प्रासंगिक
- राजीव हिंगवे
Nana Maharaj Taranekar : हिंदू संस्कृतीमध्ये विविध संप्रदायांपैकी एक दत्तसंप्रदाय असून या संप्रदायाला सुमारे 1800 वर्षांचा इतिहास आहे. दत्तप्रभू- नृसिंह सरस्वती- वासुदेवानंद सरस्वती- दत्तावतार प. पू. नाना महाराज तराणेकर अशी गुरू-शिष्यांची मोठी परंपरा लाभलेली आहे. प. पू. नाना महाराज तराणेकर Nana Maharaj Taranekar यांचे हे सपाद (125 वे वर्ष) जन्मशताब्दी वर्ष असून या वर्षाचा समापन सोहळा येत्या 18 व 19 नोव्हेंबर 2023 रोजी नागपुरातील कविवर्य सुरेश भट सभागृहात साजरा होत आहे. त्यानिमित्त नाना महाराज तराणेकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्याचा हा प्रपंच.
भक्तवत्सल चैतन्यानंद सरस्वती नाना महाराज तराणेकर Nana Maharaj Taranekar हे मूळचे मध्यप्रदेशातील श्रीक्षेत्र तराणा येथील होते. प. पू. नानांचे वडील शंकरशास्त्री यांनी दत्तात्रेय परंपरेतील (तृतीय अवतार) प. पू. वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज यांचा अनुग्रह घेतला होता. त्यामुळे प. पू. नाना वयाच्या 5-6 वर्षांपासूनच नानांना स्वामींचा तराणा येथे होणार्या चातुर्मासानिमित्ताने सहवास प्राप्त झाला. घरच्या वेदशाळेत वडिलांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी वेदाभ्यास केला. प्रखर बुद्धीच्या जोरावर नाना महाराज प्रारंभापासून वेदविद्येत पारंगत झाले होते. त्यांनी वयाच्या 12 व्या वर्षी टेंबे स्वामींचा अनुग्रह कठोर अनुष्ठान करून प्राप्त करून घेतला. स्वामींनी त्यांच्या कानात त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी गुरुमंत्र दिला; सोबतच ‘समाधीत ना रमणे तुम्ही जागवावे सुप्त भक्त मानस’ असेही सांगितले. स्वामींकडून गुरुमंत्र आणि पुढील कार्याची दिशा घेऊन उपासनेच्या मार्गावर अग्रेसर झाले. नाना महाराजांनी त्यांच्या तरुणपणात अनेक तीर्थयात्रा केल्या. नर्मदा परिक्रमा, चारधाम, गिरनार यात्रा, हिमालयातील अनेक ठिकाणी जिथे ऋषिमुनी वास्तव्य करतात, त्या ठिकाणी त्यांनी अवघड यात्रा केल्या; जेथे त्यांना महाभारतातील ऋषिमुनींचे दर्शन झाले. श्रीक्षेत्र गाणगापूर हे त्यांचे आवडते स्थान होते. येथील संगमाच्या समोरच 1983-84 साली स्वत:च्या साधनाकाळात भक्तांना संगमावर पारायण व इतर साधना करण्यासाठी शांत असे ठिकाण नव्हते. हे पाहून परमपूज्य नाना महाराजांनी आपल्या देखरेखीखाली भक्तांसाठी ‘साधना भवन’ ही वास्तू निर्माण केली. सन 1984 साली Nana Maharaj Taranekar प. पू. नाना महाराज यांचे यतिपूजन झाले. प. पू. नाना महाराजांनी त्यांच्या जीवनात महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान या राज्यांतील विविध ठिकाणी 32 हून अधिक मोठे यज्ञ केले. अशा या महान योगीचे यज्ञ यागात मिळणारे मार्गदर्शन व सिद्धता पाहून अनेक विद्वान, पंडित त्यांच्यापुढे नतमस्तक होत असत.
