तभा वृत्तसेवा
वर्धा,
VHP-Bajrang Dal : राम जन्मभूमी आंदोलनाच्या वेळी मंदिर वही बनायंगे व मंदिर भव्य बनायंगे हे दोन संकल्प करण्यात आले होते. पहिला संकल्प पूर्ण झाला आणि दुसरा संकल्प 22 जानेवारी 2024 रोजी पुर्णत्वास जातो आहे. या भव्य सोहळ्याचा उत्सव व्हावा तसेच या कार्यक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे याचे निमंत्रण देण्यासाठी गावागावात विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने अक्षद देणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
स्थानिक गोलबाजार येथे आज 24 रोजी आयोजित पत्रकार परिषदेला रा. स्व. संघाचे नगर संघचालक डॉ. प्रसाद देशमुख, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुभाष राठी, राम मंंदिराचे अध्यक्ष संजीव लाभे, अभियानाचे जिल्हा संयोजक अनिल कावळे व सह संयोजक प्रवीण वखरे उपस्थित होते. यावेळी प्रवीण वखरे म्हणाले की, 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत रामललाची स्थापना होणार आहे. हा आनंद उत्सव देशात साजरा व्हावा यासाठी संपर्क अभियान अक्षदा वितरणाच्या माध्यमातून राबवले जाणार आहे. अयोध्येहून आलेला अक्षदा कलश 27 रोजी सायंकाळी 4 वाजता वर्धेत येणार आहे. दादाजी धुनिवाले चौक येथून स्कूटर रॅलीतून तो कलश राममंदिरात आणण्यात येईल.
10 डिसेंबर रोजी अक्षदा तालुका स्थानापर्यंत पोहोचवण्यात येतील त्यानंतर 1 जानेवारी 2024 पासुन रामभक्त घरोघरी जाऊन अक्षदा वितरण करतील. तसेच गावागावात, मंदिर, शहरं, प्रत्येक मोहल्यातील मंदिरात हनुमान चालीस व राम नामाचा जप करून या अभियानाचा शुभारंभ होईल. 22 जानेवारी रोजी मंदिरांमध्ये हनुमान चालीसा पाठ करून उत्सव साजरा करण्यात येईल तर सायंकाळी प्रत्येकाने आपल्या घरी दिवाळी प्रमाणे दीपोत्सव साजरा करावा, असे आावाहन वखरे यांनी केले. अयोध्येतील सोहळा पाहण्यासाठी मोठ्या स्क्रीन लावण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
लाभे यांनी राम मंदिरात अयोध्येच्या आंदोलनात वर्धेत केंद्रबिंदू होते. त्याच ठिकाणी अयोध्येहून कलश येतो आहे, हे आमचे सौभाग्य असल्याचे सांगितले.1 जानेवारी रोजी नववर्षांच्या स्वागताला दरवर्षी हनुमान चालीसा पठन राम मंदिराच्या वतीने करण्यात येत असल्याचे लाभे म्हणाले. या अभियासाठी जिल्हा, तालुका आणि ग्रामस्तरावर संयोजकांची नियुक्ती करण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्याची संयोजक म्हणून अनिल कावळे व सह संयोजक म्हणून प्रवीण वखरे यांना जबाबदारी देण्यात आली आहे.
वर्धा जिल्हा विहिंप-बजरंगदल तसेच साई मंदिरच्या संयुक्त वतीने साई मंदिरात 16 ते 22 जानेवारी दरम्यान सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रामकथेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली. पत्रकार परिषदेला रा. स्व. संघाचे जिल्हा कार्यवाह मुकुंद पिंपळगाकर, विहिंपचे अटल पांडे, राम मंदिरचे सचिव विजय धाबे, विहिंपचे जिल्हामंत्री बालू राजपुरोहित, शरद कोलप्रतिवार आदींची उपस्थिती होती.