तभा वृत्तसेवा
अमरावती,
Vidarbha Kesari : येथे विदर्भ विभागीय कुस्तीगीर संघ मान्यताप्राप्त व अमरावती शहर तालीम संघ यांच्या सहकार्याने साई बहुउद्देशिय संस्था व भारतीय जनता पार्टी अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 37 वी विदर्भ केसरी कुस्ती स्पर्धेचा विदर्भ केसरी हा बहुमान वाशीमचा मल्ल सुदर्शन हराळ याला मिळाला.
संत गाडगेबाबा मंदिराच्या मैदानावर रविवारी रात्री विदर्भ केसरीसाठी (Vidarbha Kesari) अंतिम कुस्ती झाली. सुदर्शन हराळ याला चांदीची गदा, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम 51 हजार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मैदानामध्ये मोठ्या प्रमाणात आतिषबाजी करण्यात आली. वाशीमचाच मल्ल अर्जुन गाढेकर याने द्वितीय क्रमांक पटकावला. त्याला 31 हजार रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. अकोला येथील सिद्धार्थ गवई याने तृतीय क्रमांक पटकविला. त्याल रोख रक्कम 21 हजार, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच विविध 8 वजन गटामध्ये झालेल्या स्पर्धेत 60 हजारांची पारितोषिके देण्यात आली. विदर्भ विभागीय कुस्ती महिला स्पर्धेत महिलांच्या विविध 7 वजन गटामध्ये सुमारे 50 हजारांची पारितोषिके देण्यात आली. रात्रीपर्यंत चाललेल्या या स्पर्धेमध्ये अनेक तुल्यबळ दंगली पाहायला मिळाल्या. कुस्तीप्रेमी नागरिकांनी स्पर्धा पाहण्यासाठी गर्दी केली होती.
बक्षिस वितरण सोहळ्याला महाराष्ट्र कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खा. रामदास तडस, खा. डॉ. अनिल बोंडे, भाजपा जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, शहराध्यक्ष किरण पातूरकर, भाजपा प्रदेश सदस्य जयंत डेहनकर, रवींद्र खांडेकर, विदर्भ कुस्तिगिर परिषदेचे सचिव गणेश कोहळे, महाराष्ट्र ऑलम्पिक संघटनेचे अॅड. प्रशांत देशपांडे. प्रा. संजय तिरथकर यांच्यासह अन्य उपस्थित होते. स्पर्धेचे प्रमुख म्हणून विदर्भ कुस्तिगिर परिषदेचे सदस्य रणवीरसिंह राहाल यांनी जबाबदारी पार पाडली. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी विवेक कलोती, हरिष साऊरकर, निलेश देशमुख, आकाश वाघमारे, विशाल गोधनकर, सागर महल्ले, वैभव बगणे, प्रतिक इंगळे, राम तिवारी, आनंद गुप्ता, कर्नलसिंह राहाल, मनिष चौबे,सचिन यादव, सतीश यादव, अखिलेश राठी, अनिरुद्ध लढ्ढा, शुभम पांढरे, प्रतिक जोशी, अंकित गाडगे, आनंद बुंदेले, संदीप हाडोले, अजिंक्य असणारे, अखिलेश खडेकार यांच्यासह अनेकांनी प्रयत्न केले.