ते निजबोधे उराऊरी, भेटतु आत्मया श्रीहरी!

13 Dec 2023 06:00:00
धर्म-संस्कृती
- प्रा. दिलीप जोशी
आषाढीला भूवैकुंठ पंढरीला लाखो ईश्वरनिष्ठांची मांदियाळी त्या सावळ्या परब्रह्माच्या भेटीला एकत्रित येते. Pandharpur-Wari पंढरीचे वाळवंट आणि अख्खा भीमातीर वारकरी भक्तांनी बहरलेला असतो. लाखो वारकरी पांडुरंग परमात्म्याच्या भेटीची आस ठेवून घरदार विसरून आणि देहभान हरवून पंढरपुराकडे कूच करीत असतात.
 
 
 
Pandharpur-Wari
 
‘भेटीलागी जिवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी।’
अशीच अवस्था सर्वांची असते. त्या पंढरीच्या निळ्याच्या भेटीची प्रचंड आस वारकर्‍यांच्या मनात असते.
 
‘दिवाळीच्या मुळा लेकी आसावली, पाहतसे वाटुली पंढरीची।’
 ज्याप्रमाणे सासरी असलेली सासूरवाशीण दिवाळीच्या मुळाची म्हणजे आपल्याला नेण्यासाठी येणार्‍या भावाची तळमळीने वाट पाहते नेमकी तशीच वाट पंढरीश परमात्म्याची सर्व हरीचे दास दरवर्षी आषाढी कार्तिकीला पाहत असतात. ती आर्तता आणि ओढ किती असते तर जगद्गुरू तुकोबाराय जेव्हा वारीच्या वेळी पंढरीच्या शिवारात आले आणि त्यांना राऊळचा कळस आणि पताका दिसताच ते आर्त भावाने आणि परकोटीच्या ओढीने देहभान विसरून राऊळाच्या दिशेने धावतच सुटले.
‘केधवा भेटशी माझिया जिवलगा!’ त्याच्या भेटीची आंतरिक तळमळ हीच आहे. ही अनात्म आणि आर्त ओढ पंढरीची वारी करणार्‍या प्रत्येकाच्या मनात असते. म्हणूनच- ‘स्वल्प वाटे चला जावू, वाचे गाऊ विठ्ठल!’ या स्थितीत त्यांचा पांडुरंगाप्रती जीवीचा जिव्हाळा ओसंडून वाहताना दिसतो.
 
 
Pandharpur-Wari : वारकर्‍यांची ही अवस्था का होते? लाखो वारकरी का पांडुरंगाकडे धाव घेतात? त्याचं कारण आहे. इतर देवांना भेटताना गाभार्‍यात गेल्यावर दुरून दर्शन आहे. तुम्ही तिरुपती जा की तुळजापूर, कामाक्षा जा की काशी प्रत्येक ठिकाणी देव आणि भक्त यांच्यात अंतर राखावे लागते. मूर्ती बर्‍याच लांब अंतरावर असते. भक्ताला लांबून दर्शन घ्यावे लागते. पंढरीचा पांडुरंग परमात्मा मात्र आपल्या भक्ताला अगदी जवळ येऊ देतो. त्याला उराशी घेऊन आलिंगन भेट देतो. देव आणि भक्ताची ही भेट म्हणजे वारकरी संप्रदायात याला उराऊर भेट म्हणतात. ‘उराऊर भेट’ हा शब्द सर्वप्रथम ज्ञानेश्वरीमध्ये माउलींनी वापरला.
 
‘ते निजबोधे उराऊरी, भेटतू आत्मया श्रीहरी!’
निजबोध अर्थात आत्मसाक्षात्कार उराऊर भेटीने होतोच होतो. आत्मानुभवी भेट म्हणजे उराऊर भेट. प्रत्येक वारकरी त्या पांडुरंगाला कडकडून मिठी मारतो. मी आणि तू वेगळा नाहीच.
 
‘बाप रखुमादेवीवरू जीवीचा जिव्हाळा।
काही केलिया वेगळा, नव्हे गे माये!
काहीही झालं तरी भगवान आणि भक्त वेगळे नाहीत इतकं सख्य देव आणि भक्तात आहे.
 
