नवी दिल्ली,
India growth rate : यंदाच्या आर्थिक वर्षात भारताच्या आर्थिक विकासाचा वेग 6.4 टक्के राहणार असल्याचा सुधारित अंदाज एस अॅण्ड पी या जागतिक मानांकन संस्थेने सोमवारी वर्तवला. हा दर 6 टक्के राहणार असल्याचा अंदाज यापूर्वी वर्तवला होता. देशांतर्गत मिळालेल्या मजबूत पाठबळामुळे महागाईच्या वाढलेल्या दराचा आणि घसरलेल्या निर्यातीचा प्रतिकूल परिणाम यावर पडू शकलेला नाही, असे संस्थेने म्हटले आहे. मात्र, वाढ मंदावण्याची अपेक्षा, जागतिक वृद्धीवर होणारा परिणामामुळे पुढील आर्थिक वर्षात वृद्धीचा दर 6.9 टक्क्यांवरून 6.4 टक्क्यांवर येईल, असेही एस अॅण्ड पीने म्हटले आहे.
यंदाच्या आर्थिक वर्षातील India growth rate भारताच्या आर्थिक विकासाच्या दरात आम्ही 6 टक्क्यांवरून 6.4 टक्के अशी सुधारणा करीत आहोत, असे या संस्थेने सांगितले. एस अॅण्ड पीचा अंदाज हा इतर मानांकन संस्थांच्या तुलनेत जास्त आहे. यापूर्वी आयएमएफ, जागतिक बँक, आशियाई विकास बँक आणि फिचने यंदाच्या आर्थिक वर्षात भारताच्या आर्थिक विकासाचा वेग 6.3 टक्के राहणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. यंदा आणि पुढच्या आर्थिक वर्षात आर्थिक विकासाचा दर 6.5 टक्के राहील, असा अंदाज भारतीय रिझर्व्ह बँकेने वर्तवला आहे.