असाध्य तें साध्य करितां सायास। कारण अभ्यास तुका म्हणे॥

    दिनांक :05-Nov-2023
Total Views |
तुका आकाशाएवढा
 
- प्रा. मधुकर वडोदे
Saint Tukaram Maharaj : जीवनात यशस्वी वाटचाल करण्याच्या उद्देशाने जगत असताना अनेक गोष्टी त्या सहजा-सहजी प्राप्त होत नाही. त्या मिळविण्याकरिता अर्थात हेतू साध्य करण्याकरिता खूप कष्ट उपसावे लागतात. कष्ट करण्याची मानसिकता असावयास पाहिजे. परंतु समाजात आपण अनेक असे लोक पाहत असतो की, ते संपूर्ण आयुष्यात काहीच जबाबदारी स्वीकारावयास तयारच नसतात. मग त्यांना ते सुख नको असतं काय? ते त्यांना पाहिजे असते; तेही कुठलेही श्रम न करता. म्हणजेच कुठलीही जबाबदारी न स्वीकारता. अशीच त्यांची मानसिकता तयार झालेली असते.
 
 
Saint Tukaram Maharaj
 
एकंदरीत आयती मिळणारी वस्तू त्यांना पाहिजे असते. या बाबतचे स्पष्टीकरण देताना ते म्हणतात की, मी हे मिळवूच शकत नाही. खरं तर ते तशा स्वरूपाचे प्रयत्न करत नाहीत. त्या स्वरूपाची मानसिकता बनवून घेतात. एकदा नकारात्मक मानसिकता बनवली की, शेवटपर्यंत ती तशीच राहते. वास्तविक पाहता कुठलीही गोष्ट अशक्य नाही. केवळ ती गोष्ट शक्य करण्यासाठी मनापासून प्रयत्नही तेवढे मोलाचे ठरत असतात. हीच शिकवण या अभंगाच्या माध्यमातून संत तुकाराम महाराजांनी दिली आहे.
 
साधूनी बचनाग खाती तोळा तोळा
आणिकातें डोळां न पाहावे॥
साधुनी भुजंग धरितील हातीं
आणिकें कापती देखोनियां॥
असाध्य तें साध्य करितां सायास
कारण अभ्यास तुका म्हणे॥ अ. क्र. 3336
Saint Tukaram Maharaj महाराज म्हणतात की, विष प्यायल्याने माणसाचा मृत्यू अटळ आहे. त्याच्या सेवनामुळे आपण आपले प्राण गमावू शकतो, हे सर्वांनाच माहीत आहे. म्हणून आपण विषाच्या दहा हात दूर राहत असतो. एवढी भयंकर ताकद त्या विषामध्ये असते. परंतु, हे जरी सत्य असले, तरी एखाद्या न पटणार्‍या, मान्य नसणार्‍या गोष्टी या सरावाने शक्य होऊ शकतात. तो काही चमत्कार नव्हे; तर ते मिळविण्यासाठी केलेला सराव होय. कामातील सातत्य होय. या संदर्भातील उदाहरण देत आपला मुद्दा स्पष्ट करीत असताना ते सांगतात की, अत्यंत भयंकर जीव घेणारं विष जर आपण नित्य नेमानं सुईच्या टोकावर बसेल एवढ्या कमी किंवा त्याहीपेक्षा कमी प्रमाणापासून जर घेत असाल तर रोज त्यामध्ये थोडी-थोडी वाढ करून तोळ्यापर्यंतच विष आपण पचविण्याची शक्ती तयार करू शकतो. परंतु त्याकरिता जी अट आहे ती म्हणजे एकदम न घेता कमी-कमी प्रमाणापासून तर त्यामध्ये थोडी-थोडी वाढ करून घेतल्यास ते शक्य करून दाखवू शकतो. अर्थात अनेक अवघड गोष्टी सरावामुळे शक्य झाल्याचे निदर्शनास येते. या संदर्भातील हा उपदेश किती महत्त्वाचा व तेवढाच उपयोगी ठरतो.
 
