तभा वृत्तसेवा
नांदगाव खंडेश्वर,
येथील सुमारे साडेआठसे वर्षांपूर्वीचे भगवान खंडेश्वराचे भव्य असे महादेवाचे शिवालय (Khandeshwar Temple) आहे. महाशिवरात्रीला या शिवलायमध्ये दरवर्षी हजारो भाविक श्रद्धेने या ठिकाणी येतात. निसर्गरम्य परिसरात वसलेले हे ऐतिहासिक शिवालय दगडांनी बांधले आहे. या मंदिरातील कोरीव शिल्प आणि रेखीव बांधकाम हे अतिशय सुंदर असून, येणारे भाविक येथील रचना पाहून अगदी थक्क होतात. या शिवलयाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या कळसावर कधीही कावळा किंवा कबूतर बसत नाहीत. तसेच मंदिरात एक चावी बसविली आहे. ती काढल्यास मंदिर कोसळेल, असे पुरातन काळापासून सांगितले जाते. त्यामुळे भक्तांमध्ये या चावीबद्दल अति कुतुहल असून ते या चावीची पूजा सुद्धा करतात. मात्र, काही जाणकारांनी या चावीचे एक वैज्ञानिक महत्त्व असल्याचे सांगितले आहे.
शिवालयाच्या विविध वैशिष्ट्यांपैकी एक असलेली ती चावी विशेष महत्त्व प्राप्त करून आहे. (Khandeshwar Temple) शिवालयाच्या बांधकामामध्ये दगडांच्या आड एक चावी आहे. ही चावी जर काढली तर मंदिर कोसळेल, अशी आख्यायिका आहे. या चावीची देखील भाविक पूजा करतात. या चावीला हात लावला तर ती हलते. मात्र, ती त्या दगडांमधून निघत नाही. या शिवालयाची पाहणी करण्यासाठी काही वैज्ञानिक येथे आले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार या शिवालयावर वीज पडू नये यासाठी केलेली खास व्यवस्था म्हणजे ही चावी असल्याचे त्यांनी सांगितले. या शिवालयाच्या कळसावर कावळा, कबूतर बसत नाहीत असे सुद्धा म्हटले जाते. या कळसावर केवळ रान पोपटांचा थवा नियमित असतो. मात्र, मंदिराच्या कळसापर्यंत आजपर्यंत कधीही कावळा किंवा कबूतर गेले, असे कधी पाहिल्या गेले नाही. या मंदिराच्या कळसालगत भुयारासारखे स्थान तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी पूर्वी ऋषीमुनी होमहवन करीत असत, अशी माहिती देखील या परिसरातील भाविक सांगतात.