3 हजार हेक्टर क्षेत्राला विम्याचे कवच

03 Dec 2023 21:22:18
- रबीत 1500 शेतकर्‍यांनी काढला पीकविमा

वर्धा, 
सरकारच्या वतीने शेतकर्‍यांसाठी प्रधानमंत्री पीकविमा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत रबी हंगामातही पिकांना विम्याचे संरक्षण देण्यासाठी एक रुपयात पीकविमा काढण्यात येत आहे. सद्यःस्थितीत रबी हंगामात दीड हजारांवर शेतकर्‍यांनी पीकविमा काढला आहे. त्यामुळे 3 हजार हेक्टरवरील क्षेत्राला विम्याचे संरक्षण मिळाले आहे.
 
 
Pik Vima Yojana
 
सरकारकडून राबविण्यात येणार्‍या प्रधानमंत्री Pik Vima Yojana पीकविमा योजनेत विविध पिकांचा विमा उतरविण्यात येत आहे. यावर्षी खरीप हंगामापासून शेतकर्‍यांना एक रुपया शुल्क भरून पीकविमा काढला जात आहे. खरीप हंगामात मोठ्या संख्येने शेतकर्‍यांनी पीकविमा उतरविला होता. अतिवृष्टी, सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या अनेक शेतकर्‍यांनी पीकविमा कंपनीकडे तक्रारी नोंदविल्या. त्यानंतर सर्वेक्षणानंतर अनेक शेतकर्‍यांना मदतही मिळण्यास सुरुवात झाली. असे असले तरी खरीप हंगामात अनेक शेतकर्‍यांना नुकसान होऊनही विम्याची रक्कम मिळण्यापासून वंचित राहावे लागले आहे. रबी हंगाम सध्या सुरू असून गहू, हरभरा पिकाची लागवड सुरू आहे. काही शेतकर्‍यांच्या शेतात लागवडीनंतर गहू, हरभरा पिकाची उगवणही झाली आहे. शेतकर्‍यांनी रबी हंगामात पिकांचा विमा काढण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात 1 हजार 547 शेतकर्‍यांनी विमा काढला आहे. यामध्ये आर्वी तालुक्यात 125, आष्टी 67, देवळी 297, हिंगणघाट 247, कारंजा 323, समुद्रपूर 245, सेलू 116 आणि वर्धा तालुक्यातील 134 शेतकर्‍यांनी विमा काढला आहे. विमा काढणार्‍या शेतकर्‍यांनी 2348 अर्ज सादर केले आहेत.
 
 
चार दिवसांपूर्वी जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाल्याने अनेक शेतकर्‍यांनी खरीप तसेच रबी हंगामातील पिकांच्या नुकसानीबाबत Pik Vima Yojana पीकविमा कंपनीकडे तक्रारी नोंदविल्या. पण, त्यामध्ये अनेकांना अडचणींचा सामना करावा लागला. बरेचदा टोल फ्री क्रमांक व्यस्त राहिल्याने शेतकर्‍यांना तक्रारी नोंदविता आल्या नाहीत. तसेच अ‍ॅपमध्ये तक्रार नोंदविताना काहींना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. बरेच शेतकरी अ‍ॅपसंदर्भात माहिती नसल्याने पीक विम्याबाबत तक्रार नोंदवू शकलेले नाही.
Powered By Sangraha 9.0