माणसात सेवाभावी वृत्ती असावी. मात्र, या वृत्तीने समाजाचे सक्षमीकरण शक्य नाही. सेवा हा सक्षमीकरणासाठी कमकुवत पर्याय ठरेल. त्यामुळे समाजाचे सक्षमीकरण न्यायानेच होऊ शकेल, असे मत सरन्यायाधीश Dr. Dhananjay Chandrachud डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ, नागपूरचा पहिला दीक्षांत सोहळा शनिवारी वारंगा बुटीबोरी येथील विद्यापीठाच्या शैक्षणिक आवारात झाला. यावेळी मुख्य अतिथी म्हणून सरन्यायाधीश डॉ. चंद्रचूड बोलत होते. निवृत्त सरन्यायाधीश व विद्यापीठाचे संस्थापक कुलपती शरद बोबडे, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व विद्यापीठाचे कुलपती भूषण गवई, मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती व विद्यापीठाचे उपकुलपती संजय गंगापूरवाला, नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती सुनील शुक्रे, न्या. अतुल चांदुरकर, न्या. अनिल किलोर, न्या. भारती डांगरे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजेंदर कुमार व कुलसचिव डॉ. आशिष दीक्षित यांची याप्रसंगी उपस्थिती होती.
Dr. Dhananjay Chandrachud डॉ. चंद्रचूड पुढे म्हणाले, विधि शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या वकील आणि भविष्यातील न्यायाधीशांनी आपल्या व्यावसायिक जीवनात घटनात्मक मूल्यांचा अंगीकार करावा, त्यामुळे त्यांंना कधीच अपयश येणार नाही. कायदा व समाजाला न्यायाच्या समांतर आणण्यासाठी वकील, न्यायाधीशांनी संविधानात्मक मूल्यांसह पुढाकार घेणे आवश्यक आहे. समाजातील विषमता आणि जातीभेद यांच्यावर मात करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण विश्वात एक उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणून ‘याती मिळविली. त्यांनी निर्माण केलेल्या संविधानाच्या दस्ताऐवजात परिवर्तनात्मक क्षमता असून, प्रस्ताविकेत संविधानाचे तत्त्व अंगिकृत केलेले आहे. त्यामुळे विधिज्ञ म्हणून आपण आर्थिक, सामाजिक आणि राजकीय न्याय सर्वांना देण्याचे वचन घेतले पाहिजे, असेही आवाहन त्यांनी केले. न्या. भूषण गवई यांनी पहिल्या दीक्षांत सोहळ्याचा हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विजेंदर कुमार यांनी केले. याप्रसंगी न्यायमूर्ती, वकील, विद्यार्थी, शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.