- डॉ. भालचंद्र माधव हरदास
निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखादमृतद्रवसंयुतम्।
पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुकाः।
भक्तिरसाची आवड असणार्या मर्मज्ञ भक्तांनो! हे श्रीमद् भागवत वेदाच्या रूपातील कल्पवृक्षाचे पिकलेले फळ आहे. श्रीशुकदेवांच्या रूपातील पोपटाच्या मुखाशी संबंध आल्याने ते परमानंदमय झाले आहे. या फळात टरफल, बिया इत्यादींचा यत्किंचितही समावेश नाही. हा मूर्तिमंत रस आहे. जोपर्यंत देहात चैतन्य आहे तोपर्यंत केवळ पृथ्वीवरच उपलब्ध असणार्या या परमात्मरसाचे सेवन करीत राहा.
सदा सेव्या सदा सेव्या श्रीमद् भागवती कथा।
यस्याः श्रवणमात्रेण हरिश्चित्तं समाश्रयेम्
अर्थोऽयं ब्रह्मसूत्राणां भारतार्थविनिर्णय:।
गायत्रीभाष्यरुपोऽसौ वेदार्थपरिबृंहित:॥
श्रीमद् भागवत कथेचे सदैव सेवन व आस्वाद घ्यावा. या कथेच्या केवळ श्रवणाने श्रीहरी नारायण हृदयात वास करतो. श्रीमद भागवत महापुराण, सर्व धर्मग्रंथ, महाभारत आणि त्यानंतरच्या गीताशास्त्राचा अंतिम निर्णायक ग्रंथ आहे. मग असे हे वचनामृत सामान्य मर्हाटी साधकांना त्यांच्या भाषेत- स्वभाषेत का मिळू नये, असा प्रश्न प्रतिष्ठान नगरीतील शांतिब्रह्म Eknath Maharaj एकनाथ महाराजांना पडला आणि या प्रश्नाच्या उत्तरात मर्हाटीजनांना लाभले प्रासादिक मर्हाटीत रचलेले ग्रंथकौस्तुभ श्रीएकनाथी भागवत!
Eknath Maharaj एकनाथांचा जन्म संतांच्या कुळात झाला. त्यांचे पणजोबा भानुदास हे महाराष्ट्रातील थोर संत होते. भानुदास महाराजांचे पुत्र चक्रपाणी व त्यांचे पुत्र सूर्यनारायण. एकनाथांचा जन्म पैठण येथे शके 1450 मध्ये रुख्मिणी- सूर्यनारायणाच्या घरी झाला. लहानपणीच मातृपितृवियोग झाल्याने आजोबा चक्रपाणी यांनीच एकनाथांचा सांभाळ केला. भानुदास महाराजांच्या वंशात ते एकटेच राहिल्याने त्यांचे नाव एकनाथ ठेवले गेले. आठव्या वर्षी व्रतबंधांनंतर वेदाध्ययन प्रारंभ झाले. वयाच्या बाराव्या वर्षीच नाथांनी रामायण, महाभारत आणि भागवताचे अध्ययन करून त्यावर प्रगाढ ज्ञान प्राप्त केले होते. भक्तीचा उमाळा आणि आध्यात्मिक ज्ञानाची तळमळ एकनाथांना स्वस्थ बसू देत नव्हती. कलियुगात सद्गुरूशिवाय तरणोपाय नाही, हे ऐकून असल्याने त्यांना सद्गुरूंची ओढ लागली. अशातच एक आकाशवाणी झाली, तुझा सद्गुरू देवगिरीच्या किल्ल्यावर आहे तोच तुला आत्मज्ञान देऊन कृतार्थ करेल.
