रिसोड,
Ayodhya : प्रभू श्रीरामचंद्राची जन्मभूमी आयोध्या येथून पूजित अक्षदा कलशाचे २४ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी ३ वाजता रिसोड शहरातील मालेगाव नाका येथे आगमन होणार आहे, तरी पुजित अक्षदा कलशाचे स्वागत करण्यासाठी व दर्शनासाठी समस्त हिंदू बंधू भगिनींनी उपस्थित राहण्याचे आवाहन सकल हिंदू समाज रिसोड शहर तर्फे करण्यात आले आहे.
२२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्या येथे प्रभू श्रीरामाची मूर्ती प्रतिष्ठापना नव्याने बांधण्यात आलेल्या श्रीराम मंदिर मध्ये होणार आहे. या कार्यक्रमासाठी सर्व हिंदू बांधवांना निमंत्रण देण्यासाठी श्री प्रभू रामाची जन्मभूमी आयोध्या येथून पुजित अक्षदा कलशाचे आगमन रिसोड शहरामध्ये होत असून, या अक्षदा कलशाची नगर परिक्रमा होणार आहे. मालेगाव नाका या ठिकाणी आगमन झाल्यानंतर अक्षदा कलशाचे पूजन करून नगरपरिक्रमेला सुरुवात होणार आहे. लोणी फाटा मार्गे मा जिजाऊ चौक , सिव्हिल लाईन मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ,सोनार गल्ली, अष्टभुजा चौक, आप्पा स्वामी महाराज मंदिर समोरून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अक्षदा कलशाची महाआरती होणार आहे.
अक्षदा कलश नगरपरिक्रमेचे मार्गावर माता भगिनींनी सडा टाकून, रांगोळी काढून फुलांची उधळण करून या कलशाचे स्वागत करावे. नगर परिक्रमा व महाआरतीसाठी समस्त हिंदू भगिनींनी उपस्थित राहण्याचे आवाहन सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात येत आहे.