आली दिवाळी...

05 Nov 2023 06:00:00
- डॉ. साधना कुलकर्णी
 
‘चला चला, दिवाळी आली,
मोती साबणाची वेळ झाली...’
मोती साबण आणि Diwali दिवाळी यांचा नेमका काय संबंध, हा मला नेहमीच छळणारा प्रश्न. बरं, आता हा कुळाचार असल्याप्रमाणे दिवाळीच्या सुमुहूर्तावर बाथरूममध्ये याची प्रतिष्ठापना होते ती पार होळीपर्यंत. कारण दिवाळी संपली की आत्मा मोती साबणातून हळूहळू मुक्त होऊ लागतो आणि त्याचं एका रंगीत गोट्यात रूपांतर होतं. हा गोटा संपेपर्यंत आम्ही त्याने आंघोळ का करतो, हा दुसरा छळणारा प्रश्न.
 
 
Untitled-1-copy
 
असो. मोती साबणाने वर्दी दिलीय, दिवाळी आली बरं का...
लहानपणी निसर्ग हाळी द्यायचा, दिवाळी आली बरं का... दसर्‍यापासूनच दिवाळीचे वेध लागत. नुकताच पावसाळा आटोपलेला असायचा. तृप्त भूमीने अवघ्या सृष्टीला हिरवाईचं दान दिलेलं असायचं. वर्षा ॠतूने शरदाला ओंजळ भरभरून दिलेलं सुजलाम् सुफलाम् दान स्वीकारून शरद ऋतू टवटवीत आणि ऊर्जादायक झालेला असायचा. शेता-शेतांमध्ये गच्च भरलेली पिके डोलताना बघून मनसुद्धा कसं गच्च भरून जायचं. सरलेला पावसाळा आणि येऊ घातलेला हिवाळा यांचं मिश्रण म्हणजे दिवाळी. शरदातली म्हणजेच आश्विन कार्तिकातली पंचमहाभूतं मुळातच विलक्षण जादुभरी असायची. आपलं नवीन समृद्ध रूप बघून ती पंचमहाभूतं हळूच कानात कुजबुजायची, ‘दिवाळी आली बरं का...’
 
 
स्वच्छ मोकळं आकाश. कुठेही मळभ नाही. निरभ्र चांदणं, हलकी गुलाबी थंडी, ओढाळ पहाट वारा, हलक्या धुक्याची चादर लपेटून उगवणारी सकाळ. आमची साखरझोप अलगद ओसरायची ती आजीच्या काकड आरतीच्या आवाजाने. तो वृद्ध, क्वचित बेसूर पण श्रद्धेने ओतप्रोत भरलेला आवाज कमालीची ऊब द्यायचा. त्याच्या जोडीला घराघरातून अंगण झाडल्याचा आणि सडा शिंपण्याचा आवाज यायचा. देवघरातला उदबत्ती, कापराचा गंध, अंगणातल्या शेणाच्या सणाचा मृदगंध... हे सगळे नादगंध एकत्र होऊन थेट मस्तकात भिनायचे. ते पहाटेचं वातावरण इंद्रियांना खुळावायचं. आम्ही सगळी भावंडं अंथरुणात उठून बसायचो, खुदकन हसायचो आणि म्हणायचो, दिवाळी आली बरं का...
 
 
Diwali : मग सारवलेल्या अंगणात रांगोळी काढण्याची लगीनघाई. सगळ्यांची अंगणं रांगोळीने रेखलेली आणि घरांवर झुलणारे आकाशकंदील बघून मन हरखून जायचं. त्या वेळेची पहाट अशी नादावून टाकायची आणि मग दिवस वर चढायचा तसतसे आणखी अनेक व्यावहारिक नादगंध त्यात येऊन मिसळायचे. सणासुदीचे जीभेला चाळवणारे, भाजण्याचे तळण्याचे गंध, घराच्या रंगरंगोटीचा उग्र गंध, कोर्‍या वस्त्र प्रावरणाचे गंध एकत्रित होऊन मनाला वेडावून टाकायचे. एरवी सुस्त, एकलकोंडी, आत्ममग्न असणारी दुपार या काळात कशी जिवंत होऊन जायची. लहान मुलांचा धांगडधिंगा, मातीचा किल्ला करताना होणारी भांडणं, घराघरातून काही कुटण्याचे, ठोकण्याचे, भांडी घासण्याचे आवाज.. हे सगळे ध्वनी कर्कश्श असले तरी खूप भावायचे. त्यात एकच झपाटून टाकणारा विचार असायचा, दिवाळी आली बरं का... मग घराघरात, रस्त्यारस्त्यात, तनामनात दिवाळी भिनू लागायची. निसर्गाला, माणसाला चैतन्याचं वाण देत ती उंबरठ्यापाशी येऊन उभी राहायची.
 