‘हृदया हृदय एक जाहले, ये हृदयीचे ते हृदयी घातले!’
हृदयाला हृदय भिडते म्हणजे उराऊर भेट. हीच सोहम अवस्था त्याला प्राप्त होते. म्हणून तर-
 
‘पंढरीचा वारकरी वारी चुको नेदी हरी!’
बरं, ही अवस्था फक्त वारकर्‍यांचीच आहे का? तर नाही. ती आस आणि आच देव आणि भक्त दोन्हींकडे सारखीच. प्रेमाचा अग्नी दोन्हीकडे सारखाच. जशी वारकर्‍याला भेटीची आस आहे त्याहून दुप्पट आस पंढरीश पांडुरंगाला आहे.
 
‘वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ!’
ज्या ओढीने त्याचे भक्त पंढरीची वाट चालतात त्याहून विशेष ओढीने पांडुरंग परमात्मा त्या भक्ताची वाट पाहतो. तो भक्ताच्या वाटेकडे भेटीसाठी निरखून, आवडीने, अधीरपणे उभा असतो. ज्याप्रमाणे आई आपल्या सासरी गेलेल्या मुलीची वाट पाहत असते तशीच तातडी, उतावीळपणा आणि कृपादृष्टी विठुमाउलीची असते. म्हणून तर पंढरीनाथांना कृपाळू, तातडी आणि उतावीळ म्हटले आहे.
Pandharpur-Wari : आपला भक्त केव्हा येईल ही अस्वस्थता भगवंतामध्ये असते आणि ज्याक्षणी भक्त पंढरीनाथाजवळ येतो तसा तो भक्ताला कडकडून आपुल्या मिठीत घेऊन सांद्रकरुण अंतःकरणाने प्रेमपान्हा पाजतो. त्या आलिंगन भेटीचे वर्णन ज्ञानेश्वरीत माउली करतात-
 
‘तिये आलिंगन वेळी, होय आपेआप कवळी।
जळ जैसे जळी, वेगळे न दिसे!’
ही आलिंगन भेट होताच मी-तू पणाची बोळवण होते. जसे एका भांड्यातील पाणी दुसर्‍या पाणी असलेल्या भांड्यात टाकले तर दोन्ही पाणी समरस होतात तद्वतच हरी आणि हरिदास एकरूप होतात. कोण हरी आणि कोण हरिदास हा प्रश्न उरतच नाही. अशी तन्मय अवस्था प्राप्त होते.
 
‘आलिंगनी सुख वाटे, प्रेम चिदानंदी घोटे।
हर्षे ब्रह्मांड उतटे, समुळ मिटे मी पण॥’
पांडुरंग परमात्म्याची उराऊर भेट होताच वारी फलित झाल्याचा आनंद होतो. परमशांतीची अनुभूती, अहंभाव आणि अहंकार समुळ नष्ट होतो. केवळ वारकरी संप्रदायच असा एकमेव आणि अद्वितीय भक्तीचा प्रवाह आहे जिथे भगवंताची आलिंगन भेट आहे. हा एकमेव संप्रदाय आहे जिथे देवासोबत भक्तांचाही जयजयकार आहे. ‘पुंडलिकवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम...’ हा जयघोष त्याचेच प्रतीक आहे. थोडक्यात समचरण आणि समदृष्टी असलेला विटेवरचा पंढरीश पांडुरंग परमात्मा आपल्या भक्तांना उराशी कवटाळतो, आलिंगन भेट देतो, पोटाशी धरतो. यालाच ‘उराऊर भेट’ म्हणतात. या भेटीसाठीच लाखो वारकरी हाच भाव ठेवून असतात की-
 
‘माझे जीवीचे आवडी, पंढरपुरा नेईन गुढी।
पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणी वेधले॥’
म्हणूनच पंढरीचा वारकरी वारी चुकू देत नाही. उराऊर भेटीने विनय वृत्ती आणि विराट वृत्ती प्राप्त होते.
 
‘पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका।’
Pandharpur-Wari : हा निराभिमान प्राप्त होतो तो उराऊर भेटीने. मालकच जर सर्वांना उराशी कवटाळतो तर इतरांच्यात तो गुण आपोआप येतो. थोडक्यात पंढरीच्या पांडुरंगाला आलिंगन भेट देणे म्हणजेच उराऊर भेट आहे. त्या भेटीने मीपण समूळ नष्ट होते आणि मी-तू पणाची बोळवण होतेच होते. 
 
 - 9822262735
 
 
Powered By Sangraha 9.0