यवतमाळ,
जिल्ह्यात मागील दोन वर्षांपासून वृद्ध Artist Selection Committee कलावंतांच्या निवडीसाठी शासकीय समितीच गठित केलेली नाही. यामुळे नवकलावंतांच्या मानधनाचे प्रस्तावच रखडले आहेत. यामुळे महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीने याविरोधात आवाज उठवत टाळ-मृदंगाचा गजर करीत निवड समिती शोध आंदोलन सुरू केले आहे. यवतमाळातील जिल्हा परिषद कार्यालयासमोर या आंदोलकांनी आपला ठिय्या दिला आहे.
सरकार बदलल्यापासून वृद्ध कलावंतांची निवड समिती स्थापन झालेली नाही. यामुळे नवीन वृद्ध कलावंतांच्या निवडीच्या प्रस्तावाच्या शेकडो फायली धूळ खात आहेत. इतकेच नव्हे तर जिल्ह्यातील कलावंतांना मंजूर झालेले मानधन किरकोळ त्रुटींमुळे दोन वर्षांपासून त्यांच्या खात्यात जमाच झालेले नाही. हे मानधन थेट मंत्रालयातून लाभार्थ्यांच्या खात्यात वळते होते. या प्रकरणात खूपच विलंब होत असल्यामुळे ही प्रकि‘या पूर्ववत करण्यात यावी, अशी मागणी आहे.
Artist Selection Committee : कलावंतांना दरमहा पाच हजार रुपये मानधन अदा करावे, कलावंतांना आत्मनिर्भर आणि आर्थिक सक्षम करण्यासाठी कलावंत आर्थिक विकास मंडळाची राज्यस्तरावर निर्मिती करावी, वृद्ध कलावंतांना शासकीय मानधन पात्रतेसाठी 50 वर्षांची अट आणि उत्पन्न मर्यादा शिथिल करण्यात यावी, यासाठी कलावंतांचे वय 40 वर्षे, तर उत्पन्नाची अट लाख रुपयांची ठेवण्यात यावी, या मागण्यांसाठी कलावंतांचे हे आंदोलन सुरू आहे. महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीचे प्रदेश महासचिव अॅड. श्याम खंडारे, विभागप्रमुख मनोहर शहारे, कार्याध्यक्ष सिद्धार्थ भवरे, जिल्हाध्यक्ष डॉ. मदन वरघट, जिल्हा संघटक अशोक उन्नतकर, महिला संघटक मृणालिनी दहीकर, रमेश वाघमारे, गुणवंत लकडे, किसन राठोड आदी उपस्थित होते.