तभा वृत्तसेवा
कळंब,
कळंब (Kalamb) तालुक्यात नव्यानेच नियुक्त झालेले ठाणेदार उमेश बेसरकर हे सध्या स्वत:ला स्थिर करण्याच्या मार्गावर असून तालुक्यामधील वेगवेगळ्या अवैध धंद्यांना मात्र कोणताही चाप बसवणे त्यांना अद्याप जमलेले नाही. आपले अर्थपूर्ण हितसंबंध जोपासण्याच्या प्रकि‘येमध्ये कळंबचे ठाणेदार सध्या गुंतलेले दिसत आहेत. काही अवैध व्यवसायी तर, आम्हाला पहिल्यापेक्षा डबल द्यावे लागते, आमचं ठरते, पण मटकेवाल्यांचे बिघडते, असे सांगत आहेत.
त्यामुळे कळंब (Kalamb) तालुक्यातील अवैध व्यवसायींना नवीन ठाणेदारांकडून कोणताही दणका मिळणार नसून आपले अर्थपूर्ण संबंध कसे जोपासल्या जातील याकडेच नवनियुक्त ठाणेदार उमेश बेसरकर यांचे बारीक लक्ष असल्याचे जाणवत आहे. दुसरीकडे, तालुक्यातील जनतेचे कायदा व सुव्यवस्थेची घडी केव्हा बसणार याकडे लक्ष लागलेले आहे. एखादा ठाणेदार कळंबच्या जनतेच्या प्रश्नांना दाद नसेल देत तर त्याचे काय परिणाम होतात हे एक महिन्यापूर्वीच तालुक्यातील जनतेने दाखवून दिले आहे. जनतेच्या रेट्यामुळे नव्याने नियुक्त झालेले ठाणेदार त्यातून धडा घेतात की, ‘मागचे पान वाचत पुढे चला’ धोरणाचा अवलंब करतात याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
सध्या कळंब शहरातून खुद्द पोलिस ठाण्यासमोरून मोठ्या प्रमाणात अवैध गोतस्करीची वाहने जातात, रेती तस्करीसुद्धा आपली वाहतूक ठाण्यासमोरून सुरळीत करत आहे. या व्यवसायांना पोलिसांचेसुद्धा या अवैध व्यवसाय व वाहतुकीस अभय असून याकडे पोलिसांचे वरिष्ठ लक्ष देतील अशी अपेक्षा आहे. शहरासह वेगवेगळ्या ठिकाणी सध्या जुगार मोठ्या प्रमाणात भरत असून नव्या ठाणेदारांनी मात्र अजून तिकडे लक्ष दिलेले दिसत नाही. त्यामुळे या सर्व धंद्यांना ठाणेदारांची मूकसंमती तर नाही ना असे कळंबवासींना वाटू लागणार आहे. नवनियुक्त ठाणेदारांनी अवैध धंद्यांना दणका द्यावा, अशी तालुक्यातील बहुतांश नागरिकांची अपेक्षा असताना ते अवैध व्यवसायींना अभय देतात की आपला खाक्या दाखवत दंडुका देतात हे पाहण्याकरिता जनता उत्सुक आहे.