Eknath Maharaj एकनाथ तडक देवगिरीच्या किल्ल्यावर आले तिथे जनार्दनपंत चाळीसगावकर हे किल्लेदार होते. अत्यंत तेजस्वी, शूर आणि दत्तभक्त असलेले सद्गुरू जनार्दनस्वामी यांना दत्तात्रेय सगुण साक्षात दर्शन देत असत. पुढे विविध प्रसंगी एकनाथांची परीक्षा घेत जनार्दनस्वामींनी एकनाथांना अनुग्रहित केले. पयोष्णी, नर्मदा, तापी, गंगा, गोदावरी, कावेरी, यमुना, तुंगभद्रा आदी नद्यांत स्नान करून संपूर्ण भारताची तीर्थयात्रा त्यांनी पूर्ण केली. भानुदासांचा वंश पुढे चालावा म्हणून आजोबा चक्रपाणी यांनी नाथांचा विवाह लावून द्यावा, अशी विनंती जनार्दनस्वामींना केली आणि त्यांच्या आज्ञेनुसार वैजापूर येथील गिरिजाबाई यांचेशी एकनाथांचा विवाह झाला. ‘धन्यो गृहस्थाश्रम:’ या उक्तीप्रमाणे नाथांनी सर्वाभूती भगवद्भाव ठेवून 42 वर्षे गृहस्थाश्रम पाळला. एकनाथांनी तत्कालीन सामाजिक भेदाभेदांना झुगारून ‘सर्वभूत हिते रत:’ याप्रमाणे शांती ढळू दिली नाही. अनेकप्रसंगी त्यांना निंदानालस्ती व अपमान सहन करावा लागला, परंतु ‘जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत’ या वचनावर अढळ राहुल त्यांनी हे हलाहल पचविले आणि नाथ महाराज शांतिब्रह्म झाले. एकनाथांचे अनेक शिष्य संप्रदाय महाराष्ट्र आणि भारतात विखुरले गेले, ज्यांनी भागवत धर्माचा प्रचार-प्रसार आपापल्या प्रांतात केला. एकनाथांची परंपरा याप्रमाणे-
जो निर्गुण निराभास। जेथुनि उद्भव शबल ब्रह्मास।
आदिनारायण म्हणती ज्यांस। तो सर्वांसी आदिगुरू
तयाचा ब्रह्मा अनुग्रहीत। ब्रह्मा अत्रीस उपदेशीत।
अत्री पाद प्रसादीत। श्री अवधूत दत्तात्रेय।
दत्तात्रेय परंपरा। सहस्त्रार्जुन यदु दुसरा।
जनार्दन शिष्य तिसरा। केला खरा कलियुगी।
जनार्दन कृपेस्तव जाण। समूळ निरसलें भवबंधन।
एका जनार्दनीं शरण। झाली संपूर्ण परंपरा॥
पुढे Eknath Maharaj एकनाथांनी आपला सांप्रदायिक अधिकार शिष्योत्तम गावबा महाराज जे नित्यानंदनाथ म्हणून प्रसिद्ध झाले त्यांना दिला. गावबा महाराजांनीच नाथांचे जलसमाधी निर्याणानंतर अपूर्ण राहिलेले ‘भावार्थ रामायण’ पूर्णत्वास नेले. पुढे एकनाथी संप्रदायाच्या अनेक शाखा-उपशाखा भारतात निर्माण झाल्या. आचार्य जितेंद्रनाथ स्वामी महाराज पीठाधीश्वर असलेल्या अंजनगाव सुर्जीची श्रीदेवनाथ पीठ परंपरा ही पैठणच्या एकनाथांची पट्टाभिषिक्त अखंड अक्षुन्न चालत असलेली विदर्भातील एकमेव परंपरा आहे.
एकनाथांना ज्ञानेश्वरांचा अवतार देखील म्हटले जाते. कारण त्यांनी ज्ञानेश्वरांचे उर्वरित कार्य पूर्ण केले. नाथांनी एकनाथी अभंग गाथा, चिरंजीवपद, रुक्मिणीस्वयंवर, शुकाष्टक टीका, स्वात्मबोध, आनंदलहरी, हस्तमालक टीका, चतुःश्लोकी भागवत, मुद्राविलास, लघुगीता, अनुभवानंद, ब्रिदावळी, हरिपाठ, समाज जागृतीसाठी अभंग, गवळणी व भारुडे यांची विपुल रचना रचना केली. ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर जवळजवळ 250 वर्षांनंतर ज्ञानेश्वरीच्या शुद्धीकरणाचे काम त्यांनी शके 1506 मध्ये पूर्ण केले. संत ज्ञानेश्वरांच्या आळंदी येथील समाधिस्थळाचा शोध व ज्ञानेश्वरांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला. ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरात नित्य पूजेची व्यवस्था लावून आळंदीची समाधी सोहळ्याची कार्तिकी यात्रा एकनाथांनी पुन्हा सुरू केली. नाथ महाराजांनी रचलेल्या साहित्यकृतीत भावार्थ रामायण आणि एकनाथी भागवत या दोन ग्रंथांना भागवत संप्रदायात अनन्यसाधारण महत्त्व आहे.
