हारा वहीं, जो लढा नहीं!

    दिनांक :18-Nov-2023
Total Views |
वेध
 
 
संजय रामगिरवार
 
Twelfth Fail : माहिती देणे, शिक्षित करणे आणि सोबत मनोरंजनही करणे हे प्रसार माध्यमांचे काम आहे. यातील चित्रपट हे ताकदीचे जनमाध्यम आहे, असे मानायला हरकत नाही. तसे सारेच चित्रपट बघता येत नाहीत, ते बघूही नये. पण ज्यांना जीवनात आपले भविष्य घडवायचे आहे अशा विद्यार्थ्यांनी कोणते चित्रपट बघावे; किंबहुना त्यांच्या पालकांनी त्यांना कोणते चित्रपट दाखवावे, हा वाटत नसेल पण खूप महत्त्वाचा विषय आहे, जो समजून घेतला पाहिजे. ‘तारें जमीं पर’, ‘थ्री इडियट्स’, ‘लक्ष्य’ यासारखे अनेक चित्रपट विद्यार्थ्यांनी बघितलेच पाहिजेत. तथापि, सध्या ‘ट्वेल्थ फेल’ Twelfth Fail नावाचा विधू विनोद चोपडा यांचा एक अत्यंत चांगला चित्रपट आला आहे. तो तर बघितलाच पाहिजे. वास्तविक जीवनातील चरित्रावर आधारित हा चित्रपट आहे.
 
Twelfth Fail
 
चंबल परिसरात राहणार्‍या एका विद्यार्थ्याची ही संघर्षमय कथा आहे, जो पुढे जाऊन एक आयपीएस अधिकारी होतो. त्या विद्यार्थ्याचे नाव मनोज शर्मा. मनोज शर्मा सध्या डीआयजी पदावर कार्यरत आहेत. Twelfth Fail काही वर्षांपूर्वी ते चंद्रपुरातही जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत होते आणि म्हणून ही कथा जास्त जवळची वाटते. प्रेरक प्रयत्नांनी एका सामाजिक, आर्थिक समस्यांना तोंड देत चंबल येथून येत असतानाही हातात शस्त्र न घेता शिक्षणावर, आपल्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून स्वत:ला सिद्ध करणार्‍या या तरुणाची ही प्रेरणादायी कथा असून चित्रपटात विक्रांत मैसी यांनी ही भूमिका लीलया साकारली आहे.
 
 
मनोज शर्मा यांचे मित्र, ज्यांनी त्यांच्यासोबतच शिक्षण घेतले आणि त्यांच्या संघर्षात सहभागीही राहिले, ते अनुराग पाठक यांनी ‘ट्वेल्थ फेल’ Twelfth Fail नावाची कादंबरी लिहिली. ‘बेस्ट सेलर’ असलेली ही कादंबरी म्हणजे मनोज शर्मा यांच्या संघर्षाची, विश्वासाची कथा आहे. ही कादंबरी वाचून सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते तथा दिग्दर्शक विधू विनोद चोपडा प्रभावित झालेत. कोरोना काळात त्यांनी यावर काम केले. एक अत्यंत प्रभावशाली चित्रपट साकारला आणि 27 ऑक्टोबरला तो प्रदर्शित केला. चित्रपटाचे आणखी एक आकर्षण म्हणजे, युपीएससी परीक्षेसाठी हिंदी माध्यमांच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे खूप मोठे नाव जे मनोजचेही मार्गदर्शक राहिले आहेत, ते विकास दिव्यकीर्ती यांनीही या चित्रपटात काम केले आहे. किंबहुना, त्यांनी चित्रपटातील अनेक घटनांची संहिता लिहिली आहे. अनुराग पाठक यांनी जी कादंबरी लिहिली, त्या कादंबरीवर संस्कार त्यांनीच केले होते.
 
 
बारावीचा निकाल हाती येतो आणि त्यात मनोज नापास होतो. त्यानंतर त्याच्यासमोर प्रश्न उभा राहतो; आता पुढे करायचे काय? टेम्पोत प्रवासी यावेत म्हणून जोरजोराने आवाज देण्यापासून तर पुढे पीठ गिरणीत, शौचालयात, कुत्रे फिरविण्यापर्यंतची कामे करणार्‍या मनोजला त्याचवेळी शासकीय कार्यालयांमध्ये जे अनुभव येतात ते जीवघेणे असतात. पण त्यातील एका अधिकार्‍याच्या शब्दाने व कार्याने प्रभावित होऊन मनोजच्या मनात येते, काहीही झाले तरी आपल्याला अधिकारी व्हायचेच आहे. Twelfth Fail गावातून असेच स्वप्न उराशी बाळगून हजारो युवक शहरांत येतात तसेच मनोजही येतो. तेथून ही कथा अशा अनेक सर्वसामान्य तरुणांची होऊन जाते. त्यामुळे या चित्रपटाची कथा केवळ मनोज शर्मा यांची नाही, तर अशा हजारो युवकांची आहे. त्यांच्या संघर्षाची आहे.
 
 
‘रि स्टार्ट’ हे या चित्रपटाचे ब्रीवाक्य आहे; जे खूप मोठा आशय व्यक्त करणारे आहे. एकदा अपयश आले की सारे संपत नाही. उलट त्यापेक्षा जास्त ताकदीने पुढे नेले तर उज्ज्वल यश आपली वाट पाहत असते, हे सांगणारे हे शब्द आहेत. जे मनोज शर्मा प्रत्यक्षात जगले आहेत. स्वप्न पाहण्यासाठी पैसे लागत नाहीत. Twelfth Fail मात्र, स्वप्न मोठ्या प्रयत्नांची अपेक्षा नक्की करीत असते. ते देता आले तर स्वप्न पूर्ण होतात अन्यथा हताशा नशिबी येते. मनोज शर्मा यांना हताश व्हायचे नव्हते. त्यामुळे त्यांनी अपार कष्ट सहन केले. त्याचे फळ त्यांना मिळाले. पण अनेक विद्यार्थी असे असतात जे प्रयत्न करतात, कष्टही घेतात; पण नशीब कुठेतरी त्यांची साथ देत नाही. अशा विद्यार्थ्यांनीही हताश होऊ नये तर त्यांचा ‘प्लॅन बी व सी’ समोर ठेवला पाहिजे. कदाचित त्यांचा ‘प्लॅन बी किंवा सी’ हा ‘प्लॅन ए’ पेक्षा जास्त चमकदार ठरेल.
 
- 9881717832