पुणे,
दक्षिण अंदमान समुद्र आणि लगतच्या भागात Cyclone Michong कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. ते पुढे तामिळनाडू-ओडिशाच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. त्यानंतर शुक्रवारी बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची निर्मिती होऊन, ते तीव्र होण्याची शक्यता आहे. दरम्यान, तामिळनाडू, ओडिशा आणि आंध्रप्रदेशात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली. पुणे हवामान विभागाचे डॉ. के. एस होसाळीकर यांनीदेखील ट्विटरवरून या संदर्भातील माहिती दिली आहे.
सोमवारपासून दक्षिण अंदमान समुद्र आणि लगतच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे, असे हवामान विभागाने सांगितले. हे कमी दाबाचे क्षेत्र हळूहळू ईशान्येकडील दिशेने सरकेल आणि बुधवारी 29 नोव्हेंबरपर्यंत आग्नेय बंगालच्या उपसागरात दबावात बदलू शकते. त्यानंतर पुढील 48 तासांत नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात हे चक्रीवादळ आणखी तीव्र होईल. या चक्रीवादळाला मिचॉन्ग असे नाव देण्यात आले आहे. गेल्या महिन्यात 21 ऑक्टोबर रोजी ईशान्य मान्सून सुरू झाल्यानंतर बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार झाले आणि ते बांगलादेशकडे सरकले. याच महिन्यात मिथिली चक्रीवादळ बांगलादेशच्या किनारपट्टीवर धडकले. दोन्ही वादळे पुढे सरकली नसल्याने कोणत्याही ठिकाणी पावसाचीही नोंद झाली नाही. Cyclone Michong मिचॉन्ग चक्रीवादळ मंगळवारी आंध्रप्रदेश आणि दक्षिण ओडिशा किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.