संत ज्ञानदेव व नामदेव पूर्वकाळापासून वारकरी संप्रदाय चालू आहे. या संप्रदायाला ज्ञानेश्वर माउलींनी ज्ञानेश्वरीच्या रूपाने एक अधिष्ठान दिले. संप्रदायाला निश्चित स्वरूप दिले. संत नामदेवांनी वारकरी संप्रदायाची स्वतःची कीर्तन पद्धती निर्माण केली. संप्रदायाचा प्रसार पंजाबपर्यंत केलाच; याशिवाय विविध संतांची चरित्रे व स्वतःचे चरित्र आत्मचरित्र लिहून एकप्रकारे दस्तऐवजीकरण डॉक्युमेंटेशन केले. ज्ञानदेव-नामदेव काळात संत गोरोबा काका, सावता महाराज, चोखोबाराय, नरहरी महाराज, जनाबाई, मुक्ताबाई, निवृत्तिनाथ, सोपानकाका, सोयराबाई, विसोबा खेचर, परिसा भागवत इ. संत मंडळी या संत मांदियाळीत होती. पुढे शांतिब्रह्म संत एकनाथ महाराजांनी संप्रदायाला भागवत ग्रंथरूपी खांब दिला. जगद्गुरू संत तुकोबा या भागवत संप्रदायरूपी इमारतीचे कळस ठरले. तुकोबांच्या काळात संताजी जगनाडे, रामेश्वर भट्ट वगैरे तुकोबांचे सहकारी होते. तुकोबांच्या पश्चात झालेले संत निळोबाराय हे वारकरी परंपरेतील शेवटचे संत होत. तुकोबांच्या शिष्या असलेल्या व ज्यांना तुकोबांचा प्रत्यक्ष सहभाग लाभला त्या संत बहिणाबाई या इमारतीवरील पताका म्हणजेच ध्वज झाल्या.
संतकृपा झाली।
इमारत फळा आली॥
ज्ञानदेवे घातला पाया।
उभारिले देवालया॥
नामा तयाचा किंकर।
तेणे केला हा विस्तार॥
जनार्दन एकनाथ।
खांब दिला भागवत॥
तुका झालासे कळस।
भजन करा सावकाश॥
बहेणी फडकते ध्वजा। निरुपण आले ओजा॥
वेदांमध्ये जे सांगितले नाही ते श्रीमद् भगवदगीतेत विशद केले आहे. गीतेची कमतरता ज्ञानेश्वरीने भरून काढली तसेच एकनाथी भागवताने ज्ञानेश्वरीची पोकळी भरून काढली, असे संतांनी म्हटले आहे. भगवान दत्तात्रेयांच्या आज्ञेने 1573 मध्ये Eknath Maharaj एकनाथ महाराजांनी भागवताच्या 11 व्या स्कंधावर सविस्तर आणि परिपक्व भाष्य लिहिले. ज्ञानेश्वरी हे श्रीमद भागवतावरील अर्थपूर्ण भाष्य तर नाथ भागवत हे श्रीमद भागवताच्या 11 व्या स्कंधाचे संपूर्ण भाष्य आहे. श्रीमद भागवतात एकूण द्वादश म्हणजेच 12 अध्याय आहेत. त्यातील केवळ एकादश स्कंधावरील ओवीबद्ध मराठी टीका म्हणजे एकनाथी भागवत हा महाकाव्यग्रंथ होय! या ग्रंथात एकूण 21 अध्याय व 18,800 ओव्या आहेत. सर्वांभूती समानता आणि भगवद्भाव हे नाथांच्या शिकवणीचे सार या ग्रंथात जागोजागी अनुभवायास मिळते. भक्तीद्वारे परमार्थाची प्राप्ती करून घेण्याचे सुलभ मार्ग प्रापंचिकांपुढे ठेवणे आणि भागवत धर्माची परंपरा, रीती-नीती आणि सैद्धांतिक भूमिका भागवताच्या आधारे एकनाथांनी निरुपित केली आहे. प्रस्तुत ग्रंथाचे पहिले पाच अध्याय हे पैठण क्षेत्री लिहिले गेले असून उर्वरित 26 अध्याय हे अविमुक्तेश्वर क्षेत्र काशीनगरीत लिहिण्यात आले आहेत. नाथांचा एक शिष्य पहिले पाच अध्याय घेऊन काशीनगरीस आला आणि त्या पाच अध्यायाचे वाचन-पारायण करू लागला. संस्कृत वाङ्मयाचे मराठीकरण न रुचल्याने तत्कालीन धर्माधिकार्यांनी या अध्यायाचे रचियता शांतिब्रह्म एकनाथांना पैठणहून काशीस पाचारण केले. तेव्हा आपल्या प्राणप्रिय मराठीचा कैवारी होऊ नाथ महाराज म्हणतात...
