नागपूर,
‘गटार’, ‘न्यायालयात जाणारा प्राणी’, ‘मुक्ताई’ या तीन (G.H. Raisoni Cup) एकांकिकांची जी.एच. रायसोनी करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. नागपूरला झालेल्या प्राथमिक फेरीतून या एकांकिका निवडण्यात आल्या.
जी.एच. रायसोनी स्पोर्ट्स (G.H. Raisoni Cup) अँड कल्चरल फाउंडेशनच्यावतीने राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. राज्याच्या विविध शहरांमध्ये स्पर्धेची प्राथमिक फेरी आयोजित करण्यात आली. यात नागपूर विभागाची प्राथमिक फेरी १४ फेब्रुवारीला श्रद्धा हाऊस येथील महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडली. प्राथमिक फेरीतून महाअंतिम फेरीसाठी तीन एकांकिकांची निवड होणार होती. यामध्ये पीडब्ल्यूएस महाविद्यालयातर्फे सादर करण्यात आलेली ‘गटार’, डॉ. विठ्ठलराव खोब्रागडे कला व वाणिज्य महाविद्यालयातर्फे सादर करण्यात आलेली ‘न्यायालयात जाणारा प्राणी’ तसेच संताजी महाविद्यालयाच्या ‘मुक्ताई’ या एकांकिकांची महाअंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली.
स्पर्धेची महाअंतिम फेरी ४ व ५ मार्चला हिंगणा मार्गावरील (G.H. Raisoni Cup) जी.एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात होणार आहे. यामध्ये राज्यभरातील अव्वल १८ एकांकिका सादर होतील. मुंबई, पुणे, नगर, नाशिक, जळगाव, अमरावती व नागपूर विभागांमधून या एकांकिका निवडण्यात आल्या आहेत. ५ मार्चला सायंकाळी प्रसिद्ध रंगकर्मींच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येतील. प्राथमिक फेरीला प्रसिद्ध रंगकर्मी रुपाली मोरे व अनिल पालकर यांनी परीक्षण केले. यावेळी रायसोनी समूहाचे जनसंपर्क अधिकारी अमित गंधारे व प्रकल्प व्यवस्थापक मृणाल नाईक यांनी परीक्षकांचे स्वागत केले.
- सौजन्य: मृणाल नाईक, संपर्क मित्र