नाना महाराज Nana Maharaj Taranekar ज्योतिषशास्त्रात पारंगत होते. शिवाय, संगीतशास्त्राचाही त्यांचा अभ्यास होता. त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी मोठमोठे कलाकार येत असत. पं. कुमार गंधर्व, प. प्रभाकर कारेकर, पं. सी. आर. व्यास, पं. अजित कडकडे, आशाताई खाडिलकर अशी दिग्गज मंडळी नानांपुढे आपली हजेरी सादर करीत असत. बालमनावर बालवयातच चांगले संस्कार झाले पाहिजेत, असे नाना महाराजांना वाटत असे. त्यांनी आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील अनेक मुलांच्या मौंजी स्वत: लावून दिल्या होत्या. नाना महाराजांनी प. पू. वासुदेवानंद सरस्वती लिखित ‘करुणात्रिपदी’ या भक्तिप्रद प्रार्थनेचा सर्व हिंदुस्थानभर प्रसार केला. सामूहिक त्रिपदी प्रार्थनेचे ते जनक समजले जातात. श्री नाना महाराजांच्या उपस्थितीत व आशीर्वादाने त्यांचे नातू बाबा महाराज तराणेकर यांनी अखिल भारतीय त्रिपदी परिवाराची 1992 साली स्थापना केली. त्या माध्यमातून समाजप्रबोधन करायला प्रारंभ केला. नाना महाराजांच्या समाजप्रबोधनात आधुनिक विचारसरणीची पखरण झालेली दिसून येते. श्री नानांनी तरुण पिढीचे वय, विचार, आवड लक्षात घेऊन त्यांना आपलेसे करण्याचा त्या माध्यमातून प्रयत्न केला. आज बाबा महाराजांच्या मार्गदर्शनात त्रिपदी परिवाराच्या देश-विदेशात 350 शाखांमध्ये विस्तार झाला आहे.
प. पू. नाना महाराज Nana Maharaj Taranekar 1993 साली ब्रह्मलीन झाले. त्यांच्या पश्चात त्यांचे नातू डॉ. प. पू. बाबा महाराज तराणेकर हे त्यांचे कार्य पुढे नेत आहेत. डॉ. बाबा महाराज तराणेकर हे वैदिक भूविज्ञान महर्षी असून ते अखिल भारतीय त्रिपदी परिवाराचे प्रमुख आहेत. याशिवाय ते एक व्यासंगी संतसाहित्य संशोधक, लेखक व संपादकही आहेत. गेली 26 वर्षे शांतिपुरुष नागपूर तथा सर्वोत्तम इंदूर या मासिकांचे संपादक म्हणून अविरतपणे कार्य करीत आहेत. त्यांचा अध्यात्मशास्त्राचा, वैदिक परंपरेचा दांडगा अभ्यास आहे. अनेक ठिकाणी त्या अनुषंगाने त्यांचे लेख प्रकाशित झाले असून प्रवचन मालिका संपन्न झाल्या आहेत. विशेष म्हणजे श्रीक्षेत्र कारंजा येथे त्यांनी गुरुचरित्रावर त्रिदिवसीय प्रबोधन मालिका 12 वर्षे तसेच गेल्या 9 वर्षांपासून भागवतावरदेखील ते प्रवचन करीत आहेत. कोरोना काळात ‘चैतन्यपीठ’ या युट्युबवर दर शनिवारी रात्री 8.30 वाजता त्यांची प्रवचने (आत्मसंवाद) प्रसारित होत असतात. अशी 175 पुष्पांची प्रवचने आजपर्यंत झालेली आहेत. ती दृकश्राव्य स्वरूपात इंटरनेटवर उपलब्ध आहेत. मुंबई समाजभूषण, येवला येथे जीवनगौरव, पुणे येथे नानासाहेब पेशवे सन्मान, गाणगापूर येथे यतिपूजन सन्मान, शंकराचार्य सन्मान, श्रीक्षेत्र कारंजा येथे वासुदेव प्रबोधिनी सन्मान, शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते षष्ट्यब्दीपूर्ती सन्मान प्राप्त झालेले बाबा महाराज तराणेकर सर्व हिंदुस्थानात परदेशी त्रिपदी परिवाराच्या विविध शाखांमधून निरनिराळे समाजोपयोगी 35 प्रकल्प चालवत आहेत. Nana Maharaj Taranekar त्यांच्या मार्गदर्शनात 18 व 19 नोव्हेंबर 2023 रोजी नागपुरात दोन दिवसीय नाना महाराज तराणेकर सपाद जन्मशताब्दी सोहळा होत असून या सोहळ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत तसेच देशभरातून संत-महंत मोठ्या सं‘येने उपस्थित राहणार आहेत. दत्तस्वरूप परम सद्गुरू नाना महाराज यांना आदरांजली.
- कार्याध्यक्ष, श्री शांतिपुरुष सेवा संस्था