संस्कृत वाणी देवे केली। तरी प्राकॄत काय चोरापासुनि झाली?
ते माझे मर्हाटे आरिख बोल। सद्गुरूंनी केले सखोल।
तेथींच्या प्रेमाचे जे बोल। जाणती केवळ गुरुभक्त
ते श्रीधरीचें व्याख्यान। भावार्थदीपिका जाण।
त्या भावार्थाची सद्भाव खूण। केलें निरूपण देशभाषा
त्याची पक्वान्नें चोखडी। मर्हाटिया पदमोडी।
एका जनार्दनें केली परवडी। ते जाणती गोडी निजात्मभक्त
काशीनगरीत मर्हाटीची बाजू उचलून धरताना Eknath Maharaj नाथ महाराज म्हणतात, ऊस गाळला की त्याचा रस होतो. तो तसाच ठेवला तर फार वेळ टिकत नाही. तो आटवून गूळ तयार करून ढेपाच बांधून ठेवाव्या लागतात, तो गूळ फार दिवस ठेवला तरीसुद्धा पाझरू लागतो. याकरिता त्याची रायपुरी साखर करावी लागते. मग ती साखरही घोटून चतुर लोक स्वच्छ व कोरडी अशी खडीसाखर करतात, त्याचप्रमाणे या भागवताची गोष्ट आहे हे लक्षात ठेवा. ते भागवत प्रथमतः श्रीनारायणांनींच सांगितले आणि त्याचीच श्रीव्यासांनी 10 प्रकारांनी फोड केली. श्रीशुकाच्या मुखाने ती दशलक्षणयुक्त कथा विशद झाल्यामुळे फारच गोडी चढली. त्यातील कठीण शब्द स्पष्ट करून श्रीधरांनी त्यावर फारच उत्तम टीका केली. ती जी श्रीधरी टीका, तिलाच ‘भावार्थदीपिका’ असे म्हणतात. त्याच भावार्थातील रहस्य मी ही भक्तिभावाने देशभाषेत म्हणजे मराठीत निरूपण केले. मूळचा नारायण हा एकच वक्ता आहे आणि त्यावर व्यास, शुक आणि श्रीधर यांनी व्याख्यान केले आहे. त्यातील मूळच्या गोडीवर लक्ष ठेवून एका जनार्दन या काव्याचा कर्ता झाला आहे. मूळ बीज श्रीनारायणांनी ब्रह्मदेवाच्या ठिकाणी पेरले आणि तेच नारदरूप भूमीमध्ये अत्यंत जोमदारपणे पूर्ण तयार झाले. त्याचीच दशलक्षण-भागवतरूपी कणसें व्यासाने संकलित केली आणि शुकाचार्यांनी परीक्षितीच्या खळ्यामध्ये मळणी करून त्यातील दाण्यांची रास केली. तेच दाणे शास्त्ररीतीने आत्मबुद्धीच्या सुपांतून श्रीधरांनी पाखडून काढून त्यातील भरीव टवटवीत व अस्सल दाणे वेगळे निवडले. मराठी शब्दरूपाने उत्तमोत्तम पक्वान्ने करून एका जनार्दनाने त्यांची रेलचेल करून सोडली आहे. आत्मभक्त असतील तेच त्यातील गोडी जाणतील। त्या श्रोत्यांनी लक्ष दिल्यामुळे आणि जनार्दनाची कृपा दक्ष असल्यामुळे एका जनार्दनाने देशीभाषेमध्ये हे पूर्वार्ध संपूर्ण केले. भक्तिरसात ओथंबलेली नाथांची रसाळवाणी ऐकून काशीतील धर्ममार्तंड नाथांना शरण आले. तरीही दुधात मिठाचा खडा टाकावा तसे काही लोकांनी हा ग्रंथ गंगेत बुडवून टाकावा असा आग्रह धरला. मात्र, गंगामाईची कृपा आणि नाथांचा भागवतावर व मराठीवर असलेल्या अनन्यश्रद्धेपोटी