 
 
आपण या संदर्भातील रोजच्या जीवनातील अत्यंत साधं सोपं असं उदाहरण पाहू या. औद्योगिक क्रांतीमुळे झालेली वाटचाल लक्षात घेता आज रोजी चार पाऊलं पैदल चालायला कुणी तयारच होत नाही. असे म्हणतात की, दूरदर्शन संच घरात आल्यापासून घरातील माणसांचा सुसंवाद बंद झाला. वाहतुकीची अनेक साधने आल्यापासून नियमित चालणे बंद झाले आहे. त्यामुळे शारीरिक व्याधीच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली दिसून येत आहे आणि ही बाब सर्वांच्या लक्षातही आली आहे. परंतु लक्षात येऊन फारसा फायदा मात्र झालेला दिसत नाही. आरोग्य बिघडत असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून चालण्याचा सराव कुणी करताना दिसत नाही. जे काही अल्प प्रमाणात नजरेस पडतात तर काही दिसतात ते वैद्याचा-डॉक्टरांचा सल्ला पाळत असताना दिसतात, असं चित्र आपण दररोज पाहात आहोत.
 
 
Saint Tukaram Maharaj : आज अचानक जगावर महामारीचं संकट कोरोना या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आलं. परिणाम आपल्या सुरक्षेकरिता या महामारीच्या संकटाला तोंड देण्याकरिता सर्व व्यवहारासहित वाहतूक सेवासुद्धा एकाएकी ठप्प झाल्या. सर्व मिळणार्‍या सुखसोयी एकदम बंद पडल्या. मनोरंजनाची साधणे कमी झाली. वाहतुकीची साधने सरकारी आदेश मिळाल्यामुळे तत्काळ जिथल्या तिथं थांबली. दूरदूरच्या भागातील लोक उदरनिर्वाहाच्या निमित्तानं घरापासून लांब आली होती. तीसुद्धा अडकून पडली. राहण्यापासून तर खाण्या-पिण्यापर्यंतचे हाल होऊ लागले. जी चार पावले चालू शकत नसलेली माणसं आता त्यांच्यावर उपाशी राहण्याची पाळी आली होती. आलेल्या संकटावर कशी मात करावी हा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाला. आपल्या मुलाबाळापर्यंत तर त्यांना जायचेच होते. परंतु त्यांच्यामध्ये काही आळशी होते. पैदल चालावयास तयार होत नव्हते. सराव करायलाही तयार नव्हते. हाल मात्र खूप होत होते. हे होणारे हाल पाहून त्यापैकी काहींनी चालण्याच्या सरावाला सुरुवात केली होती. त्याशिवाय ते कुटुंबापर्यंत पोहोचू शकत नव्हते. हे जरी खरं असलं, तरी कुटुंबापासूनचे अंतर हे 400 किलोमीटरचे होते आणि तेवढे अंतर पायी चालण्याचे आव्हान काही कमी नव्हते. जी माणसं पावलंही पायी चालू शकत नव्हती ती आज 400 किलोमीटर चालण्याचं आव्हान स्वीकारत असताना दिसत होती. हे एवढं मोठं अंतर कापण्यासाठी त्यांना मनापासून तयारी करावी लागली होती. तेव्हा कुठे हा एवढा खडतर प्रवास ते पूर्ण करणार होते. तेव्हाच कुटुंबापर्यंत पोहोचणार होते. म्हणून त्यांनी सुरुवातीला दिवसाला एक किलोमीटर, दुसर्‍या दिवशी दोन किलोमीटर, तिसर्‍या दिवशी तीन किलोमीटर, चौथ्या दिवशी चार किलोमीटर याप्रमाणे सरावाने अंतरात वाढ करून मग चालण्याचा एवढा सराव झाला की, पुढच्या दर दिवसाला 10 किलोमीटरपर्यंतच अंतर कापू लागले होते. चालण्यामध्ये सातत्य ठेवल्यामुळे पुढे त्यांनी दर दिवसाला 20 मग 400 किलोमीटरचे अंतर जवळपास दोन महिन्यात पूर्ण करून आपल्या मुला-बाळापर्यंत येऊन पोहोचले होते. परंतु ज्यांनी सराव नाकारला होता त्यांना अनेक संकटांना सामोरे जात मृत्यूशी सामना करावा लागल्याचे दिसून आले होते. काहींचे तर आयुष्य संपले होते. म्हणून आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर सातत्यपूर्वक प्रयत्न किती महत्त्वाचे ठरतात, हे आपल्या लक्षात आलेच असेल.
 