 
नरक चतुर्दशीला तर नरकात पडू नये याची धास्ती असल्याने झोपच यायची नाही. भल्या पहाटे उठणं, हवेतला किंचित गारवा, दूरवर दिसणारी पणत्यांची लवलव, आईने केलेलं औक्षण, सुगंधी तेल-शिकेकाई यांनी केलेलं अभ्यंग स्नान हे सगळं आठवलं की आजही अंगावर रोमांच उठतात. घर परिसराच्या स्वच्छतेबरोबर मनही स्वच्छ आणि नितळ होऊन जायचं. लक्ष्मीपूजनाचा दीपोत्सव तर प्रतीकात्मक आहे. कितीतरी सांस्कृतिक, धार्मिक कथा या पूजनाशी जोडल्या आहेत. त्या आज कालबाह्य वाटू शकतात, पण कालसुसंगत विचार केल्यास हा Diwali दीपोत्सव अज्ञानाच्या अंधारावर विजय मिळविण्यासाठी आहे. माणसाच्या मनातल्या सगळ्या सद्प्रवृत्तींचा हा उत्सव आहे. जगातलं जे जे उत्तम आहे त्याचा हा उत्सव आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध या पाच विषयांच्या उत्कटतेचा हा उत्सव आहे. लक्ष्मीपूजनासाठी सुसज्ज असलेले देवघर म्हणजे समृद्धी आणि कलात्मकतेचा संगम. चांदीची लखलखीत भांडी, सुवर्णाचे अलंकार, पिवळ्या केशरी झेंडूच्या फुलांची आरास, हिरव्याकंच आंब्याच्या पानांचं तोरण, पंचपक्वान्नाचा प्रसाद, रंगांची उधळण करणारी रांगोळी आणि या कलात्मक दृश्याला तेजःपुंज करणारे दिवे. ते केवळ लक्ष्मीपूजन नसतं तर माणसा-माणसातल्या ईश्वरी अंशाचं, सात्त्विकतेचं पूजन असतं. अशी ही दिवाळी... मनाला तृप्त करणारी, सगळ्या काळज्या, चिंता, नैराश्य, थोड्या काळासाठी तरी वळचणीला टाकणारी, संपूर्ण घरावर तृप्तीची एक साय पांघरणारी.
 
 
अशी ही दिवाळी दरवर्षीच येते. पण तो दिवाळीचा लहानपणीचा माहोल मला सापडतच नाही. हल्ली दिवाळी नुसतीच येते आणि जाते. रीत आणि परंपरा म्हणून उत्साहाने निभावली जाते तर रेटलीही जाते कधीमधी. खरंच सणावारांनी आनंद मिळण्याचे दिवस राहिलेत कुठे आता? आता तर आनंदाचे, उत्साहाने निथळून जाण्याचे स्रोत इतके वेगळे आहेत की, सण उत्सवांची अडचणच व्हायला लागली आहे. आजकाल दिवाळीत सहली काढण्याची फॅशनच झाली आहे. दिवाळीचा उद्देश, प्रयोजन याच्याशी फारसं कुणाला सोयरसुतक नसतं. दिवाळीची चाहूल लागते ती बाजारात ‘भव्य फेस्टिव्हल ऑफर’, ‘उत्सव स्पेशल’, फटाके, अनंत भेटवस्तू, आकाश कंदिलांचा झगमगाट, खाद्यपदार्थांची रेलचेल, कपड्यांचे मनोहारी प्रकार, दागिने, भांडीकुंडी यांनी ओसंडून जाणारी दुकानं यामुळेच. आणि हा आनंद विकत घेण्यासाठी लोकांची उडालेली जीवघेणी झुंबड बघून मन धास्तावतं. मनावर ताण येतो. व्यक्तिगत आयुष्यातले समरसून जगण्याचे काही क्षण या दिवाळीमुळे आपल्या वाट्याला येतात त्यावरही बाजाराचं, धंद्याचं आक्रमण. दिवाळी कशी साजरी करावी याचा विचार करायलाही उसंत मिळत नाही. ही सगळी दिवाळी झगमगाटात, पोषाखात, कृत्रिम आनंदात हरवलेली वाटते. ऋतू येऊन सादही घालतात.. नाही असं नाही. पण त्यांना प्रतिसाद द्यायला आपल्या मनाची कवाडं उघडी कुठे असतात?
 
 
आज मीसुद्धा ती लहानपणची राहिलेली नाही. अवतीभवतीचं जगही तसंच राहिलेलं नाही. लहानपणची Diwali दिवाळी आता तशीच असणार नाही, हेही मला माहीत आहे. तरीसुद्धा पहाटेचा खुळवणारा वारा मी नक्कीच ऊर भरून घेऊ शकते. आश्विनात फुलणार्‍या पिवळ्या जर्द झेंडूचा गंध आजही ‘दिवाळी आली बरं का’ हे सांगायला पुरेसा आहे. कितीतरी हळवे, उत्कट क्षण आजची दिवाळीसुद्धा देतेच; पण त्यासाठी मनाचा कप्पा उघडा असावा लागतो. त्यातल्या आठवणी मोरपिसासारख्या गालाला लावून अनुभवायच्या असतात. बाकी दिवाळी दरवर्षी येतेच आणि साजरीही होते. पण आजच्या दिवाळीतही चित्तवृत्ती फुलवण्याची शक्ती आहे हे खरंय. दिवाळीचा संचार अंगात हळूहळू होतोच. उत्साहाचं, सकारात्मकतेचं, आनंदाचं रसायन शरीरातून वाहतं ठेवण्याची क्षमता दिवाळीच्या वातावरणात असतेच असते. दिवाळी कशी साजरी करायची हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे; पण ही भौतिक दिवाळी आपण नेहमीच अनुभवतो. आता मनातली दिवाळी साजरी करू या...
 
 
अंतरंग उजळणारे दिवे,
सल, द्वेष नष्ट करणारं अभ्यंगस्नान,
जीवन रंगीत करणारी रांगोळी,
सद्वृत्ती आणि विवेकाचं पूजन
आपुलकीनं ‘या’ म्हणणारा आकाशदिवा,
स्नेह आणि नाती जपणारा फराळ,
विश्वास आणि मैत्रीची ओवाळणी,
हीच खरी दिवाळी...
Powered By Sangraha 9.0