भारताची तरुणाई : जगाला आशादायी

    दिनांक :28-Nov-2023
Total Views |
इतस्तत:
- दत्तात्रेय आंबुलकर
भारतातील मोठ्या संख्येतील Indian Youth तरुणाईच्या स्वरूपातील सक्षम युवाशक्ती ही भारत आणि भारतीयांसाठी सकारात्मक बाजू ठरली आहे. जागतिक बँकेसह विविध विकसित व विकसनशील देशांनी भारताच्या या शक्तिस्थानाची नोंद नेमकी कशी आणि कशाप्रकारे घेतली, याचा पडताळा पाहणे लक्षणीय ठरते. जागतिक बँकेच्या अभ्यासानुसार, गेल्या काही वर्षांत पूर्व आशियातील हाँगकाँग, सिंगापूर, दक्षिण कोरिया व तैवान यांसारख्या देशांमध्ये तरुणांसाठी संधीची नवी द्वारे खुली झाली. तेथील तरुणांमध्ये प्रगत उच्च शिक्षण, अद्ययावत तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष सराव व अवलंब, वैयक्तिक व व्यावसायिक प्रगतीच्या संधी व आशादायी आरोग्य यामुळे विकासवाढीच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या. भारतातील सद्यःस्थिती त्याहून वेगळी नाहीच; उलट ती अधिक आशादायी आहे.
 
 
Indian Youth
 
जागतिक स्तरावर दक्षिण आशियाई देशांच्या संदर्भात सांगायचे म्हणजे, सध्या भारताने 15 ते 60 या वयोगटातील Indian Youth लोकसंख्येमध्ये चीनसारखा मोठा देश व अर्थव्यवस्थेला मागे टाकले. याचे औद्योगिक-आर्थिक संदर्भात मोठे व दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात. भारत आणि चीन या उभय देशांनी लोकसंख्या नियंत्रणाच्या संदर्भात गेली काही दशके घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांच्या परिणामी ही स्थिती दिसून येते. व्यावहारिकसंदर्भात वाढत्या लोकसंख्येचा भार संबंधित देशाच्या भौगोलिक क्षेत्र वा भूभाग, जमीन व पाण्याची उपलब्धता, अन्न व ऊर्जेचा पुरवठा आदींवर पडत असतो. वाढत्या लोकसंख्येसह या वाढत्या आव्हानांचा संबंधित देशाच्या सत्ताधार्‍यांना सामना करावा लागतोच; मात्र त्याचवेळी वाढत्या लोकसंख्येमुळे उपलब्ध होणार्‍या वाढीव मानव संसाधनांचा फायदाही होत असतो, ही बाब कदापि विसरून चालणार नाही. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय लोकसंख्या संशोधन संस्थेतील संशोधक श्रीनिवास गोली यांच्यानुसार वाढत्या लोकसंख्येचा देशपातळीवर सकारात्मक व विकासपूरक उपयोग कशाप्रकारे केला जाऊ शकतो, याचे उदाहरण गेल्या दशकात दक्षिण आशियाई देशांनी दाखवून दिले आहे. यासंदर्भात चीनने आपल्या अफाट लोकसंख्येतील युवकांना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम बनवीत असतानाच, देशातील उद्योगांना कार्यक्षमच नव्हे, तर निर्णयक्षम बनवून वाढत्या लोकसंख्येसह जागतिक संदर्भात आपला दबदबा व प्रभाव आजवर कसा कायम राखला, हेसुद्धा स्पष्ट झाले आहे. आता हीच बाब भारत आणि भारतीयांच्या संदर्भात दिसून येते. नुकत्याच प्रकाशित संयुक्त राष्ट्राच्या लोकसंख्याविषयक जागतिक अहवालात नमूद केल्यानुसार भारताची विद्यमान लोकसंख्या व या लोकसंख्येतील युवा वा सक्षम वयोगटातील वर्गगट ही आज भारताची जमेची बाजू आहे.
 
 
संयुक्त राष्ट्र संघाच्या अहवालात नमूद केल्यानुसार सध्या भारतातील सुमारे 1 कोटी 42 लाख लोकसंख्येमध्ये 25 टक्के 14 वर्षे वयोगटाखालची आहे. 18 टक्के 10 ते 19 वर्षे वयोगटातील आहे, 26 टक्के 10 ते 24 वर्षे वयोगटातील सर्वाधिक म्हणजेच 68 टक्के लोकसंख्या 15 ते 64 वयोगटातील असून फक्त सात टक्के भारतीय हे 65 वर्षे वा त्याहून अधिक असे म्हणजेच ज्येष्ठ नागरिक आहेत. वर नमूद वय वर्गगटातील Indian Youth भारतीयांची संख्या ही जमेची बाजू असून त्याची नोंद संयुक्त राष्ट्र संघासह सर्वदूर घेण्यात आली आहे. या स्वरूपाच्या लोकसंख्येमुळे आज भारत आपली सक्षम-कार्यक्षम युवाशक्तीसह मानव संसाधनविषयक गरज भागवून जागतिक स्तरावरील कौशल्यविषयक गरजा पूर्ण करण्याच्या तयारीत आहे. याच मुद्याला अभ्यासपूर्ण जोड देताना पॉप्युलेशन फाऊंडेशन ऑफ इंडियाच्या पूनम मुत्रेजा यांनी नमूद केले की, सध्याच नव्हे तर आगामी काळातसुद्धा कौशल्यपूर्ण सक्षम भारतीयांना जागतिक पातळीवर मागणी राहणार आहे. यातूनच भारताला कौशल्यपूर्ण तंत्रज्ञांचा पुरवठा करणारा व करू शकणारा देश, अशी सर्वदूर मान्यता मिळणे, ही बाब आता अटळ आहे.
 
