पुसदच्या किसान मार्केट यार्डचा महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक

08 Nov 2023 18:57:53
पुसद, 
बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प योजनेअंतर्गत राज्यातील खाजगी बाजाराची 2022-23 या वर्षाची क्रमवारी पणन संचालनालयाद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उद्योजक गिरीश सत्यनारायण अग्रवाल यांच्या Pusad Kisan Market किसान मार्केट यार्डला द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. या निवडीबद्दल गिरीश अग्रवाल यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. ही निवड राज्यातील 80 खाजगी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधून झाली आहे. अग्रवाल यांनी मागील 12 वर्षांपासून खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीत वेळोवेळी योग्य पद्धतीने बदल करून संपूर्ण बाजार समितीचे कायापालट केला आहे.
 
 
pusad
 
सुट्टीचे दिवस वगळता किसान मार्केट यार्ड प्रत्येक दिवशी अखंडपणे सुरू ठेवण्यात येते. वेळेचे बंधन शिथिल करून कमीत कमी वेळेत कास्तकारांना मुक्त करणे. हर्रास करताना उभ्या वाहनातच मालाचे ग्रेडिंग किंवा प्रतवारी करणे व त्याच ठिकाणी शेतमालाची जास्तीत जास्त बोली बोलणार्‍याचे निश्चित करणे. त्यामुळे कास्तकारांचे कमी वेळ, कमी नुकसान व लवकर शेतकर्‍याला निर्णय घेण्यास योग्य वेळ मिळाल्यामुळे मालाचे योग्य भाव प्राप्त करू शकतो.
 
 
या ठिकाणी शेतकर्‍यांना बाजार खर्चाशिवाय कोणतेही अवांतर खर्च लागत नाहीत. हिशोबपट्टीनुसार 100 टक्के चुकारे देण्यात येतात. शेतकरी बांधवांसाठी विविध सुविधा उपलब्ध असून त्यामध्ये शेतकरी भवन व निवास, हमालगृह, भवन व निवास, महिलासाठी स्वतंत्र निवास, शिदोरी निवास, उपाहारगृह, फिल्टर थंड पाण्याची व्यवस्था, प्रसाधनगृह, जनावरांसाठी पाणी व सुरक्षाव्यवस्था समाविष्ट आहे.
 
 
सीसीटीव्ही कॅमेरे व व्हॉट्सअ‍ॅपद्वारे शेतकरी बांधवांना खरेदीचे भाव रोज पाठविण्यात येतात. शेतकर्‍यांसाठी धान्य प्रतवारी यंत्र व चाळणी सुविधा उपलब्ध आहे. शासनाचे हमीभाव खरेदी केंद्र, नाफेड व महाराष्ट्र राज्याचेसुद्धा हमीभाव खरेदी केंद्र या ठिकाणी उपलब्ध आहे. याबाबत अभिमानाने सांगताना गिरीश अग्रवाल म्हणाले, येथे कोणतेही छुपे खर्च नाहीत. काटा कॉम्प्युटरराईड असल्यामुळे कोणतेही नुकसान नाही. झाडू मारण्याची कोणतीही पद्धत नसल्यामुळे या ठिकाणी अडत लागत नाही. हे सर्व अवांतर खर्च वाचून अप्रत्यक्षपणे शेतकर्‍यांचा फायदाच आम्ही करून देतो.
Powered By Sangraha 9.0