला आपल्या भव्य दिव्य मंदिराच्या गर्भगृहात विराजमान व्हावेत, हा आपल्या सर्वांचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. श्रीरामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या बैठकीनंतर जगद्गुरू शंकराचार्य पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, काशीतील विद्वान श्रीरामललाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी अयोध्येत येणार आहेत. रामललाची मूर्ती तयार केली जात आहे. उत्सवासाठी 22 जानेवारी रोजी अमृत सिद्धी योग आणि सर्वाधिक सिद्धी योग येत आहे.
 
Shri Ram Temple
 
श्रीरामललाच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी (Shri Ram Temple) श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची दोन दिवसीय महत्त्वाची बैठक शनिवारी मणिराम दास छावणी येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ट्रस्टचे अध्यक्ष आणि मणिराम दास छावणी महंत नृत्यगोपाल दास यांच्यासह ट्रस्टचे 15 पैकी 12 सदस्य उपस्थित होते, तर के. पारासरन् यांच्यासह तीन सदस्य आभासी माध्यमातून सहभागी झाले होते. बैठकीत मंदिर बांधकामाचा आढावा घेण्याबरोबरच प्राणप्रतिष्ठा सोहळ्याबाबत चर्चा करण्यात आली.
 
 
या (Shri Ram Temple) बैठकीला अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास, जगद्गुरू शंकराचार्य स्वामी वासुदेवानंद सरस्वती आणि कोषाध्यक्ष गोविंददेव गिरी, सरचिटणीस चंपत राय, सदस्य राजा बिमलेंद्र मोहन प्रताप मिश्र, नृपेंद्र मिश्र, डॉ. अनिल मिश्र, कामेश्वर चौपाल, जिल्हा दंडाधिकारी नीतिशकुमार यांच्यासह कमलनयन दास शास्त्री उपस्थित होते.