तभा वृत्तसेवा
शिरखेड,
Vidarbha State Andolan : मोर्शी ते अमरावती राज्य महामार्गावरील मोर्शी तालुक्यातील निंभी येथील बस थांब्यावर शुक्रवार, 29 डिसेंबर दुपारी 1 वाजता विदर्भ राज्य आंदोलन समिती व शेतकरी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कापसाला भाव, वेगळा विदर्भ, शेतकरी विरोधी धोरणे अशा विविध मागण्यांकरिता सुमारे एक तास चक्काजाम आंदोलन छेडण्यात आले.
शेतकर्यांवरील अन्यायाने सीमा ओलांडली आहे. शेतकर्यांना उत्पादन खर्चही हातात पडू नये अशी बाजार व्यवस्था शासनाने निर्माण केली आहे. सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे व बाजारपेठेच्या हस्तक्षेपामुळे शेतकरी हा पूर्णतः हवालदिल झाला आहे; म्हणून परिणामी शेतकरी आत्महत्या होत आहे. परंतु या निर्दयी सरकारला जाग येत नाही की, झोपेचे सोंग घेऊन नाटक करीत आहे, अशी टीका करीत विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हाध्यक्ष गणेश कुसराम यांनी Vidarbha State Andolan वेगळा विदर्भ झालाच पाहिजे, कापसाला भाव मिळालाच पाहिजे, अशा घोषणा देत सरकारला धारेवर धरले.
विदर्भ राज्य संघर्ष समिती Vidarbha State Andolan व कोअर समिती सदस्य दिलीप भोयर यांच्या मार्गदर्शनात व विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हाध्यक्ष गणेश कुसराम यांच्या नेतृत्वात शेतकरी संघटना तालुका प्रमुख सुधाकर गायकी, लीलाधर गायकी, किसन अघाडे, श्याम गायकी, मंगेश साबळे, शशिकुमार ठाकरे, हरिभाऊ नवघरे, गजानन डोंगरे आणि निंभी येथील गावकर्यांचा या आंदोलनात सहभाग होता. आंदोलन स्थळी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून निंभीच्या पोलिस पाटील सविता राऊत, शिरखेडचे ठाणेदार सूरज तेलगोटे, दुय्यम ठाणेदार अनुप वाकडे, बीट जमादार विनोद मनोहरे, पोलिस कर्मचारी अजय अडगोकार, वैभव घोगरे, अमित राऊत, बिरोले यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.