सायकलने नर्मदेची परिक्रमा पूर्ण

- शशी ठवळींचे शहरात जंगी स्वागत

    01-Feb-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा 
अमरावती, 
Narmada Parikrama : गाडगेनगर येथील रहिवासी शशी ठवळी या ध्येयवेढ्या छायाचित्रकाराने सुमारे 3 हजार 300 किलोमीटर अंतर सायकलद्वारे पूर्ण करून नर्मदा परिक्रमाचे ध्येय पूर्ण केले आहे. या माध्यमातून त्यांनी नद्यांचे संरक्षण व पाणी बचतीचा संदेश सर्वदूर पसरविला आहे.
 
Narmada Parikrama 
 
शशी ठवळी यांच्या या आगळ्यावेगळ्या जनजागृतीपर संकल्पना, कृतीबद्दल सर्वत्र कौतुक केल्या जात आहे. त्यांचे अमरावती शहरातील वेलकम पॉईंट येथे मॉर्निंग क्रिकेट क्लब तसेच अमरावती सायकलींग असोसिएशन व फोटोमेट मल्टीपर्पज असोसिएशनतर्फे हार, पुष्पगुच्छ देऊन जंगी स्वागत करण्यात आले. शशी ठवळी यांनी 1 जानेवारी 2023 रोजी सायकलने ओंकारेश्वर येथून संकल्प घेऊन नर्मदा परिक्रमेस सुरुवात केली. ही परिक्रमा ओंकारेश्वर -रेवासागर (गुजरात) -भरुज (गुजरात) - महेश्वर - बरेली - जबलपूर -अमरकंटक -नरसिंगपूर -होशंगाबाद - ओंकारेश्वर अशी 3 हजार 300 किलोमीटरची परिक्रमा शशीने सायकलद्वारे एकट्याने पूर्ण केली. ही परिक्रमा पूर्ण करण्यास शशीला एकूण 27 दिवसाचा कालावधी लागला.
 
 
या कालावधीत दररोज 100 ते 125 किलोमीटर सायकलने प्रवास करीत होते. सकाळी आंघोळ करून प्रवासादरम्यान मिळेल त्या नर्मदानदीकाठच्या आश्रमात किंवा मंदिरात राहणे व मिळेल ते जेवण करणे हा त्यांचा रोजचा नित्यनियम होता. या परिक्रमा (Narmada Parikrama) मागील शशी यांचा हेतू देशातील नद्या स्वच्छ व सुंदर असल्यास पर्यावरण हे स्वच्छ व सुंदर राहू शकते. त्यामुळे पृथ्वीतलावरील सर्व सजीव प्राणी, मनुष्याचे स्वास्थ चांगले राहू शकते. ही परिक्रमा प्रत्येकाने पूर्ण करावी, असे शशी यांनी आपल्या स्वागताप्रसंगी मनोगत व्यक्त केले. स्वागताप्रसंगी डॉ. कुलकर्णी, मंगेश पाटील, आशिष शेरेकर, राहुल शर्मा, अतुल कळमकर, पीयूष शिरसागर, संजय मेंदसे, प्रवीण जयस्वाल, देवानंद भोजे, विजय दुर्वे, कविता धुर्वे, अमिता देशपांडे, अर्चना हिवराळे, अंजली देशमुख, सतीश ढोरे, पिंटू देशमुख, दिनेश पांडे, संदीप सगणे, उमेश काळे, योगेश देशमुख, स्वरूप अढावू, संदीप राऊत, प्रवीण ठाकरे, मनीष झीमटे, नितीन खंडारकर यांच्यासह अन्य उपस्थित होते.