 
पुढे याच बाबतीत महाराज म्हणतात की, अत्यंत विषारी साप आपल्या हातांनी पकडताना काही माणसं दिसतात. त्यांची थोडी जरी चूक झाली तर त्यांना आयुष्याला मुकावं लागतं. तरीसुद्धा अशा भयानक विषारी सापांना पकडण्याचं ते सोडत नाही. खरं तर एवढी मोठी जबाबदारी ते केवळ सराव व त्यांचा नियमित अभ्यास करून यश संपादन करतात. त्यांच्या हातामध्ये असलेले विषारी साप पाहून लोक घाबरतानाही दिसतात. असे घडण्याचे एकच कारण लक्षात येतं की, अशा विषारी सापांना एकाएकी हातामध्ये घेत नाही तर ते पकडून हातात घेण्याच्या सरावाबरोबर विषारी सापांचा अभ्यासही ते करतात. तो कोणत्या परिस्थितीमध्ये काय करू शकतो. तो कोणत्या पद्धतीने पकडावा. विषारी की बिनविषारी या संदर्भातील संपूर्ण माहिती प्राप्त करूनच नागाला पकडलं जात असतं. त्याचप्रमाणे शत्रुपक्षावर विजय मिळविण्यासाठी अत्याधुनिक साधनांचाही वापर केला जात असतो. अशा साधनांचं प्रशिक्षण घेऊनच हल्ला करता येत असतो. परिणामी शत्रूवर विजय मिळविला जात असतो. असाध्य ते साध्य केल्यामुळेच देशाचं संरक्षण सैनिक करण्यात यशस्वी होतात. विद्यार्थ्यांच्या द़ृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यांनी जर अभ्यासामध्ये सातत्य व सरावात नियमितता ठेवल्यास यश निश्चित मिळू शकतं. संत तुकाराम महाराज प्रयत्नवादाचे समर्थक होते. एखादी गोष्ट शक्य होत नाही म्हणून ती सोडून द्यायची नसते तर ती साध्य करण्याच्या द़ृष्टीने प्रयत्न करायचे असतात; तरच मार्ग सापडतो. जसे औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना, संभाजी राजे व मावळ्यांसहित आपल्या नजरकैदेत ठेवले होते. बाहेर पडण्याचा त्यांचा मार्गच बंद झाला होता. तरी हतबल न होता शांत विचाराने गनिमी काव्याच्या भरवशावर त्यांनी एक युक्ती शोधून काढली. पूर्वीचा अनुभव व सध्याच्या परिस्थितीचा सखोल अभ्यासाच्या जोरावर बादशहाच्या नजरकैदेतून सहीसलामत सर्वांसह कैदेतून पसार होऊन स्वराज्यापर्यंत जाण्यास यशस्वी ठरले. हे केवळ प्रयत्नांच्या भरवशावर शक्य झालेलं दिसून येतं. म्हणूनच असाध्य ते साध्य हे केवळ सराव, प्रामाणिक प्रयत्न व कष्ट केल्यामुळे तसेच अनुभूती, शोधक वृत्ती ठेवल्यामुळे शक्य होत असल्याचे मत Saint Tukaram Maharaj संत तुकाराम महाराजांनी प्रकट केले आहे.
 
-9422200007