मेहकर,
Kaka Maharaj इंद्रिये आपल्याला विषयात ओढतात. आणि विषयाच्या दारात भीक मागणारे ते दीन ! देव आणि संत सोडल्यास बाकी संसारातील सगळेच दीन आहेत. शरीर, संपत्ती, सत्ता ही संसारातली बळं तर शरीर, ज्ञान आणि भाव ही परमार्थातील बळं. ज्याचेजवळ हे नाही तो दुर्बळ आत्मस्वरूपात स्थीत तो उंच आणि सर्वशास्त्र कळूनसुद्धा आचरण हीन तो नीच ! या सर्वासाठी हरिनामाची नाव हे तारक आहे, सुखाची राशी आहे. म्हणून हरिकथा श्रवण करा, नामजप करा आणि संतसंग करा आणि भवसागर तरून जा असे प्रतिपादन जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदीचे अध्यापक ह.भ.प. काका महाराज पाहणे यांनी केले.
दि. 19 डिसेंबर रोजी येथील श्री बालाजी परमात्म्याच्या 135 व्या प्रकटदिन महोत्सवातील प्रथम कीर्तनसेवा देण्यासाठी त्यांनी जगद्गुरू तुकोबारायांचा दीन आणि दुर्बळाशी सुखरासी हरिकथा तारूं भवसागरीचे उंचनीच अधिकारी हा हरिकथेचे महात्म्य कथन करणारा अभंग चिंतनासाठी निवडला होता.लक्षण, चरित्र आणि महिमान या तीन भूमिकांमधून संत लक्षात घ्यावेत. आपल्याला ते लक्षणाने कळले तर आत्मस्वरुपाचे ज्ञान होते. चरित्र कळल्यास जीवनात मार्गदर्शन घडते आणि महिमेने कळल्यास अंतःकरणात परमार्थाविषयी श्रद्धा निर्माण होते. म्हणून पर्वकाळ आणि जयंत्या यांचे वैष्णवांचा मेळा जमवून उत्सव साजरे करावेत म्हणजे परमार्थाविषयी आवड वाढेल.संतांच्या याणि आपल्या आवडीमधे भेद आहे. अभाव, स्वभाव, प्रभाव, कुभाव आणि विभाव या पाच दोषांनी आपली आवड दूषित आहे. आपण कितीही मिळवले तरी अभाव संपत नाही तर संतांजवळ कधीही न सरणारे तत्व असते. संसाराचा स्वभाव दुःखाचे मूळ तर संत चिकूमधील बीया प्रमाणे अलगद असतात. श्रेष्ठत्वाची लढाई जीव लढतो. आपल्याकडे आहे ते दाखवतो पण मी कोण हा विचार करत नाही. तर संतांची सर्व कर्मे ब्रह्मार्पण झालेली असतात आणि त्यांच्या मनातला भेदाभेदाचे अमंगळ भ्रम गेलेले असतात. म्हणून त्यांचेकडे प्रभाव दोष नसतो.Kaka Maharaj आपल्याला ईशनिर्मित सृष्टी बांधत नाही तर जीवकल्पित सृष्टी दुःख देते. परंतु संतांच्या अंत:करणात अखंड परमात्मा चिंतन चालू असते. म्हणून वाईट विचार शिवत नाहीत. आपल्याला विरुद्ध स्वभावाचे माणसं जवळ आल्यास दुःख होते पण अशी माणसे संतांजवळ गेल्यास ती विरुद्ध राहतच नाहीत. म्हणून ते विभाव दोष राहत नाही. संतसुद्धा तारू आहेत म्हणून संतसंग करा आणि मंदिरातला परमात्मा हृदयात स्थीत करा हे आवाहन त्यांनी शेवटी केले.कीर्तन श्रवणास ह.भ.प. वसंत महाराज राऊत, ह.भ.प. पांडुरंग नालिंदे गुरूजी, संस्थानचे विश्वस्त तसेच पंचक्रोशीतील सुजाण भाविक मोठ्या संख्येत उपस्थित होते.