तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
यवतमाळ-वाशिम-लोकसभा मतदारसंघाच्या (Bhavna Gawli) खासदार भावना गवळी यांनी यवतमाळ तसेच दारव्हा तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन नागरीकांच्या समस्या सोडविल्या. जनता दरबार भरवून तसेच अधिकार्यांशी संवाद साधून नागरिकांच्या समस्यांचा निपटारा केल्याने नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे.
बोरीचंद्रशेखर येथे परिसरातील आठ ते दहा ग्रामपंचायतच्या नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी जनता दरबार भरविण्यात आला. याठिकाणी बोरीचंद्रशेखरचे सरपंच लक्ष्मण वांजरेकर, उपसरपंच ओम लढ्ढा, सदस्य प्रफुल खडसे, विनोद कावरे, किशोर तांगडे, उपतालुका प्रमुख डॉ. नाईक, कंझराचे सरपंच उमेश लांडे, बोरी बु.चे माजी सरपंच मुकेश कळंबे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. नागरीकांनी आपल्या घरकूल, रस्ते, पाणी, विज, पोलिस विभागाशी संबंधीत तक्रारी इत्यादीबाबत समस्या सांगून निराकरण करुन घेतले. बचतगटातील महिलांच्या सुध्दा समस्या सोडविण्यात आल्या. यानंतर पाथ्रडदेवी येथील आरोग्य शिबीराचे उद्घाटन खासदार भावना गवळी (Bhavna Gawli) यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी सरपंच जयसिंग राठोड, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ओमशिव राठोड उपस्थित होते. हे शिबीर ग्रामपंचायत तसेच बोरीअरब येथील कला व वाणिज्य महाविदयालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. याठिकाणी असलेल्या अभ्यासिकेसाठी स्पर्धा परीक्षेची पुस्तके उपलब्ध करुन देणार असल्याचे खा. गवळी यांनी सांगीतले. वडगाव गाढवे येथील लेंगी उत्सवात खा. भावना गवळी यांनी भेट दिली. येथे उपसरपंच पंजाब जाधव तसेच बंजारा बांधवांनी त्यांचा सत्कार केला.
विशेष म्हणजे, लेंगी उत्सवातील गाण्यावर ठेका धरीत महिलांसोबत खा. गवळी यांनी नृत्य केले.
तिवसा येथे जलजीवन मिशन अंतर्गत विहीरीचे भूमिपूजन खा. गवळी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी विहीरीसाठी जागा उपलब्ध करुन देणार्या कृषी भूषण आनंद सुभेदार यांचा सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे तिवसा गावातील अनेकांनी खा. गवळी यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना शिवसेनेतील स्थानिक पदे देऊन गौरविण्यात आले. याच भागातून जाणार्या वर्धा यवतमाळ नांदेड या रेल्वे प्रकल्पाच्या कामाची पाहणी भावना गवळी (Bhavna Gawli) यांनी केली. तिवसा सरपंच नरेश राठोड, उपसरपंच अभिजित राठोड, तांडानायक चरणसिंग नाईक, उपतालुका प्रमुख रणवीर चव्हाण उपस्थित होते. या संपुर्ण कार्यक्रमाचे नियोजन शिवसेनेचे तालुका प्रमुख गुणवंत ठोकळ यांनी केले. यावेळी शिवसेनेचे तालुका संघटक सुरेश ढेकळे, यवतमाळ शहरप्रमुख पिंटू बांगर उपस्थित होते.