 
यासंदर्भात विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, 2021 मध्ये Indian Youth भारत आणि जपान या दोन देशांमध्ये झालेल्या विशेष आंतरराष्ट्रीय करारानुसार उभय देशांमध्ये उपलब्ध असणार्‍या वा उपलब्ध होऊ शकणार्‍या विशेष तांत्रिक कौशल्य व तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करण्यावर भर देण्यात आला. तेव्हापासून काही निर्धारित पण महत्त्वाच्या क्षेत्रात अगदी कौशल्यपूर्ण कामगारांपर्यंतच्या विशेष ज्ञान, अनुभव व कौशल्याचा उभय देशांमध्ये प्रकर्षाने उपयोग केला जाऊ लागला. यासंदर्भात वाहन वा इलेक्ट्रॉनिक उत्पादन उद्योग व त्यांच्या सुट्या भागांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. लक्षणीय स्वरूपात भारत व जपानमधील कौशल्यपूर्ण कामगार व इंजिनीअर्सचे जाणे-येणे होऊन त्याचा फायदा उभय देश व त्यातील उद्योगांना झाला. या संदर्भात विशेष अभ्यास करणार्‍या अनुभवी विषयतज्ज्ञांनुसार कुठल्याही देशाला त्याच्या आर्थिक-औद्योगिक विकासासह विशेष प्रगती साधायची असेल व मुख्य म्हणजे ती कायम राखायची असेल, तर अशा देशांना देशांतर्गत युवावर्गाला कौशल्यांसह रोजगारक्षम बनविण्याला पर्याय नाही.
 
 
Indian Youth लोकसंख्या तज्ज्ञांनुसार भारतातील वाढत्या लोकसंख्येत इतरांवर अवलंबून असणार्‍यांच्या तुलनेत सक्षम व व्यवसाय-रोजगार करणार्‍यांच्या तुलनेत पुरेशी व व्यस्त प्रमाणात वाढ होत आहे. हे प्रमाण त्यांच्या मते, भारतीय लोकसंख्येला नव्हे, तर समाज पद्धती व अर्थव्यवस्थेला पूरक ठरले आहे. अर्थात याला आव्हानपर संधी म्हणायला हवे. त्यातही पण वाढत्या लोकसंंख्येमधील युवावर्गाचे प्रमाण व त्यांची संख्या यावर अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. या युवकांना केवळ शिक्षणच नव्हे, तर रोजगारप्रवण कौशल्य प्रशिक्षित बनविणे आवश्यक असते. यासंदर्भातील भारतातील प्रगती व त्याद्वारे अर्थव्यवस्थेला सकल राष्ट्रीय उत्पादन म्हणजेच सुमारे सहा टक्के जीडीपी वाढ ही आज जगासाठी मार्गदर्शक ठरली आहे. भारतात शिक्षणापासून व्यवसाय प्रशिक्षणापर्यंत महिलांसाठी करण्यात येणारे प्रयत्न फलदायी ठरले आहेत. भारतातील लोकसंख्येत महिलांची लोकसंख्या सुमारे 50 टक्क्यांवर असताना, या विषयाचा विचार करणे महत्त्वाचे ठरते. यासंदर्भात शिक्षणापासून महिला बचत गट व अन्य माध्यमातून ग्रामीण आणि शहरी महिलांना रोजगार-स्वयंरोजगार देण्यासाठी राज्य व केंद्र स्तरावर करण्यात आलेले प्रयत्न सकारात्मक स्वरूप दाखवत असून याची दखल जागतिक पातळीवर घेतली जात आहे.
 
 
Indian Youth : विविध अभ्यासांद्वारा, भारताची लोकसंख्या ही भारतासाठी आव्हानपर संधी अशा दुहेरी स्वरूपात सध्या उपलब्ध आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठातील विषयतज्ज्ञ आशिष गुप्ता यांच्यानुसार वाढत्या लोकसंख्येतून सक्षम व रोजगारप्रवण संख्या तेवढ्याच वाढत्या प्रमाणात निर्माण झाली, तर त्यातून राष्ट्रीय स्तरावर सबळ मानव संसाधनाची निर्मिती होऊ शकते. त्यांच्या मते, भारताची आज हीच बाब एक प्रबळ शक्ती आहे. वरील पूर्वपीठिका व आगामी काही वर्षांचा मागोवा घेता स्पष्टपणे दिसते की, भारतातील उत्पादन व व्यवसाय क्षेत्रांच्या आवश्यकतेनुसार कौशल्य गरजांची पूर्तता करण्यासाठी आपण सज्ज आहोत. त्यामुळे आपले उत्पादन व सेवा या अधिक सक्षम-कार्यक्षम बनल्या आहेत. त्याचवेळी वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या अभ्यासपूर्ण अंदाजानुसार, भारत आज केवळ आशियाई देशच नव्हे तर जागतिक पातळीवरील कौशल्य गरजा पूर्ण करण्याच्या क्षमतेत आहे व ही बाब अर्थातच आशादायी ठरणारी आहे. 
 
(लेखक एचआर व्यवस्थापन सल्लागार आहेत.)
- 9822847886