हा ग्रंथकौस्तुभ भागवत गंगेवर तरला आणि जनसामान्यात लोकप्रिय ठरला. या घटनेचे स्मरण म्हणून काशीनगरजनांनी एकनाथी भागवताची काशीतील राजमार्गावरून सोन्याच्या अंबारीत हत्तीवर मिरवणूक काढली. जगातील कुठल्याही भाषेतील ग्रंथाचा अशाप्रकारे गौरव होण्याचा हा एकमेवाद्वितीय प्रसंग असावा. आपल्या मराठीजनांसाठी तर हा सुवर्णक्षणच होय. बद्रिकाश्रम प्रवेश नामक 29 व्या अध्यायात तर एकनाथ महाराजांनी मराठीचे कोडकौतुक गातांना अनेक उदाहरणांसह दाखले दिले आहेत.
संस्कृत वंद्य प्राकृत निंद्य। हे बोल काय होती शुद्ध।
हाही अभिमानवाद। अहंता बंध परमार्थीं
तेवीं संस्कृत आटाटी। करीतां परमार्थीं नव्हे भेटी।
तेचि जोडल्या मराठीसाठीं। तेथ घालिती मिठी सज्ञान॥
Eknath Maharaj एकनाथ महाराज म्हणतात, कळसूत्री बाहुल्यांच्या खेळात जसे रुसणे अथवा आनंद होणे हे खेळविणाराच्या हातात असते. बाहुलीला त्याचा अर्थ काहीही कळत नसतो, त्याप्रमाणे सद्गुरू जनार्दनाने माझ्या नावे हे काव्य रचले आहे. सज्जनांनी ही मराठी कथा पाहून ‘ही काहीतरी व्यर्थ बडबड आहे असे मात्र म्हणून नये.’ तर ही कथा आत्मदृष्टीने आत्मज्ञानाची कसोटी लावून बघावी. संस्कृत वंद्य आणि प्राकृत निंद्य हा वादच मुळासकट उपटून काढताना एकनाथ म्हणतात, परमार्थात अहंता सर्वथा अयोग्य आहे.
चकोरां चंद्रामृतप्राशन। वायसां तेथें पडे लंघन।
तेवीं हा महाराष्ट्र ग्रंथ जाण। फळाफळपण ज्ञानाज्ञानें
देवासी नाहीं भाषाभिमान। संस्कृत प्राकृत दोनी समान।
ज्या भाषा केलें ब्रह्मकथन। त्या भाषां श्रीकृष्ण संतोषे
माझी मराठी भाषा उघडी। परी परब्रह्मेंसीं फळली गाढी।
जे जनार्दनें लाविली गोडी। ते चवी न सोडी ग्रंथार्थ
मोलाने माणसे लावून रत्नांची खाण खणीत असता मोठ्या प्रयासाने रत्न सापडल्यास ते घ्यावे आणि तेच रत्न जर केरात सापडले तर शहाण्या माणसाने काय करावं? संस्कृतचा खटाटोप करूनही परमार्थ सहज प्राप्त न झाल्यास आणि तोच मराठीत सापडल्यास सज्ञानी लोक त्यावर उड्या टाकतील. चकोर जेथे चंद्रामृताचे प्राशन करतो तेथे कावळ्याला उपवास घडतो. एकनाथी भागवत हा महाराष्ट्र ग्रंथ आहे जो भेदाभेद न ठेवता समस्तजनांना फल देतो. माझी मराठी भाषा गोजिरवाणी आहे, ती परब्रह्मज्ञानाने फळली आहे त्यामुळे सद्गुरूंच्या आज्ञेने मी हा ग्रंथ मराठीत केला, अशी निःसंदिग्ध ग्वाही नाथ महाराज देतात. 1551 साली एकादशीस सुरू झालेला हा ग्रंथकौस्तुभ इसवी सन 1573 च्या कार्तिक पौर्णिमेला वाराणसी येथील मनकर्णिका घाटावरील पंचमुद्रापीठ श्रीकृष्ण मंदिरात पूर्णत्वास आला.
