उड्डाणपुलाच्या बांधकामात भ्रष्टाचार झाल्याचा काँग्रेसचा आरोप

- तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा

    दिनांक :18-Feb-2023
Total Views |
अकोला, 
शहरात नव्यानेच बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या (Flyover) बांधकामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप येथे काँग्रेसतर्फे शुक्रवार 17 रोजी करण्यात आला असून काँग्रेसजनांनी याबाबत आंदोलन केले. येथील जलवाहिनी व भराव खचल्याने मूर्तिजापूर रोडवरून चढणारा मार्ग बंद झाला आहे. तसेच भुयारीमार्ग निरूपयोगी ठरला आहे. त्यामुळे यावर तातडीने उपाय शोधावा व दोषींवर कारवाई करावी तसे न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे.
 Flyover
 
महानगरात 28 मे 2022 रोजी निमवाडी ते नेहरुपार्कनजीक आणि मध्यवर्ती कारागृापासून ते अग्रसेन चौकापर्यंत अशा दोन उड्डाणपुलांचे (Flyover) लोकार्पण करण्यात आले. मात्र अशोक वाटिका चौकातील उड्डाण मूर्तिजापूर रोडकडे जाणारा उतार पूल निकामी ठरला असून कामही नित्कृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप काँग्रेसने आज केला. मध्यवर्ती बस स्थानकासमोर भुयारी मार्ग बांधण्यात आला आहे हा मार्ग निशांत टॉवर जवळून जनता बाजारासमोर निघतो. या मार्गात पावसाळ्यात प्रचंड पाणी तुंबते. त्यामुळे हा मार्ग अनेक दिवस बंद असतो. या मार्गासाठीचा पैसाही पाण्यात गेल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
 
 
शिवाय शिवर ते रिधोरा या महामार्गाचे रूंदीकरणाचे काम सुरू आहे. रस्त्याच्या बाजूचे विद्युत खांब व अन्य काम पूर्ण झालेले नाहीत. ते काम अर्धवट करून संत कंवरराम उड्डाणपूल (Flyover) ते लक्झरी बस स्टॅण्ड पर्यंतचे काम तसेच ठेवले असून याचे चुकीचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले, असा आरोप काँग्रेसने केला आहे. या आंदोलनात काँग्रेसचे डॉ. प्रशांत वानखडे, प्रदेश महासचिव प्रकाश तायडे, प्रशांत गावंडे, महेंद्र गवई, आकाश कवडे, सागर कावरे, सोमेश डिगे, तपस्सू मानकीकर, पुष्पा देशमुख, सुमन भालदाने, वर्षा बडगुजर, अंकुश पाटील, अभिजित तंवर आदी उपस्थित होते.