गोंदिया,
Bharat Sankalp Yatra : केंद्र सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचा लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचावेत याची खात्री करण्याच्या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा नावाची देशव्यापी मोहिम केंद्र शासनाकडून आखण्यात आली असून 15 नोव्हेंबर 2023 ते 26 जानेवारी 2024 या कालावधीत देशभरात चित्ररथाच्या माध्यमातून योजनांची जनजागृती करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या मोहिमेच्या माध्यमातून महत्वाकांक्षी योजना लक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवाव्या, अशा सूचना ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ मोहिमेचे गोंदिया व गडचिरोली जिल्हा प्रभारी कुणाल कुमार यांनी केल्या.
नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात गोंदिया जिल्ह्यात ’विकसित भारत संकल्प यात्रा’ Bharat Sankalp Yatra चित्ररथाच्या माध्यमातून 547 ग्रामपंचायतीमध्ये फ्लॅगशिप योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे नियोजित आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील व सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. मोहिमेची सविस्तर माहिती व रूपरेषा सांगताना ते म्हणले, शहरी व ग्रामीण अशा दोन्ही भागात हा चित्ररथ फिरविण्यात येणार असून. शहरी भागासाठीच्या 17 व ग्रामीण भागाच्या 17 अशा एकूण 34 फ्लॅगशिप (महत्वाकांक्षी) योजनांची सचित्र माहिती या चित्ररथावर फ्लेक्स स्वरूपात अंकीत केलेली असेल. त्याच सोबत योजनांची माहिती असलेले मुद्रित साहित्य सुद्धा देण्यात येणार आहे.
ज्या ठिकाणी ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ जाईल त्या गावात आरोग्य शिबिर घेण्यात यावे. या Bharat Sankalp Yatra मोहिमेचे जिल्हास्तरीय नोडल अधिकारी म्हणून अपर जिल्हाधिकारी जबाबदारी सांभाळणार असून मोहिमेसाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मोहीमपूर्व प्रसार प्रसिद्धी करण्यात यावी अशा सूचनाही त्यांनी संबंधित यंत्रणेला केल्या. ते पुढे म्हणले, ही मोहिम यशस्वीरीत्या राबविण्यासाठी अधिकारी व कर्मचार्यांची तालुका प्रभारी व गाव प्रभारी म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. गावात येणार्या चित्ररथाच्या आयोजनाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात येणार आहे. चित्ररथासोबतच सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.