वाराणसी महामुक्तीक्षेत्र। विक्रमशक ‘वृष’ संवत्सर।
शके सोळाशें तीसोत्तर। टीका एकाकार जनार्दनकृपा
महामंगळ कार्तिकमासीं। शुक्ल पक्ष पौर्णीमेसी।
सोमवारशिवयोगेंसी। टीका एकादशी समाप्त केली
स्वदेशींचा शक संवत्सर। दंडकारण्य श्रीरामक्षेत्र।
प्रतिष्ठान गोदातीर। तेथील उच्चार तो ऐका
शालिवहनशकवैभव। संख्या चौदाशें पंचाण्णव।
श्रीमुख संवत्सराचें नांव। टीका अपूर्व तैं जाहली
एवं एकादशाची टीका। जनार्दनकृपा करी एका।
ते हे उभयदेशाअवांका। लिहिला नेटका शकसंवत्सर
पंध्राशतें श्लोक सुरस। एकतीस अध्याय ज्ञानरहस्य।
स्वमुखें बोलिला हृषीकेश। एकाकी एकादश दुजेनिवीण
एकादश म्हणजे एक एक तेथ दुजेपणाचा न रिघे अंक।
तेंचि एकादश इंद्रियीं सुख। एकत्वीं अलोलिक निडारलें पूर्ण
त्या एकादशाची टीका। एकरसें करी एका।
त्या एकत्वाच्या निजमुखा। फळेल साधकां जनार्दनकृपा॥
ग्रंथ पूर्णत्वास आल्यावर एकनाथांनी लिहिलेल्या समारोपीय कवनात महाराष्ट्रातील तत्कालीन शके 1495 मधील श्रीमुख नाव संवत्सर आणि उत्तर भारतातील विक्रम संवत्सर या दोन्हीचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. ‘उभयदेशा आवाका’ यामधून दोन्ही प्रांतातील सामरस्य उल्लेखित केले आहे. हे महाकाव्य म्हणजे साक्षात श्रीकृष्णाच्या मुखातून स्रवलेले शब्दब्रह्म आहे आणि ते जनार्दनकृपेने Eknath Maharaj एकनाथांनी साधकांपर्यंत पोहोचविले आहे, असे नाथ महाराज प्रतिपादित करतात. संत तुकाराम महाराजांनी भंडारा डोंगरावर नाथ भागवताची सहस्त्र पारायणे केली असल्याचा इतिहास आहे.
यंदाचे वर्ष शके 1945 (इसवी सन 2023) हे शांतिब्रह्म श्रीसंत Eknath Maharaj एकनाथ महाराज समाधीचे चतु:शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (425) वर्ष तथा ग्रंथकौस्तुभ श्रीएकनाथी भागवताचे चतु:शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी (450) वर्ष आहे. या दोन्ही पुण्यपावन तिथीच्या निमित्ताने समस्त नाथभक्त आणि नाथवंशज यांनी एकत्र येऊन श्रीक्षेत्र पैठण येथे भव्य-दिव्य असा अखंड हरिनाम सप्ताह आणि श्रीएकनाथी भागवत पारायण सोहळा 20 ते 27 नोहेंबर 2023 या काळात आयोजित केला आहे. एकनाथांचे 14 वे वंशज ह.भ.प. योगीराज महाराज गोसावी (पैठणकर) यांच्या नेतृत्वात संपन्न होत असलेल्या या ऐतिहासिक सोहळ्यास संत-महंत-वारकरी यांचेसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत विशेषत्वाने उपस्थित राहणार आहेत. या अभिनव सोहळ्याच्या पृष्ठभूमीवर शांतिब्रह्म एकनाथ महाराजांना आणि माय मराठीचा महाराष्ट्र ग्रंथ म्हणून नाथांनी ज्याचा गौरव केला, त्या ग्रंथकौस्तुभ श्रीएकनाथी भागवतास साष्टांग प्रणाम! भानुदास एकनाथ!!
- 9657720242
(लेखक सामाजिक, आध्यात्मिक व धार्मिक विषयांचे अभ्यासक आहेत.)