तभा वृत्तसेवा
आर्णी,
Rajgad fort : तालुक्यातील शारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील रमेश मुंडावरे या शिक्षकाने शाळा परिसरात राजगड किल्ल्याची प्रतिकृती बनवली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना किल्ल्यांची माहिती व्हावी म्हणून शिक्षक मुंडावरे यांनी शाळा परिसरात राजगड किल्ल्याची भव्य अशी प्रतिकृती तयार केली आहे. या किल्ल्यामध्ये तटबंदीवर रक्षण करणारी तोफ, किल्ल्याच्या परिसरात जाण्यासाठी रस्ता असून त्याच किल्ल्याच्या आतील भागामध्ये एक छोटेसे गाव आहे.
![Rajgad fort Rajgad fort](https://www.tarunbharat.net/Encyc/2023/2/19/y19Feb-Rajgad_202302192015084812_H@@IGHT_360_W@@IDTH_600.jpg)
किल्ल्यावरून प्रस्थान करताना छत्रपती शिवराय आणि त्यांचे मावळे हातात भाले घेऊन संरक्षणासाठी उभे आहेत. बाजूला माँ तुळजाभवानीचे मंदिर आहे. किल्ल्याच्या बाजूला नदी वाहताना दिसत आहे. राजगड किल्ल्याची प्रतिकृती विद्यार्थ्यांसमोर असल्याने त्यांना त्याची परिपूर्ण माहिती मिळत आहे. या निर्मितीसाठी शाळेतील सर्व शिक्षकांची मदत झाली असून ही प्रतिकृती म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळातील साक्षात किल्लाच दिसत आहे. शाळेतील किल्ल्याची ही प्रतिकृती पाहण्यासाठी विद्यार्थी, गावातील नागरिक, अधिकारी गर्दी करत असून भेट देऊन रमेश मुंडावरे यांचे अभिनंदन करत आहेत. गटशिक्षणाधिकारी किशोर रावते यांनी या शाळेला भेट देऊन रमेश मुंडावरे यांचे अभिनंदन करून त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी केंद्रप्रमुख राजू परमार तसेच शाळेचे मु‘याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.