बेडेकर मसाले कंपनीचे संचालक अतुल बेडेकर यांचे निधन

03 Nov 2023 17:51:23
मुंबई,
बेडेकर मसाले नावाने प्रसिद्ध असलेल्या व्ही. पी. बेडेकर अ‍ॅण्ड सन्स कंपनीचे संचालक Atul Bedekar अतुल बेडेकर यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. ते 56 वर्षांचे होते. बेडेकर हे लोणची, मसाले व या पारंपरिक मराठी खाद्यपदार्थ व्यवसायातील प्रतिष्ठित नाव आहे. 1910 मध्ये विश्वनाथ परशराम बेडेकर यांनी गिरगावात लहानसे किराण्याचे दुकान सुरू केले. त्याच दुकानात त्यांनी मसाले आणि लोणची ठेवण्यास सुरुवात केली. मसाले व लोणच्यांचा खप भरपूर व्हायला लागल्यावर दुकानाच्या शाखा काढायला सुरुवात केली. मूगभाट, दादर, फोर्टमध्ये माणकेश्वर मंदिराजवळ बेडेकरांची अल्पावधीतच पाच दुकाने झाली.
 
 
Atul Bedekar
 
Atul Bedekar : पुढे धंद्याचा व्याप वाढता राहिल्यावर 1943 मध्येच ‘व्ही. पी. बेडेकर अ‍ॅण्ड सन्स लिमिटेड’ असे कंपनीचे नामकरण केले. बघता बघता संपूर्ण महाराष्ट्र व्यापला. फक्त देशातच नाही तर ज्या ज्या देशांत मराठी माणूस पोहचला तिथे तिथे बेडेकर उत्पादनेही पोहोचली. 1960 साली भारतात प्रथम पी. पी. लीक प्रूफ कॅप्स बेडेकरांनी वापरल्या आणि मग लोणची निर्यात होऊ लागली. कर्जतच्या कारखान्यात जवळपास 600 टन लोणचे सीझनला बनते. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, गोवा, मध्यप्रदेश, छत्तीसगडमध्ये विक्री होते. त्याचबरोबर सातासमुद्रापलीकडे बेडेकर नाव पोहोचले आहे. अमेरिका, कॅनडा, मध्य पूर्व, ऑस्ट्रेलिया, युरोप आणि पूर्वेकडील देशांमध्ये देखील निर्यात होते.
Powered By Sangraha 9.0