विद्यापीठात कर्मचार्‍यांनी लावल्या काळ्याफिती

- दिवसभर केले कामकाज
- आज एक दिवसाचा संप

    15-Feb-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा 
अमरावती, 
महाराष्ट्रातील सर्व अकृषी विद्यापीठीय (University) तसेच सर्व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या आंदोलनाच्या तिसर्‍या टप्प्यात बुधवारी विद्यापीठातील सर्व कर्मचार्‍यांनी काळ्या फिती लावून कामकाज केले. गुरुवारी 16 फेब्रुवारी रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्यात येणार असून कर्मचार्‍यांच्या मागण्यांवर शासनाने तोडगा काढला नाही तर 20 फेब्रुवारीपासून महाराष्ट्रभरातील विद्यापीठे, महाविद्यालये कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहे.
 
 University
 
विद्यापीठातील (University) कर्मचार्‍यांनी काळ्या फिती लावून निषेध केला. सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना पुर्ववत लागू करणे, सातव्या वेतन आयोगातील तरतुदीनुसार 10.20.30 वर्षानंतरच्या लाभाची योजना विद्यापीठीय तसेच माहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचामयांना लागू करणे, वेतनाच्या फरकाची थकबाकी अदा करणे, विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचार्‍यांची रिक्त पदे भरण्यास मान्यता देणे, 2005 नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचार्‍यांना जुनी पेंशन योजना लागू करणे, विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचार्‍यांना सहाव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी गृहित धरून त्या आधारे सातवा वेतन आयोगाची वेतन श्रेणी लागू करणे, या प्रमुख मागण्यांच्या पूर्ततेसाठी कर्मचारी संघटनांनी आंदोलन पुकारले आहे.
 
 
आंदोलनाच्या तिसर्‍या टप्प्यात बुधवारी काळ्या फिती लावून कामकाज करण्यात आले. महिला कर्मचार्‍यांनी काळे कपडे परिधान करून निषेध नोंदविला. गुरुवारी एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्यात येणार असून यानंतरही शासनाने मागण्यांसंदर्भात सकारात्मक भूमिका घेतली नाही तर 20 फेब्रुवारीपासून संप करण्यात येणार आहे.