Birsa Munda Jayanti राष्ट्रीय जनजाती गौरव दिनाचे औचित्य साधून बिरसा मुंडा उत्सव समिती राळेगाव व आमदार डॉ. अशोक उईके यांच्या संयुक्त विद्यमाने राळेगावात भगवान बिरसा मुंडा जयंती उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, १५ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता बिरसा मुंडा चौकातून भव्य शोभायात्रा, तर संध्याकाळी ६ वाजता वसंत जिqनग राळेगाव येथे आदिवासी लोकगीत आर्केस्ट्राचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात आदिवासी बांधव, माता भगिनीं व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आ. डॉ. अशोक उईके, बिरसा मुंडा उत्सव समितीचे अध्यक्ष सुधाकर गेडाम, सचिव संदीप पेंदोर, कार्याध्यक्ष दिलीप कन्नाके व सर्व पदाधिकारी यांचे वतीने करण्यात आले.
जननायक, क्रांतिसूर्य, भगवान बिरसा मुंडा यांनी उलगुलानचा नारा दिला. आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी भरीव कामगिरी केली. जल, जंगल, जमीन यांचे रक्षण, हक्क अधिकार व स्वाभिमान याची प्रखर ज्योत प्रज्वलित करण्याचे काम भगवान बिरसा यांनी केले. त्यांचा १५ नोव्हेंबर हा जन्मदिवस राष्ट्रीय जनजाती गौरवदिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निमित्त राळेगाव येथे त्यांच्या अतुलनीय कार्याला उजाळा देण्याकरिता या जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
भव्य शोभयात्रेत लक्षवेधी देखावे, पुष्पवृष्टी, Birsa Munda Jayanti बिरसा मुंडा यांचे जीवनकार्य प्रदर्शित करणारा देखणा चित्ररथ हे आकर्षणाचे केंद्रqबदू असणार आहेत. संध्याकाळी भाऊसाहेब कोल्हे सभागृहात सुप्रसिद्ध आदिवासी गायक रेला रवी मेश्राम व संच यांचा लोकप्रिय लोकगीत व आर्केस्ट्रा होईल. क्रांतिसूर्य बिरसा मुंडा जयंती उत्सवाच्या या अभूतपूर्व सोहळ्याला तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित राहावे व जननायकाच्या अतुलनीय कार्याला उजाळा देऊन, प्रेरणा घेऊन विकासाचा मार्ग प्रशस्त करावा, असे आवाहन बिरसा मुंडा उत्सव समिती राळेगाव व आ. डॉ. अशोक उईके यांनी केले आहे.