भारताला शक्तिशाली करण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा : केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव

    दिनांक :16-Dec-2023
Total Views |
चिखली,
Developed Bharat Sankalp Yatra :मोदी सरकारच्या कल्याणकारी योजना सर्वसामान्य माणसापर्यंत पोहचवण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा सुरू करण्यात आली असून केंद्राच्या योजनांचे लाभ मिळून त्यांच्या जीवनात बदल करणे हा या यात्रेचा उद्देश आहे. मात्र एवढ्यावरच न थांबता 2047 मध्ये भारताला एक शक्तिशाली देश म्हणून जगात ओळख निर्माण करण्याचे ध्येय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे असल्याचे प्रतिपादन केंद्रीय श्रम व पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी केले.
 
Developed Bharat Sankalp Yatra 
 
 
तालुक्यातील पेठ येथे दि. 16 डिसेंबर रोजी विकसित भारत संकल्प यात्रेच्या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर खा. प्रतापराव जाधव, आ. आकाश फुंडकर, आ. श्वेता महाले, माजी आ. विजयराज शिंदे, तोताराम कायंदे यांच्यासह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी. एन. मोहन, तहसीलदार सुरेश कव्हळे, गटविकास अधिकारी शिवशंकर भारसाकळे, डी आर डी ए चे प्रकल्प समन्वयक राजेश इंगळे, सुनील वायाळ, पंडितराव देशमुख, शिवाजीराव देशमुख, डॉ. प्रतापसिंह राजपूत आदी मान्यवर उपस्थित होते.
  
आपल्या भाषणात केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी गेल्या नऊ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताची ताकद व सन्मान जगात वाढला असून याला एकमेव कारण म्हणजे काँग्रेसच्या काळात देखील अनेक योजना आल्या मात्र त्या योजनांची अंमलबजावणी प्रामाणिकपणे झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. मोदी सरकारने मात्र पीएम किसान सन्मान निधी योजना, घरकुल योजना, उज्वला गॅस योजना, आयुष्यमान भारत कार्ड अशा एकाहून एक लोकोपयोगी व वेगवेगळ्या समाज घटकांच्या जीवनावर प्रभाव टाकणार्‍या योजना प्रभावीपणे राबवल्याचे यादव म्हणाले. शेतकरी, महिला, युवक, मध्यमवर्ग, बालुतेदार आणि गोरगरिबांची सर्वांगीण प्रगती करणे ही मोदी सरकारची ’ मोदी की गॅरंटी ’ असून या गॅरंटीच्या माध्यमातून भारत येणार्‍या काळात प्रगतीपथावर अधिक गतीने अग्रेसर होईल असा विश्वास केंद्रीय मंत्री भूपेंद्र जाधव यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला.
  
खामगाव - जालना रेल्वे मार्गाच्या विषयाला हात घातला. या रेल्वेमार्गाच्या डीपीआरची सुधारित त्वरित मिळावी, जेणेकरून राज्य सरकारकडून या रेल्वेमार्गासाठी 50 टक्के राज्यहिस्सा त्वरित मिळेल त्यासाठी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी प्रयत्न करावे अशी विनंती आ. श्वेता महाले यांनी केली. खा. प्रतापराव जाधव यांनी देखील हे मागणी लावूं धरली. आपण चारच दिवसांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना भेटून विनंती केली असून लवकरात लवकर सुधारित डीपीआर आपल्या हाती येईल अशी खात्री खा. प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केली. आ. आकाश फुंडकर यांनी देखील महायुतीचे सर्व नेते आमदार व खासदार खामगाव - जालना रेल्वेमार्गासाठी प्रयत्नशील असून आगामी पंधरा दिवसात हा डीपीआर मंजूर होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
या कार्यक्रमाच्या निमित्ताने कार्यक्रम स्थळी आलेल्या विविध योजना लाभार्थ्यांना बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाच्या योजनेमार्फत पेट्यांचे वाटप, नवीन रेशन कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड यांचे वाटप केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव व मान्यवरांचा हस्ते करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत संकल्प यात्रेच्या निमित्ताने केलेले ऑनलाइन संबोधन देखील उपस्थित जनसमुदायाने सामूहिकपणे ऐकले. पेठ ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीने केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांचे हार घालून स्वागत करण्यात आले. सदर कार्यक्रमाची प्रास्ताविक गटविकास अधिकारी शिवशंकर भारसाकळे यांनी केले. पेठ तसेच आसपासच्या गावातील शेतकरी महिला युवक व ग्रामस्थ या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.