अग्रलेख
maharashtra-politics यंदाच्या वर्षाची अखेरची तारीख, म्हणजे डिसेंबर महिन्यातील ३१ तारीख जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसतसा महाराष्ट्राच्या विरोधी पक्षांच्या राजकारणातील मानसिक तणावही वाढू लागला आहे. राजकीय पक्षांना मानसिक तणाव कसा, असा प्रश्न आजवर कधी फारसा पडला नव्हता. पण सध्या राज्यात जे काही सुरू आहे, ते पाहता, राजकारण मानसिक तणावाखाली आहेच; शिवाय राजकारणाचे मानसिक संतुलनदेखील स्थिर नाही, असेच म्हणावे लागेल. maharashtra-politics ही परिस्थिती कोणा एकाच नेत्यासंदर्भात नाही, तर विरोधकांच्या तंबूतील एका मूठभरांच्या कोपऱ्यातच अशी स्थिती दिसत असल्याने विरोधकांचे एकूणच राजकारण मानसिक तणावाखाली असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे आणि बहुधा त्यामुळेच काही नेत्यांचे मानसिक संतुलन बिघडले की काय, असे वाटण्याजोगे चित्र दिसू लागले आहे. maharashtra-politics अन्यथा संसदीय आणि असंसदीय शब्दांच्या शोधात सैरावैरा धावताना सभ्यतेच्या किमान संकेतांस तिलांजली देण्याची दुर्बुद्धी या नेत्यांना सुचली नसती. महाराष्ट्राच्या राजकारणास सभ्यतेची परंपरा आहे, वैचारिक किंवा राजकीय भूमिकांबाबत विरोध असला, तरी परस्परांचा आदर करण्याची संस्कृती या राज्यात जपली गेलेली आहे, असे अभिमानाने म्हटले जात होते. maharashtra-politics
अगदी कालपरवापर्यंत या संस्कृतीचा आणि परंपरेचा उच्चार करणाऱ्या नेत्यांपैकीच काहींना आता त्याचा विसर पडू लागला असून, जे असंसदीय नाही ते सारे निवडून उच्चारण्याचा आणि सभ्यतेच्या संकेतांना धाब्यावर बसविण्याचा सपाटा सध्या सुरू झाला नसता. शिवसेनेच्या स्थापनेपासून पुढे कधीच या पक्षाने स्वबळावरील सत्ता पाहिलेली नाही. maharashtra-politics समान वैचारिक बैठकीच्या मुद्याचा मुलामा चढवून भाजपासोबत निवडणुका लढविल्यानंतर शिवसेनाप्रमुखांचे सत्तेच्या चमत्काराचे स्वप्न सत्यात अवतरले आणि तो भगवा मंत्रालयावर फडकला. सत्तेचे स्वप्न अशा तऱ्हेने एकदा साकार झाल्यानंतर पुढे काहीही झाले तरी सत्तेविना राहणे कोणासही नकोसेच असते. बाळासाहेबांच्या पश्चात यातूनच शिवसेनेत सुरू झालेल्या अंतर्कलहाचे रूपांतर मोठ्या पक्षफुटीत झाले आणि महाराष्ट्रात मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी किंवा ज्वलंत हिंदुत्वाचा प्रखर पुरस्कार करण्यासाठी लढा देणारी संघटना म्हणून जगासमोर वावरणाऱ्या शिवसेनेतील सत्तालोलूप मूठभर गट उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली एकवटला. maharashtra-politics त्याआधी अडीच वर्षे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत अनैतिक आघाडी करून उद्धव ठाकरे यांनी सत्ता उपभोगली, त्यामुळेच पक्षातील मतभेदांनी कळस गाठला आणि अखेर उद्धव ठाकरे यांचा गट राज्याच्या राजकारणात एकाकीपणे भरकटत राहिला.
एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्याने आपल्या आचरणातून, वर्तणुकीतून किंवा वक्तव्यातून आपली संस्कृती दाखवून देण्याचा चंग बांधला, तर त्यामुळे राज्याचे फारसे नुकसान होणे संभवत नाही. maharashtra-politics उलट, त्या नेत्याच्या जनमानसातील भावनेस निश्चितच धक्का पोहोचतो. पण सामूहिकरीत्या अनेक नेत्यांनी आपल्या वर्तणुकीतून वा वक्तव्यांतून आपल्या संस्कृतीचे जाहीर प्रदर्शन करण्यास सुरुवात केली, तर त्या नेत्यांनी हाती घेतलेल्या झेंड्याचे खरे रंग जनतेसमोर उघड होऊ लागतात आणि एकाकीपण अधिकच त्रासदायक होऊ लागते. अशा राजकीय पक्षासोबत जनता तर राहात नाहीच; पण अन्य पक्षदेखील त्यांच्यासोबत राहण्यास फारसे उत्सुक असत नाहीत. अशा पक्षांच्या संस्कृतीला महाराष्ट्राच्या राजकारणात थारा नाही, हे आता हळूहळू उघडही होऊ लागल्याने, राजकारणातील सभ्यतेची संस्कृती अजून जिवंत असल्याचे आशादायक चित्र स्पष्ट झाले आहे. maharashtra-politics ठाकरे गटाची स्थितीदेखील अलीकडे काहीशी अवघड होऊ लागली आहे. या गटाने ज्यांच्यासोबत युती किंवा आघाडी करण्याकरिता धडपड केली, त्यांनी त्यानंतर या गटासोबत कोणत्याच राजकीय मंचावरदेखील येण्याची फारशी उत्सुकता दाखविली नाही, एवढी एकच बाब त्यांच्या एकाकीपणाचा पुरावा देण्याकरिता पुरेशी आहे.
असे झाले की, मानसिक तणाव वाढणे साहजिकच असते. ठाकरे गटाचे तसेच होऊ लागले असताना आता त्यामध्ये आमदारांच्या अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीतून समोर येणाऱ्या कोंडीची भर पडली आहे. maharashtra-politics येत्या ३१ डिसेंबरपर्यंत ही सुनावणी सुरू राहिली तर गटाचे प्रवक्ते म्हणून उलटतपासणीस सामोरे जाणारे सुनील प्रभू यांच्यासमोर कोणत्या नव्या संभ्रमांचा डोंगर उभा राहणार, याची चिंता कदाचित सध्या बळावली असावी. अगोदरच गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांच्या अनेक असभ्य वक्तव्यांमुळे महाराष्ट्रातील सभ्य संस्कृतीच्या राजकारणातील आपले स्थान मागच्या रांगेत जाताना पाहणे क्लेशदायक ठरत असताना, त्यात भर टाकणारी वक्तव्ये करून नव्या अडचणी गटासमोर उभ्या करण्याची स्पर्धा सरसकट सुरू झाल्याने या गटाच्या राजकीय भविष्यावरही प्रश्नचिन्हे उमटताना दिसत आहेत. maharashtra-politics गंमत म्हणजे, असे असूनही सभ्यतेच्या संस्कृतीला छेद देण्याच्या स्पर्धेत कोणीही मागे नाही, हे दाखविण्याची यच्चयावत धडपड हा आता महाराष्ट्राच्या करमणुकीचा विषय होऊ लागला असून ठाकरे गटाच्या राजकारणाकडे फार गांभीर्याने पाहू नये, अशी जनतेची मानसिकता जवळपास तयारदेखील झाली आहे. तरीही, अशा असभ्य राजकारणाचा तिटकारा अधूनमधून जनमानसात उमटतो आणि त्याचे पडसादही राज्यात दिसू लागतात.
महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या सत्ताकाळात संजय राऊत यांनी केवळ असंसदीय नसलेल्या, परंतु समाजाच्या आणि सामाजिक संस्कृतीच्या दृष्टीने असभ्य मानल्या जाणाऱ्या शब्दांचा संपूर्ण कोशच जणू आपल्या जिभेवर ओतून घेतल्याप्रमाणे अशा शब्दांचा प्रच्छन्न वर्षाव करत स्वपक्षाच्या नव्या संस्कृतीची ओळख करून दिलीच होती. पुढे सत्ता गेल्यानंतर या असभ्य शब्दसंभारास आणखीनच बहर आला. maharashtra-politics याआधी एकटे संजय राऊत यांनीच असे शब्द वापरावेत, असा संकेत मोडून या गटातील अन्य अनेक जण आपल्या कोशातील असे निवडक शब्द आता उधळू लागले आहेत, असे दिसते. अशा रीतीने सध्या या गटाच्या नेत्यांकडून सुरू झालेल्या नव्या पेरणीतून जे काही उगवू पाहात आहे, ते त्याहून वेगळे नसणार याची चुणूक नुकत्याच झालेल्या एका कारवाईमुळे आता या गटास अनुभवण्यास मिळाली असेल. शिवसेनेचे माजी महापौर, म्हणजे, ज्यांनी कोणे एकेकाळी महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईच्या प्रथम नागरिकाचा मान मिरविला, त्या दत्ता दळवी या ठाकरे गटातील नेत्यानेदेखील जीभ घसरण्याच्या स्पर्धेत आपण मागे नाही, हे दाखविण्यासाठी थेट मुख्यमंत्रिपदावरील व्यक्तीविषयीच असभ्य वक्तव्य केले. मराठीमध्ये अशा शब्दांना ‘शिवी' असे म्हणतात. maharashtra-politics दत्ता दळवींनी मुख्यमंत्र्यांवर असभ्य टीका करताना वापरलेल्या शब्दाचा पुनरुच्चारदेखील करणे सभ्यतेच्या संस्कृतीस सहन होण्यासारखे नाही. कदाचित म्हणूनच, विविध वृत्तवाहिन्या किंवा प्रसार माध्यमांनी त्यांच्यावरील कारवाईचे वृत्त देताना त्या शब्दाचा वापर करणे टाळले.
म्हणजे, जो शब्द असंसदीय नाही एवढे एकच बचावाचे हत्यार परजून त्या शब्दाच्या समर्थनासाठी संजय राऊत व स्वतः दळवीदेखील मैदानात उतरले आहेत, तो शब्द असंस्कृत आणि असभ्य आहे, याची जनतेस खात्री पटली आहे. केवळ असंसदीय नाही म्हणून असे शब्द वापरण्यात गैर नाही, हा त्यांचा युक्तिवाद आहे. ठाकरे मुख्यमंत्रिपदी असताना अशाच काहीशा कारणाचे निमित्त करून त्यांनी थेट केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणे यांना भरल्या ताटावरून अटक केली होती. maharashtra-politics संजय राऊत यांनी याआधी किरीट सोमय्या यांच्यावर उधळळेली मुक्ताफळे त्यांच्याच शब्दांत सांगायचे झाले तर ‘ऑन रेकॉर्ड' आहेत. मविआ सरकारच्या काळात सूडबुद्धीच्या राजकारणाचे अनेक नमुने महाराष्ट्राने अनुभवले. पत्रकार, अभिनेत्यांसह राजकीय नेत्यांना कारवाईच्या कचाट्यात खेचण्याचे अनेक प्रकार उघडकीस आले होते. आता याच नेत्यांना नेमकी कारणे दाखवून कारवाईस सामोरे जावे लागताना, लंगड्या बचावाची कसरत करणे भाग पडत आहे. maharashtra-politics संजय राऊत यांनी विधिमंडळाच्या संदर्भात केलेल्या ‘चोर मंडळ' या शब्दावरून त्यांच्यावर हक्कभंगाची कारवाई सुरू झाली होती. आता खुद्द ठाकरे यांच्याकडील शब्दभांडारही समोर येत असताना त्यांनाही कारवाईचे इशारे मिळू लागले आहेत. सभ्यतेची संस्कृती नासविण्याच्या कोणत्याही प्रयत्नाचे कोणाकडूनही समर्थन होऊ नये, अशी या संस्कृतिनिष्ठ महाराष्ट्राची अपेक्षा आहे, हेच आता स्पष्ट होत आहे.